भावार्थ दासबोध -भाग २४३

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक एकोणावीस समास सात यत्न निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. कथेची बहार उडवून द्यावी. निरुपणात विवरण करावं. कशाबाबतही काहीही कमी पडू देऊ नये. वक्ता वक्तृत्वामध्ये घसरला तर जे स्वतः त्या विषयाचे जाणकार असतील त्यांना ते समजून येईल. न जाणणारे लोक उगाच टकमक पाहत बसतील. उत्तर देण्यास विलंब झाला, श्रोत्याला समजलं, त्यामुळे वक्त्याचे महत्त्व कमी झालं. थोडं बोलून समाधान करायचं, मनात राग धरणे, मनुष्याचं लक्ष दुसरीकडे वेधायचे.. असेही काही ठिकाणी दिसते. चिडचिड केली, सोसवत नाही तिथे तामस वृत्ती दिसून आली. त्यामुळे श्रोत्यांची आवड नाहीशी झाली. कोणाचं मन राखलं, कोणाचं मन भंगलं अशाप्रकारे क्षणोक्षणी लोकांची परीक्षा केली पाहिजे. शिष्य संशय घेतो, गुरु त्याच्या मागे धावतो.. विचार पाहिला तर सगळा संशयच.. अशाबद्ध, क्रियाहीन असणे हे चतुर्याचे लक्षण नाही.

त्या महंताच्या सांगण्याला मर्यादा येतात. अशा गोसाव्यांची पत नष्ट होते. विश्वासार्हता संपते. ठाई ठाई कष्टी व्हावं लागतं. त्यामुळे त्यांच्या संगतीचे सुख लोकांना कसे मिळेल? सगळीकडे कीर्ती पसरते, सर्व लोकांना आवड निर्माण होते. लोक राजी राखून सगळं काही करावं. परलोकी वास करावा, शांत समुदाय पहावा. काहीही मागण्यांचा तगादा लावू नये. जिकडे जग तिकडे जगन्नायक हा विवेक कळला पाहिजे. विवेकी लोक रात्रदिवस हा विवेक सांभाळतात. जे जे लोक दृष्टीस पडतात ते ते चांगले नाहीत असं कळलं. सगळेच वाईट आणि एकटाच चांगला कशावरून? मुलुख ओस पडला तर काय पाहायचं? लोक नसतील तर कुठे राहायचं? अभिमान कामाचा नाही! त्यामुळे मिळते जुळतं घ्यावं.

लौकिक जीवन जगता येत नाही त्याला महंतपण देखील उपयोगाचं नाही. परत्र साधण्यासाठी उपाय म्हणजे श्रवण करीत राहावं. आपल्याला चांगलं पोहता येत नाही आणि लोकांना बुडवायचं काम करायचं म्हणजे गोडी, आवड वाया जाते. सगळ्या समस्याच. अभ्यास करून प्रगट व्हावं, नाहीतर झाखून असावं, प्रगट होऊन न असावं हे बरं नाही. मंद घोड्याला कसबसा चालवणारा आहे तो चपळ अरबी घोड्याला कसा आवरू शकेल? हे धकाधकीचं काम आहे. तीक्ष्णबुद्धीची कसोटी लागते. भोळ्या भावाच्या संभ्रमामुळे ते घडत नाही. शेत केलं पण त्याची निगा राखता येत नाही, हिऱ्याचा व्यापार केला आणि आपण फिरत नाही… लोक मिळवले परंतु त्यांच्या अंतरंगात शिरत नाही.. चढती वाढती आवड असली तरच परमार्थ प्रगटतो. घसघस केली तर लोक विटून जातात.

आपण लोकांना मानत नाही, लोक आपल्याला मानत नाहीत. संशय आहे तर मनाला समाधान कसं मिळेल? भोंदूपणाची दीक्षा, फसवे लोक, तिथे विवेक कसा असेल? जिथे अविवेक बळावला तिथे राहणं खोटं. खूप दिवस कष्ट केले शेवटी वाया गेले. आपल्याला समजेना कुठे गोंधळ झाला. व्यवस्थित चालले तर तो व्याप, नाही तर सगळा संताप. क्षणोक्षणी अडचणी. किती म्हणून सांगायच्या? मूर्ख मूर्खपणाने वागतात, शहाणे लोक शहाणपणाने कलह करतात! दोन्हीकडे लोकांमध्ये फजिती होते. कारभार आटोपत नाही, करता येत नाही आणि शांतही बसवत नाही. अशा सर्व लोकांना काय म्हणायचं?

नासक्या उपाधीला सोडावं. वय सार्थकी लावावे. कुठेतरी परिभ्रमण करावे. दुसरीकडे जाऊन राहावं. परिभ्रमण करीत नाही, दुसऱ्याचं काही सहन करीत नाही, मग संशयामुळे उदंड यातना तुम्हाला सहन कराव्या लागतील. आता हे आपल्यावर अवलंबून आहे, स्वतःलाच विचारावं आणि अनुकूल पडेल अशी वर्तणूक करावी. असं समर्थ सांगत आहेत. इतिश्री दासबोधे यत्ननिरूपण नाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.