भावार्थ दासबोध -भाग २३९

निरुपण :पद्माकर देशपांडे

0

दशक एकोणावीस समास -तीन करंट लक्षण 
जय जय रघुवीर समर्थ. लक्षपूर्वक करंटलक्षण ऐका. त्यांचा त्याग केला असता सुदैवी लोकांची लक्षणे अंगी येतात. पाप केल्यामुळे दरिद्र प्राप्त होते. दरिद्र्यामुळे पाप साठते असं क्षणोक्षणी होत जाते. त्यामुळे करंट लक्षण ऐकून त्याचा त्यागच करावा म्हणजे थोडीफार चांगली लक्षणं अंगी बाणवता येतील. करंट्या माणसाला आळस आवडतो. प्रयत्न अजिबात आवडत नाहीत. त्याचीही वासना नेहमी चुकीचे, अधर्माकडे नेहमी असते. तो सदा भ्रमिष्ट, आळशी, उगाच सैरावैरा बोलणारा, कोणाचे म्हणणं न मानणारा, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, बाजारहाट करता येत नाही, हिशेबकिताब येत नाही. हरवतो, धीर नाही, सांडतो, पाडतो, फोडतो, विसरतो, चुकतो त्याला नाना खोडी असतात. त्याला चांगल्या लोकांच्या संगतीची आवड अजिबात नसते.

चावट व्यसनी गडी मिळवतो, वाईट कर्म करणारे मित्र करतो. दुष्ट नष्ट चोरटे पापी अशा लोकांना एकत्र करतो. सर्वांशी भांडणारा, नेहमीच चोऱ्या करणारा, दुसऱ्याचा घात करणारा, धष्टपुष्ट, दमदाट्या करणारा  असा तो असतो. त्याच्याकडे दीर्घकालीन योजना काहीच नसते. न्यायनीती आवडत नाही. दुसऱ्याचे लुबाडण्याची वासना निरंतर असते. आळसाने शरीर पाळतो पण पोट भरण्याची त्याला भ्रांती असते. पांघरायला पांघरूण मिळत नाही. पिशाच्चवत राहतो. आळसाने शरीर पाळतो. अंग खाजवत राहतो. निद्रा घेत राहतो. नेहमी लोकांशी मैत्री करत नाही. नाना कठीण शब्द बोलतो. त्याचा मूर्खपणा कोणालाही दूर करता येत नाही. पवित्र लोकांना भिडावं, त्यांना त्रास द्यावा, ओंगळ लोकांमध्ये निशंकपणे धावतो. त्याला लोकांनी निंद्य मानलेल्या क्रिया मनापासून आवडतात. तो अनेकांचा संहार करतो तिथे परोपकार कसला आला? मग तो पापी, अनर्थ करणाऱ्या पिशाच्च बुद्धीने वागतो. शब्द सांभाळून बोलत नाही.

त्याला आवरलं तरी आवरता येत नाही. कोणाचेही बोलणं तो मानत नाही. कोणावर विश्वास नाही. कोणाशीही मैत्री नाही. विद्यावैभव काहीच नाही. उगीच ताठा मिरवतो. अनेकांची मने राखली म्हणजे भाग्य येते अशा प्रकारच्या विवेकाचं आहे ते तो मानणार नाही.   ऐकणार नाही. त्याला स्वतःला काही कळत नाही आणि शिकवलेलं ऐकत नाही.  त्याच्यासाठी नाना उपाय व्यर्थ ठरतात. उदंड कल्पना करतो पण प्राप्ती काहीच नाही.

अखंड संशय आणि अनुमान असं चालू असतं. त्याच्या मनाने पुण्याचा मार्ग सोडलेला असतो त्यामुळे पाप कसे दूर होईल? त्याचा निश्चय नसतो. अंदाजपंचे वागण्याने त्याचा नाश होतो. काही एक पूर्णपणे समजत नाही. सभेमध्ये बोलता येत नाही. असंबद्ध, लबाड, थापाड्या असतो हे लोकांच्या लक्षात येते. ज्यांचे काही महत्त्व लोकांना समजलं तेच लोक भूमंडळावरती मान्यता पावले. लोकांसाठी झिजल्या शिवाय कीर्ती मिळणार नाही. मान्यता ही फुकट मिळत नाही.

अवलक्षण असेल तर जिकडे तिकडे अपमान होतो. भल्याची संगत धरत नाही, स्वतःला शहाणा करीत नाही, स्वहित जाणत तो आपला आपणच वैरी आहे. लोकांचे भले करावे ही सवय घ्यावी असं ज्याला वाटत नाही. जिथे उत्तम गुण नाहीत ते करंटेपणाचे लक्षण आहे. अनेकांचं मानत नाहीत अवलक्षण. जगातील सर्व व्यवहार सापेक्ष असतात आपण जर कोणाच्या कारणी पडणार, उपयोगी होणार असलो तरच तो आपलं कार्य करेल. निरूपयोगी मनुष्य दुर्लक्षित झाल्याने नेहमीच दुःख प्रवाहात वाहत जातो. अनेकांची मान्यता असलेले थोडेच असतात. ते पाप जोडत नाहीत. निराश्रयी मात्र सर्वत्र उघडा पडतो. त्यामुळे अवगुणांचा त्याग करावा. उत्तम गुण जाणून घ्यावेत, तरच मनासारखं सर्व घडेल. इतिश्री दासबोधे करंट क्षण निरूपण नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!