भावार्थ दासबोध -भाग २४४

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक एकोणावीस समास आठ उपाधी लक्षण निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. सृष्टीमध्ये खूप लोक आहेत. परिभ्रमण केल्यावर त्यांचं कौतुक कळतं. नाना प्रकारचे विचार आढळतात. प्रपंचामध्ये किती लोक आहेत, त्यांची वृत्ती अखंड उदासीन आहे. सुखदुःख आले तरी त्यांचे समाधान कमी होत नाही. स्वाभाविक आहे ते नेमकं बोलतात. सहज नेमकं चालतात. त्यांची बोलण्याची अपूर्व स्थिती सगळ्यांना मान्य होते. सहजपणे तालाचे ज्ञान येते, स्वाभाविकपणे रागज्ञान उमटते,

न्याय,नीती लक्षण सहज समजत जाते. एखादा बंडखोर आढळतो, बाकी सगळे अखंड राजी असतात. त्यांची प्राणीमात्रांची आवड ताजी असते. चुकून एखाद्या ठिकाणी भरपूर आढळते, भारी माणूस दृष्टीस पडतो, अकस्मात महंताचं लक्षण आहे असं वाटतं. असे लोक दिसल्यावर लोक चमत्काराने गुण ग्रहण करतात आणि त्यांचे बोलणे आणि क्रिया प्रत्यय देणारे नेमके असते. सगळ्या अवगुणांतील मोठा अवगुण म्हणजे आपले अवगुण हे गुण वाटतात! हे मोठे पाप असून त्याला करंटेपणा चुकत नाही. तेजस्वीपणाने किंवा तडजोडीने नेहमी काम होतं ते भिडस्तपणाने किंवा जपून काळजीपूर्वक केल्याने होत नाही. तिथे पीळ-पेच आढळत नाहीत. एकाला अभ्यास करता येत नाही, एकाचा स्वभाव पसंतीस येत नाही. भगवंताचा महिमा काय आहे, कसा आहे तो कळत नाही.

मोठी राजकारणे चुकतात, राजकारणी वेढतात, नाना चुकीची चहूकडे फजिती होते. म्हणून चुकू नये. त्याच्यासाठी उदंड उपाय करावे. उपाय चुकल्यास उपाय होतो. काय चुकलं ते कळत नाही, मनुष्याचे मन वळत नाही, दोन्हीकडे खवळलेला अभिमान कमी होत नाही. त्याच्यामुळे सगळे फडच नासतात, लोकांची मने भंग पावतात, युक्ती कुठे चुकते काही समजत नाही. व्याप नसताना खटाटोप केला तो सगळा घसरत गेला, दूरदृष्टी बाळगून त्याला अकलेचा बंद घातलेला नाही. एखादा माणूस वेगळाच असतो, त्याची कृती बावळटपणाची असते. त्यामुळे नाना विकल्पाचे जाळे निर्माण होते. ते आपल्यालाही उकलत नाही आणि दुसऱ्यालाही काही कळत नाही विकाल्पामुळे ठायी ठायी कल्पना निर्माण होतात.

त्या गुप्त कल्पना कोणाला कळतात? कोणी त्यावर ताबा मिळवावा? त्याच्यासाठी बळकट बुद्धीणे ज्याने त्याने उपाययोजना केली पाहिजे. ज्याला उपाधी आवरता येत नाही त्याने उपाधी वाढवू नये. सावध चित्त करून मनाने समाधानी असावे. धावाधाव करून उपाधी ग्रहण करतो त्यामुळे आपणही कष्टी होतो आणि लोकांनाही कष्टी करतो, म्हणून अशी गोष्टी करू नये. लोक कष्टी झाले तर आपल्यालाही जास्त त्रास होईल म्हणून व्यर्थ गलबला कशासाठी करायचा? उपाधीचे काम असे आहे, काही बरं काही त्रासदायक.सगळं समजून वर्तन केलं म्हणजे बरे. लोकांपाशी भावार्थ कसा असेल? तो आपण जागवावा लागतो. शेवटी फजिती होईल असे करूच नये. अंतरात्म्यासाठी सगळे लागते. निर्गुणाकडे जाण्यासाठी काही लागत नाही. चंचलामध्ये नानाप्रकारचे धोके संभवतात. ते शुद्ध विश्रांतीचे स्थळ निर्मळ निश्चळ असून तिथे विकार निर्विकार होतात. सर्व उद्रेक तुटून जातात. मनाला विश्रांती वाटते, अशी दुर्लभ परब्रम्ह स्थिती विवेकाने सांभाळावी.

आपल्याला उपाधी मुळीच नाही..ऋणानुबंधामुळे सगळं मिळालं.आता आला गेल्याची तमा नाही असं झालं पाहिजे. जो उपाधीला कंटाळला तो निवांत होऊन बसला.आटपत नसलेला गलबला कशासाठी करायचा? काही गलबला काही शांतता असा काळ कंठीत जावा. ज्यामुळे आपल्याला विश्रांतीसाठी वेळ मिळेल. उपाधी काही राहत नाही, समाधानाइतकं मोठं दुसरं काहीही नाही. नरदेह काही क्षणोक्षणी प्राप्त होत नाही. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उपाधीलक्षण निरूपण नाम समास अष्टम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.