भावार्थ दासबोध -भाग २४१

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक एकोणावीस समास ५ देह मान्य निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुप्याचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, गंधाच्या लेपन काढलेले चित्रलेप, रुईच्या लाकडाचे देव, पोवळ्याचे देव, बाण, तांदळे, नर्मदे, शालिग्राम, काश्मिरी देव, सूर्यकांत, सोमकांत मणी, तांब्याची नाणी, सुवर्णाची नाणी यांचे कोणी कोणी देवाच्या पूजेमध्ये पूजन करतात. चक्रांकित देव, चक्रतीर्थ, उपासनेचे भेद उदंड आहेत. ते किती विशद करायचे?

आपापल्या आवडीचा वेध लोक घेतात; पण त्या सगळ्यांचं कारण असलेला एको हम असे तत्व हीच मूळमाया. त्या स्मरणाचे अंश म्हणजे ही नाना देवते आहेत. मुळातच द्रष्टा देव एक आहे. त्याचेच अनेक झालेले आहेत. हे नीट समजून घेतलं, विचाराने पाहिलं तर मग लक्षात येते. देह नसेल तर भक्ती होत नाही, देह नसेल तर देव पावत नाही, म्हणून भजनाचे मूळ देहच आहे. देहामुळे भजन करता आलं. देह नसता तर भजन कसं करता आलं असतं? म्हणून भजनाचा उपाय देहात्मयोगामुळे आहे. देह नसताना देवाचे भजन कसे केले जाईल? देह नसताना देवाची पूजा कशी करता येईल? देह नसताना महोत्सव कसा करता येईल? पाने,फुले, गंध, तांबूल, धूप, दीप, नाना भजने कसे केले जातील? देवाचं तीर्थ कसं घ्यायचं? देवाला गंध कुठे लावायचं? मंत्र पुष्प कुठे वाहावे? म्हणून देहाशिवाय सगळे अडते.

सगळं साकडं पडतं. देहामुळे सगळं भजन घडतं. देव-देवता, भूत देवता हे मूळ मायेचे, ईश्वराचं सामर्थ्य तिथे आहे. योग्यतेनुरूप नाना देवतांचे भजन करीत जावं. नाना देवांचे भजन केलं तर ते मूळ पुरुषापर्यंत पोहोचेल. त्यामुळे सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे. मायावल्ली फोफावली, देहरूपी नाना फळांना लगडली, मुळीची ही जाणीव आहे ती फळांमध्ये आली. म्हणून त्याचा कंटाळा करू नये. जे पाहायचं तेच पाहावं. अनुभव आल्याने समाधानाने राहावे. प्राणी संसार सोडून देतात, देवाला शोधत फिरतात. नाना उपाय करतात. अंदाज बांधतात. तर्क करतात. लोकांची रूढी पाहिल्यावर लोक देवाची पूजा करतात किंवा क्षेत्रातील देव पाहतात. त्यांचाही निर्धार करतात पण ते सगळं होऊन गेलेले आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे विशेष आहेत. मात्र गुणातीत जगदीश आहे तो पाहिला पाहिजे. देवाला कोणताही ठावा ठिकाणा नाही, म्हणून त्याचे भजनही करता येत नाही असं समजाल तर घोटाळ्यात पदाल.

देवाचे दर्शन नसेल तर कसे पावन होता येईल? सर्व साधूजन धन्य आहेत. ते सगळं जाणतात. भुमंडळावर नाना देव आहेत, त्याच्यातून मार्ग निघत नाही. मुख्य देव हा काही केल्या समजत नाही. आब्रम्हास्तव सार विश्व वेगळं करावं मग त्या देवाला पाहावे. तरच काहीही गुप्त गुह्य आहे ते लक्षात येईल. ते दिसत नाही आणि भासत नाही. कल्पांत झाला तरी देखील नष्ट होत नाही. सुकृत नसेल तर त्यावर विश्वास बसत नाही. त्याची उदंड कल्पना केली जाते,

उदंड वासनेची इच्छा होते, मनामध्ये नाना तरंग उदय पावतात म्हणून कल्पनारहित तीच वस्तू शाश्वत आहे. तिला अंत नाही म्हणून तिला अनंत असे म्हणतात. हे ज्ञानदृष्टीने पहावं. पाहून तिथेच राहावे. मीपणाचा त्याग करून नीजध्यासात तद्रूप व्हावे. नाना लीला, नाना लाघव ते काय जाणतील बापडे जीव.. संतसंगामुळे अनुभवाची स्थिती अंगी बाणवता येईल, अशी सूक्ष्म स्थिती गती आहे. ती समजली तर अधोगती टळेल. सद्गुरूमुळे सद्गती तात्काळ मिळते.इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहमान्य निरूपण नाम समास पंचम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

 

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!