भावार्थ दासबोध – भाग २३४

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक अठरा समास नऊ निद्रा निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. आदी पुरुषाला वंदन करून निद्रेचा विलास सांगतो. निद्रा सावकाश आली तर जाणार नाही. निद्रेने शरीर व्यापलं, आळस अंग मोडतो, जांभया देतो त्यामुळे बसायचा धीर होत नाही. कडकडा जांभया येतात. सावकाश डुलक्या येतात. एकाचे डोळे झाकले जातात, एकाचे डोळे लागतात, एक वचकून चहूकडे पाहतो. एक उलथून पडला. एक बेशुद्ध पडल्यासारखा आडवा झाला. एक टेकून बसले अन तिथेच घोरायला लागले. एक सावकाश उताणे पसरले. कोणी मुरकुंडी घातली. कोणी कानवडे निजले. कोणी चहूकडे चक्री घालतात. एक हात हलवतात. एक पाय हलवतात. एक कर करा करून दात खातात. एकाची वस्त्रे निघून गेली, तो नागवाच लोळायला लागला. एकाचे मुंडासे चहूकडे विस्कटले. एक अस्ताव्यस्त निजली, एक प्रेतासारखी दात पसरून भुतासारखी वाईट दिसते. एक मध्येच जाग येऊन उठले आणि अंधारात फिरायला लागले.

एक उकिरड्यावर जाऊन निजले. एक मडके उतरवतात..  एक भुवई चाचपतात. ऐक उठून भलतीकडे चालायला लागतात. कोणी ओरडतात, कोणी झोपेमध्ये स्फुंदून स्फुंदून रडतात, एक खदखदा हसतात. एक हाका मारतात, एक बोंबलत उठले, एक आपल्या जागीच वचकून राहिले. एक क्षणो क्षणी खुरडू लागले, एक डोकं खाजवतो. एक सावकाश कण्हू लागतो. एकाच्या लाळा गळाल्या. एकाच्या पिका सांडल्या. कोणी हळूच लघुशंका केल्या. कोणी अपान वायू सोडतात, एक करपट ढेकर देतात. एक खाकरून भलतीकडे थुंकतात. एक हागतात, एक ओकतात, एक खोकतात, एक शिंततात. एक कंटाळवाण्या सुरात पाणी मागतात. एक वाईट स्वप्नामुळे घाबरले. एक चांगल्या स्वप्नामुळे आनंदित झाले. एक सुषुप्तीत गाढ झोपले. इकडे उजडायला आलं. कोणी वाचन सुरू केलं. कोणी प्रातःस्मरण, हरिकीर्तन सुरू केलं. कोणी ध्यानमूर्ती आठवल्या. कोणी एकांतामध्ये जप करू लागले.

कोणी पाठांतर उजळणी करू लागले.नाना विद्या, नाना कला आपापल्या कुवतीप्रमाणे शिकायला लागले. ताना घेऊन गायन कला गाऊ लागले. मागे निद्रा संपली पुढे जागृती प्राप्त झाली. आपल्या  व्यावसायिक बुद्धीने प्रेरित झाले. ज्ञाता होता तो तत्वे सोडून पळाला. तुर्येपलीकडे गेला. आत्मनिवेदन करून ब्रह्मरूप झाला. जय जय रघुवीर समर्थ. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निद्रा निरूपणनाम समास नववा समाप्त.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!