दशक २० समास ६ आत्मा गुण निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. भूमंडळ पाहायला गेलं तर ठायी ठायी पाणी आहे. तर कित्येक ओसाड माळराने आहेत तिथे जल नसलेली पृथ्वी आहे. त्याप्रमाणे काही दृश्य विस्तारलेले आहे, काही जाणीव असल्याने शोभत आहेत तर कित्येक उरलेली दृश्ये जाणीवरहित आहेत. चारी खाणी चारी वाणी ८४ लक्ष जीवयोनी असे शास्त्रात बोलले आहे. जलजा
नवलक्शाश्च, दशलक्शाश्च पक्षिणा:
कृमयो रुद्र लक्शाश्च विशाल्ल्क्ष गवादया:
स्थावरास्त्रीन्लक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवा:
पापपुण्य समं कृत्वा नरयोनीस्तू जायते..
जगात नऊ लाख जलचर आहेत, दहा लाख पक्षी आहेत. अकरा लक्ष कृमी, दहा लक्ष खेचर, नवलक्ष जलचर, तीस लक्ष स्थावर पशु आहेत असं शास्त्रात सांगितले आहे. अशी ८४ योनी आहेत. असे जाणते प्राणी आहेत. देहाची मांडणी अनंत आहे, त्याला मर्यादा नाही. अनंत प्राणी होतात, जातात त्यांचे जगात अधिष्ठान आहे. त्यांना जगावेगळी स्थिती नाही. पुढे पंचभुते स्पष्ट दिशेला पोहोचलेली आहेत. कोणी स्पष्ट दिसणारी म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, काही अदृश्य म्हणजे वायू आणि आकाशरुपामध्ये आहेत. अंतरात्म्याची ओळख म्हणजे हालचाल. त्याची माहिती सावधपणे ऐका. सुखदुःख जाणता जीव तसाच सदाशिव जाणावा.
अंतःकरण पंचक म्हणजे अपूर्व आत्म्याचा अंश आहे. स्थूल देहातील आकाशाचे गुण म्हणजे आत्म्याचे अंश. काम क्रोध शोक मोह भय अज्ञान व शून्यत्व सत्व रज तम हे आत्म्याचे गुण आहेत. नाना चालना, नाना घृती, नवविधा भक्ती, चतुर्विध मुक्ती, अलिप्तपण, सत्ता, पुरातन असलेले चैतन्य, श्रवण मनन विवरण हे आत्म्याचे गुण आहेत. दृश्य द्रष्टा दर्शन हे आत्म्याचे गुण आहेत. वेद शास्त्र पुराण अर्थ गुप्त चालत असलेला परमार्थ हे सर्वज्ञपणे समर्थ आत्म्याचे गुण आहेत. बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, शुद्ध विचार पाहणे, उपदेश आणि जागृती हे आत्म्याचे गुण आहेत. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्यावस्था, प्रकृती-पुरुष, मूळमाया, पिंड, ब्रम्हांड, अष्टकाया हे आत्म्याचे गुण आहेत.
परमात्मा आणि परमेश्वरी म्हणजे जगदात्मा आणि जगदीश्वरी, महेश आणि माहेश्वरी हे आत्म्याचे गुण आहेत. नाम आणि रूप जितके सूक्ष्म आहे तितकं आत्म्याचं स्वरूप आहे. ही अनेक नावे सांगितली तशी असंख्य आहेत, त्यांना सीमा नाही. आदिशक्ती, शिवशक्ती, मुख्य मूळमाया, सर्व शक्ती, नानाजींनस उत्पत्ती, स्थिती हे सर्व आत्म्याचे गुण आहेत. पूर्व पक्ष आणि सिद्धांत, गाणे, वाजवणे, संगीत नाना अद्भुत विद्या हे आत्म्याचे गुण आहेत. ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, असदवृत्ती, सदवृत्ती, केवळ जाणीव मात्र अर्थात विकारापूपूर्वीची केवळ स्मृती हे आत्म्याचे गुण आहेत. पिंड ब्रम्हांड, तत्वांची परीक्षा, तत्त्वातत्त्वांचा निवाडा, उघड विचार पाहणे, हे आत्म्याचे गुण आहेत.
नाना ध्यान, अनुसंधान, नाना स्थिती, नाना ज्ञान, अनन्य आत्मनिवेदन हे आत्म्याचे गुण आहेत. तेहतीस कोटी देव, ८८ सहस्त्र ऋषीवर, भूत, खेचर, अपार हे आत्म्याचे गुण आहेत. भुतावळी, छपन्न कोटी चामुंडा, ९ कोटी कात्यायनी हे आत्म्याचे गुण आहेत. नाना नक्षत्र, चंद्र सूर्य तारा मंडळ, ग्रहमंडळ हे आत्म्याचे गुण आहेत. देव दानव मानव नाना प्रकारचे जीव, सगळा भावभाव हे पाहिले तर सगळे आत्म्याचे गुण आहेत. आत्म्याचे नाना गुण आहेत. ब्रह्मनिर्विकार निर्गुण आहे. जाणीव अव्यक्त असो वा परिपूर्ण असो ती अंतरात्म्याचेच रूप होय. आत्मारामाची उपासना केल्यावर निस्संदेहपणे निरंजन अवस्थेला पोहोचता येते, तिथे अनुमानाला जागा नाही. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मा गुण निरूपण नाम समास षष्ठ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७