भावार्थ दासबोध – भाग २४५

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक एकोणावीस समास नऊ राजकारण निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानी आणि उदास असलेल्यांना समुदायाचा हव्यास नको त्याने अखंड सावकाश एकांतपणा अनुभवावा. ज्याला युक्ती प्रवृत्ती समजतात, अखंड चिंतन करीत असतो त्याला प्राणिमात्रांची स्थिती गती कशी आहे ते समजतं. पण अखंड चिंतन करीत नाही त्याला काही उमजत नाही. त्याला दिवाळखोर असं म्हणता येईल. एक इनामी वतन साधतात, एक सहज गमावतात.. व्यापकपणाची स्थिती अशी आहे. जे जे मनामध्ये धरलं ते ते आधीच समजलं. जे जे कृत्रिम आहे ते सहजपणे खुंटले. अखंड राहिले तर जवळीक साधते. अति परिचय घडला की अवज्ञा घडते, म्हणून विश्रांती घेता कामा नये.

माणसाने आळस केला तरी मग कारभारच बुडून जातो. समुदायाच्या मनातील हेतू चुकत गेला. उदंड उपासनेची कामे करावी, नित्यनेमाने करीत जावी. कृत्रिम गोष्टी करण्यासाठी त्यात अवकाश घेऊ नये.चोर असेल त्यालाच भांडारी करावा. तो चुकला की सांभाळावा. हळू हळू त्याचा मूर्खपणा काढावा. या सगळ्या पूर्वीच्याच गोष्टी. प्राणी कोणी कष्टी होऊ नये. राजकारणाद्वारे आकर्षून घ्यावे. नष्ट असेल त्याच्यासमोर नष्ट योजावे, वाचाळाच्या पुढे वाचाळाला आणावे. आपल्यावर चुकीचा आरोप येऊ देऊ नये. काट्याने काटा काढावा परंतु ते कळू देऊ नये. कोणी गबाळेपणाची पदवी दिली तर असू द्यावी. नकळतपणे काम तात्काळ होते,गवगवा झाल्याने ते चमत्कार होत नाहीत. सेवकांना आपले ऐकण्याची आवड निर्माण व्हावी. पाहिल्यावर बळकट व्हावी. सेवकांना परकेपणा वाटता उपयोगाचा नाही. कोणतेही काम केले तर होते. ते केले नाही तर मागे पडते. त्यामुळे ढिलेपणा असू नये. जो दुसऱ्या वरती विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला. जो आपण स्वतः कष्ट करीत केला तोच भला ठरतो.

सगळ्यांना सगळं कळलं तर ते उघड झालं, असं घडायला नको. मुख्य सूत्र हाती घ्यावं, करायचे ते मग लोकांकरवी करावं. राजकारणामध्ये अनेक धूर्त लोक जमवावे. बोलके पैलवान, वादपटू यांच्य्याशी दावा मांडावा. दुर्जनांचे राजकारण वाढेल असे करू नये. गावगुंडांना समोर उभे करावे, पकडून त्यांची मस्ती जिरवावी, रगडून त्यांचं पीठ करावं. नंतर पुन्हा सावरावं. बुडवू नये. दुष्ट दुर्जनांना भ्यायले तर राजकारण होऊ शकत नाही. त्यामुळे सगळं बर वाईट प्रगट झालं. समुदाय मोठा पाहिजे तर तंबूच्या दोऱ्या म्हणजे व्याप देखील मोठा असावा. मठ करून गर्व करू नये. दुर्जन प्राणी ओळखावे पण ते प्रगट करू नये.

सज्जनांसारखा त्यांना महत्त्व द्यावं. जनांमध्ये दुर्जन प्रकट झाले तर मग अखंड खटपट करावी लागते म्हणून ती वाट पुसून टाकावी. गणीमांच्या फौजा पाहिल्यावर रणछूर असतील त्यांच्या भुजा फुरफुरतात. असा राजा पाहिजे की त्याने परमार्थाचा पक्ष घेतला पाहिजे. त्याला पाहिल्यानंतर दुर्जन लोकांना धाक वाटला पाहिजे. त्यांना प्रचितीचे तडाखे दिले पाहिजेत. मग पाखंडी लोकांच्या बंडाची सहजच धूळधाण होते. हे धूर्तपणाचे काम आहे, राजकारण नियमाने करावे, कुठेही ढिलेपणा असू नये. जो कुठेही दृष्टीस पडत नाही त्याच्या ठायी ठायी गोष्टी, वाग्विलास करून सर्व सृष्टी व्यापली आहे. मूर्ख असेल त्याच्या समोर मूर्ख आणावा, गुरगुरणारा असेल त्याच्यापुढे गुरगुरणारा आणावा. दांडगा उद्धट असेल तर लुच्चा असेल त्याच्यासमोर लुच्चा आणावा. जशास तसा जेव्हा भेटतो तेव्हा राजकारण होते. इतकं होतं पण एक कोण करतय? धनी दृष्टीस पडत नाही. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास नववा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.