दशक २० समास तीन सूक्ष्मनामाभिधान नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. मुळापासून शेवटपर्यंत नाना परीने विस्तार सांगितला. पुन्हा तो सांगत कमी करत वृत्ती माघारी न्यावी. चारी खाणी चारी वाणी ८४ लक्ष जीव योनी. नाना प्रकारचे प्राणी जन्माला येतात. सगळे पृथ्वीपासून होतात पृथ्वीमध्येच नष्ट होतात. अनेक येतात जातात, पण पृथ्वी तशीच आहे. गुणापासून मूळमायेपर्यंत अदृश्य असल्याने त्याचा विचार फार सूक्ष्म बुद्धीने करावा. सगळे स्थूल सोडून द्यावे, सूक्ष्म रूप ओळखावे. जाणीव, नेणीव ही गुणांची रूपे आहेत. त्यापुढे सूक्ष्म दृष्टीची लीला सुरु होते. शुद्ध नेणीव म्हणजे तमोगुण शुद्ध जाणीव म्हणजे सत्वगुण, जाणीव नेणीव मिश्रित रजोगुण, तयार होतो अशी त्रिकोणाची रूपे ती आपोआप कळायला लागली. गुणांपूर्वीच्या चिखलास गुणक्षोभिणी म्हणतात. रज,तम आणि सत्व या तिन्हीच जिथे गुढत्व आहे ते कर्दम रूपी महतत्त्व. प्रकृती-पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर असं त्याला म्हणतात पण त्याची स्वरूपस्थिती कर्दमरूप आहे.
सूक्ष्म रूपामध्ये गुणसौम्य म्हणून त्याला गुणसाम्य असं म्हणतात. चैतन्य अगम्य असून सूक्ष्मरूप आहे.मूळमाया ही बहुजिनसी आहे.ही महाकारण ब्रह्मांडीची काया आहे. अशा प्रकारचा सूक्ष्म अन्वय सापडतो, तो जरूर पहावा. चारी खाणी, पाच भुते, चौदा सूक्ष्म संकेत, काय पहायचे ते येथे शोधून पाहावे. वरवर पाहिलं तर कळत नाही. हयगय केल्याने काही समजत नाही. लोकांच्या मनात नाना संदेह निर्माण होतात. पंच महाभूत, चार खाणी इ. पाहावे. यामध्ये मूळ चौदा गोष्टी आहेत त्या जरूर पाहाव्या. हे विवरण करून समजलं. तिथे संदेह उरला नाही.समजल्याशिवाय जो गोंधळ होतो तो निरर्थक आहे. सर्वसृष्टीचे बिज हे मूळ मायेमध्ये आहे, हे समजल्यावर खरा परमार्थ सिद्ध होतो. समजले की मनुष्य काही वेगळ बोलत नाही. निश्चय करतो, अनुमान धरत नाही.
परमार्थात सावळा गोंधळ करीत नाही. शब्दातीत बोलता आलं. त्याला वाच्यांश म्हणतात. विवेकपूर्वक शुद्ध लक्षांशाकडे लक्ष दिले पाहिजे. पूर्वपक्ष म्हणजे माया ती सिद्धांतामुळे विलयाला जाते. माय नसेल तर मग तिला काय म्हणायचं? उभारणी आणि संहारणी हा पूर्व पक्षाचा विवेक आहे. सिद्धांत म्हणजे शुद्ध एक, दुसरं काही नाही. विस्ताराचा विचार केल्याने भेद वाढतो. निसःन्गपणे निर्गुणी म्हणजे महायोगी. माया मिथ्या असं कळलं, तरी मग भीड का लागली? मायेच्या भिडेने स्वरूपस्थिती घसरली. मिथ्या मायेच्या भिडेने सत्य परब्रह्माकडे दुर्लक्ष करणे अयोग्य, तसेच ब्रह्मस्वरूपाच्या निश्चयानंतर परत मायीकाच्या आशेने इकडे तिकडे वणवण करणे हेही अयोग्यच. पृथ्वीवर खूप लोक आहेत. त्यामध्ये सज्जन आहेत. पण साधूला साधूशिवाय ओळखतो कोण? म्हणून संसार सोडावा,
साधूचा शोध घ्यावा, फिरून फिरून साधू जनांना शोधावं. उदंड संत हुडकावे मग प्रचिती असलेला महंत सापडतो. प्रचितीशिवाय स्वहीत होणार नाही. प्रपंच किंवा परमार्थ प्रचितीविना सगळे व्यर्थ आहे. प्रत्यय ज्ञानामुळे जो समर्थ होतो तो सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असतो. म्हणून रात्रंदिवस अर्थ पाहिला पाहिजे. पाहिलेलं पुन्हा पुन्हा पहावं. शोधलेलं पुन्हा पुन्हा शोधावं. मग ते अपोआप समजते आणि आपले संदेह दूर होतात असं समर्थ सांगत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे हे सूक्ष्म नामाभिधान नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७