शिकवणनाम १९ वे दशक समास पहिला लेखन क्रिया निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ब्राह्मणाने बाळबोध अक्षर सराव करून सुंदर घडवावे.ते पाहिल्यावर चतुर लोकाना समाधान मिळत.वाटोळे, सरळ, मोकळे, काळ्या शाईचे, काळे कुळकुळीत, मोत्यांच्या माळेंसारख्या ओळीत लिहिलेले. एका ओळीत समांतर असे अक्षर, त्यातील अंतर, काने मात्रे, नीट असावेत. आडव्या मात्रा,गोलाकार वेलांट्या नीट हव्यात. पहिलं अक्षर काढला ते ग्रंथ संपेपर्यंत एकटाकी लिहिले गेलेले वाटावे. पाहत जावं असं अक्षर पाहिजे.
अक्षराचे काळेपण, टाकाचा कडकपणा, वळण, वक्राकार एकसारखे असावेत. ओळीला ओळीचा स्पर्श व्हायला नको. रफार, मात्रा एकमेकाला छेद देणारे नकोत. खालच्या ओळीला वरच्या ओळीतील अक्षरांचा स्पर्श व्हायला नको. लांबट अक्षर नको. पानाच्या ओळी शिशाने रेखाटाव्या. त्यावर नेमकं लिहावं. ओळींचे अंतर दूर जवळ व्हायला नको. कुठे शोधलं तर अडायला नको. चूक शोधून सुद्धा सापडायला नको. वाचण्यासही लेखकाची आवश्यकता नसावी. कोणालाही समजायला पाहिजे. ज्याचं वय लहान आहे त्यांनी जपून लिहावं. लोकांना आवड निर्माण होईल असं करावं. तरुणपणी खूप बारीक असंण चांगलं नाही तसेच म्हातारपणी देखील,
त्याप्रमाणे मधोमध लिहिले पाहिजे. बाजूला मोकळी जागा सोडून मधोमध व्यवस्थित लिहावं. कागद संपतो तिथे मजकूर संपावा. अक्षर पुढे जाऊ नये. असा ग्रंथ जपून लिहावा की, प्राणिमात्रांना हेवा वाटला पाहिजे. असा पुरुष पहावा असं लोक म्हणतात. कायेला भरपूर कष्ट द्यावे. चांगली कीर्ती उरवावी. लोकांमध्ये आवड निर्माण करावी. चांगले जाड कागद आणावे. ते व्यवस्थित घोटावे. नंतर लिहिण्याची विविध प्रकारची सामग्री आणावी. सुरी, कात्र्या, समासाची पट्टी, खळ, घोटण्यासाठी चिवट घोटा नाना साधने आणावी. नाना देशातून बोरू आणावेत. घट्ट, बारीक, सरळ असे बोरू घ्यावे. ज्ञान रंगांचे नाना जिन्नस आणावे. टाक, रेखाटने, सीसलोळ्या (पेन्सिली) आणाव्या. चुकलं तर दुरुस्त करण्यासाठी हिंगुळ असावं. शाइ असते ती भिजवावी, वाळवावी. सुरत मलबार इत्यादी बंदरावरून आणलेल्या फळ्या घोटून घ्याव्यात. त्याच्यावर नाना उच्च दर्जाची चित्र चितारावी. नाना कापड, शेंदूर वर्णाची मेणकापड, पेट्या, कुलुपे यांत पुस्तक व्यवस्थित ठेवावी. अशा रीतीने पुस्तकांची चांगली काळजी घ्यावी असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्यसंवादे लेखन क्रिया निरूपण नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७