भावार्थ दासबोध – भाग २५०

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक २० समास ४ आत्म निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या लोकांना प्रार्थना आहे, अहोरात्र निधीध्यास असावा. निरूपण ऐकून मनामध्ये प्रत्यय आणावा. प्रत्यय एकीकडेच राहिला आणि आपण भलतिकडेच धावतो मग सार आणि असार यांचा निवाडा कसा होईल? सगळी सृष्टी पाहिल्यानंतर दृष्टीला गलबला दिसतो पण राजसत्तेची गोष्ट वेगळीच आहे. प्रत्यक्ष नसूनही ती कार्यकारी असते. पृथ्वीवर जितकी शरीर आहेत तितकी भगवंताची घर आहेत. त्याच्याद्वारे नाना सुखांची प्राप्ती होते. त्याचा महिमा कोणाला कळेल?

प्रत्येकाच्या आईच्या रूपाने कृपाळू होऊन जगदीश जगाचे रक्षण करतो. सत्ता पृथ्वीमध्ये वाटली त्याच्यामुळे ती जिथे तिथे विभागली आणि ती या भगवंताच्या कलेमुळे सृष्टी चालते. मूळ जाणत्या पुरुषाची जगदीशाची अंतरात्म्याची सत्ता आहे ती शरीरामध्ये विभागली गेलेली आहे. त्यामुळे तेथे चातुर्य वस्ती करते. या सगळ्या देहरूपी पुराचा ईश म्हणजे जगातला जगदीश आहे तो नाना शरीरामध्ये व्यवहार करतो आहे. सृष्टीची रचना पाहिली तर ती एका व्यक्तीच्या मुळे चालत नाही एकच जो आत्मा आहे तोच नाना देह धरून चालवतो. उंच नाही, नीच नाही, बरं नाही, वाईट नाही, असं काही नाही. कार्य चालले पाहिजे इतकेच. न जाणणे आडवं केलं किंवा अभ्यासास प्रवृत्त झाले, हे असं कसं त्याच्या तोच जाणतो. जगाचे जे अंतर अर्थात आपल्याही अंतराचे अंतरात्म्याचे अनुसंधान ठेवणं म्हणजे अनन्य लक्ष असणं हेच ध्यान होय. ते ज्ञानाशिवाय जमणार नाही म्हणून तत्वतः ध्यान आणि ज्ञान एकरूप आहे.

प्राणी संसारात आला, काही एक शहाणा झाला मग तो भूमंडळावर वावरायला लागला. रामाची प्रगट खूण म्हणजे ज्ञानघन आत्माराम, विश्वंभर तो भाग्यानेच कळतो. उपासनेच्या मिषाने स्वर्ग प्राप्तीची वासना धरली तर पुण्य संपल्यावर परत जन्म असल्याने जन्म-मृत्यूची परंपरा लांबतच जाईल संपणार नाही. मायेचा असा अगाध महिमा आहे तो यामुळेच. थोडक्यात, वासनेचा क्षय होणे आवश्यक आहे. द्रष्टा म्हणजे पाहणारा, साक्षी म्हणजे जाणणारा, अनंत रूपाने अनंताला ओळखावे. चांगल्याची संगत असावी. कथा निरुपणाची सवय असावी आणि तीच मनाची विश्रांती आहे. त्यापेक्षाही प्रत्यय ज्ञान हे पाहिजे आणि अनुमान तिथेच जाळून टाका. त्याशिवाय समाधानाला समाधान मिळणार नाही. मुख्य संकल्प म्हणजे हरि संकल्प. मूळ मायेतील विचार, सगळ्या जगात तेच रूप पाहायचं. उपासना ही ज्ञानरूप आहे.

आपण ज्ञानी हा देहावरील चौथा आरोप आहे म्हणून सगळे संकल्प सोडून द्यायचे. पुढे परब्रम्ह विशाल गगनासारखं पोकळ आहे, त्याला काय म्हणायचं? उपासना म्हणजे ज्ञान. ज्ञानामुळे निरंजन अवस्था प्राप्त होईल. योग्यांचे समाधान अशा रीतीने होईल. हा विचार नीट लक्षपूर्वक पहिला तर उपासनाही आपोआप होईल. तोच आपण असल्याने उपास्य उपासक हा भेद नष्ट होतो. एक जातो, एक देह धरून राहतो. अखंड अशी घालमेल पूर्वापार होत गेली आताही तशीच उत्पत्ती, स्थिती चालली आहे. वनावर वनचरांची सत्ता, जळावरती जळचरांची सत्ता व भूमंडळावर भूपाल म्हणजे राजा. अशाप्रकारे आहे चळवळीचे सामर्थ्य आहे. जो जो चळवळ करेल त्याचं आहे, परंतु तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. कर्ता जगदीश वेगवेळ्या प्राण्यांच्या ठिकाणी त्याचे अधिष्ठान आहे त्याकरवी त्याचे कार्य चालत असते. तिथे अहंकाराचं काही चालत नाही. हरी कर्ता, हरी भोक्ता असं तत्त्वातः चालतं, या गोष्टीचा विचार करावा.

सगळा करणारा परमेश्वर आहे. आपण हा माईक विचार आहे. जसं कळेल तसं जगामध्ये वावरू. देवाएवढं चपळ कोणीच नाही, ब्रह्माएवढे निश्चळ काहीच नाही. पायरी पायरीने चढून पायी मूळपर्यंत जायचे हेच खरे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मानिरुपण नाम समास चतुर्थ समाप्त.श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.