भावार्थ दासबोध – भाग २५१

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक २० समास सहा चतवार जिन्नस नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. इथून तिथपर्यंत पाहिले असता चार जिन्नस दिसून येतात. एक परब्रम्ह, १४ प्रकारच्या माया, पंचमहाभूते, चारी खाणी असे त्याचे स्वरूप आहे. मूळ मायेची १४ नावे अशी, चैतन्य, गुणसाम्य, अर्धनारी नटेश्वर, षडगुणेश्वर, प्रकृती-पुरुष, शिवशक्ती, शुद्धसत्व, गुणक्षोभिणी, सत्व, रज, तम, मन, माया व अंतरात्मा. अशा प्रकारचे हे सगळं आहे पण परब्रम्ह या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. परब्रम्ह हे सगळ्यांपेक्षा आगळ आहे. नाना कल्पनेपेक्षाही ते निराळ आहे.

परब्रम्हाचा विचार नाना कल्पनेच्याही पलीकडचा असून निर्मळ, निश्चळ, निर्विकार, अखंड असे परब्रम्ह आहे. परब्रम्हाची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येत नाही. ते एक मुख्य जिन्नस आहे आणि दुसरे जिन्नस म्हणजे नाना कल्पना, मूळमाया. नाना सूक्ष्मरूप, सूक्ष्म आणि कर्दमरूप. मूळमायेमुळे संकल्पाचा आरोप केला जातो. हरी संकल्प म्हणजे मूळचा आत्माराम. अशाप्रकारे सर्वांची नावे आहेत. निश्चलामध्ये चंचल चेतले म्हणून त्याला चैतन्य असे म्हणतात. गुण समान असल्याने गुणसाम्य दशा त्याला आली. अर्धनारी नटेश्वर म्हणजेच षडगुणेश्वर, तर प्रकृती आणि पुरुष यांचा जो विचार आहे त्याला शिवशक्ती असे म्हणतात. शुद्ध सत्वगुणाची मांडणी करून अर्धमात्रा तिन्ही गुणांची करणी पुढे प्रकट झाली. मन, माया, अंतरात्मा, चौदा जिनसांची सीमा, विद्यमान ज्ञानात्मा त्याच्याठायी आहेत.

चौदा नावे हा दुसरा जिन्नस, तर तिसरा जिन्नस म्हणजे पंचमहाभूते. इथे पाहिल्यावर जाणीव थोडी आहे आदि अंत यांना प्रत्यक्ष उत्पत्ती आणि नाश आहे. सांगितलेल्या चारी खाणी म्हणजे चौथा जिन्नस. चारी खाणी, अनंत प्राणी याच्यातून जाणीव प्रगट झाली यातून ही मांडणी स्पष्ट होते. थोडंसं बीज पेरलं की पुढे त्याचं उदंड होतं तसं खाणी, वाणी प्रगटल्याने आत्म्याचे झाले. अशी ही सत्ता निर्माण झाली, थोडी होती ती उदंड झाली, मनुष्याच्या वेषांमध्ये सृष्टी नानाप्रकारे भोगली. प्राणी मारून श्वापद पळते, या शिवाय त्याला काय कळतं? नाना भोग असतात ते मनुष्य देहामध्ये माणसाला मिळतात. नाना शब्द, नाना स्पर्श, नाना रूप, नाना रस, नाना गंध काय आहे हे नरदेहच जाणतो.

अमोल रत्ने, नाना वस्त्र, नाना वाहन, नाना शास्त्र, कला, नरदेह जाणतो. पृथ्वीवर स्थळी सत्ता आहे ती नाना विद्या, कला, लीला, नाना धारणा यांची. नरदेह प्राप्त झाल्यावर सगळं दृश्य पहावं, तानमान सांभाळावं, सारासार विचार करावा. इहलोक आणि परलोक नाना प्रकाराचा विवेक आणि अविवेक मनुष्यच जाणतो. बाकीच्यांना काय समजणार? या ब्रम्हांड रचनेत नाना तऱ्हेच्या पिंडांचा समावेश आहे. नाना कल्पना आहेत. नाना प्रकारची धारणा मनुष्य जाणतो. अष्टभोग म्हणजे पंचविषय आणि त्रिगुण मिळून अष्टभोग होतात. नवरस, नाना प्रकारचा विलास, वाच्यांश, लक्ष्यांश, सारांश मनुष्यच जाणू शकतो. मनुष्याने सगळ्यांना ताब्यात ठेवले आहे.

मनुष्याने देवालाही पाळले आहे . हे सगळं नरदेहयोगामुळे समजते. नरदेह हा दुर्लभ आहे. त्याच्यामुळे अलभ्य लाभ होतो. जे दुर्लभ आहे ते सुलभ होते. हा वरवरचा दिसणारा देह म्हणजे काबाडकष्ट करणारा परंतु हा नरदेह म्हणजे मोठे घबाड आहे, मात्र तिथे विवेक रचना पाहिजे. जिथे आळस केला, देव ओळखला नाही, तो सर्वस्वी बुडाला. प्रत्यय घेत श्रवण केलं,अंतकरण नेहमी विचारशील ठेवलं तर नर म्हणजेच नारायण आहे, हा अनुभव येतो. ज्याला स्वतःला पोहता येतं त्याला दुसऱ्याच्या कासेला धरावे लागत नाही. त्यामुळे सगळं काही स्वतंत्रपणे शोधावं. सगळं शोधून राहिल्यावर त्याला संदेह राहणार नाही. पुढे काय होणार हे त्याचे तोच जाणेल. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार जिन्नस नाम समास पंचम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.