दशक २० समास सात आत्म निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. अनिर्वाच्य समाधान झालं तर ते बोललं पाहिजे.बोलल्याने समाधान गेले हे घडत नाही. काही सोडावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही, एक विचार शोधून पाहिला म्हणजे कळतं. मुख्य काशी विश्वेश्वर, सेतुबंध रामेश्वर, शैल मल्लिकार्जुन,भीमाशंकर हे आत्म्याचे गुण आहेत.जशी मुख्य बारालिंगे आहेत त्यापेक्षा वेगळी अनंत लिंगे आहेत. ही जी लिंगे आहेत त्याची प्रचिती जग घेत आहे. भूमंडळावर अनंत शक्ती आहेत, नाना साक्षात्कार, चमत्कार होतात. नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती दिसतात हे आत्म्याचे गुण आहेत. नाना सिद्धांची सामर्थ्ये, नाना मंत्रांचे सामर्थ्य, नाना इतर सामर्थ्य हे आत्म्याचे गुण आहेत.
नाना तीर्थांचे सामर्थ्य, नाना क्षेत्रांचे सामर्थ्य, नाना भुमंडळाचे सामर्थ्य हे आत्म्याचे गुण आहेत. जितके काही उत्तम गुण आहेत ते सर्व आत्म्याचे लक्षण आहे. बरं वाईट जितकं आहे तितकं आत्म्यामुळेच आहे. शुद्ध आत्मा उत्तम गुणी असतो. अशुद्ध आत्मा अवलक्षणी असतो. बरी वाईट सगळी करणी आत्म्याची असते. नाना अभिमान धरणे, नाना प्रतिसृष्टी करणे, नाना शापउशाःप देणे हे आत्म्याचे लक्षण आहे. पिंडाचा शोध घ्यावा, तत्त्वांचा पिंड शोधावा तत्व शोधल्यावर सर्व पिंड समजतो. जड देह हा भूतांचा तर चंचळता हा आत्म्याचा गुण आहे. निश्चळ हा ब्रम्हाचा गुण आहे. निश्चळ चंचल आणि जड यांचा अनुभव आपल्या देहातच घ्यावा. अनुभवाशिवाय असलेले ज्ञान व्यर्थ होय. पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा समजतो. देह पाहता पाहता जड पडतो. जड जितकं पडतं, चंचळ तितकं निघून जातं. जड-चंचलाचे रूप प्रत्ययाला आलं. सगळ्यांच्या ठायी निश्चल आहे हे तर पहावे लागत नाही.
निश्चलाला गुणविकार नाही. जसं पिंड तसं ब्रम्हांड हा विचार उघड दिसतो. जड आणि चंचळ गेले तर परब्रह्मच आहे. महाभुतांचा दणकट बाह्य आकार केला, आत्मा घालून पुतळा झाला अशा प्रकारे सृष्टीचा गलबला चालला. आत्मा म्हणजेच माया विकार करते आणि ब्रह्मावर आळ घालते. प्रत्ययाने सर्व काही समजतो तोच भला. ब्रह्म व्यापक अखंड आहे. इतरांची व्यापकता खंडित सापेक्ष मर्यादित आहे. शोधून पाहिलं तर जड काहीच सापडत नाही. गगन खंडित करता येत नाही, गगनाचं काय नष्ट होईल? महाप्रलय झाला, सृष्टीचा संहार झाला तरी काही नष्ट होणार नाही. जे संहारामध्ये सापडले ते सहजपणे नाशिवंत झाले. शहाण्यांनी विवेक प्रलयाच्या योगाने शाश्वत काय हे ठरवले पाहिजे. हे कळलं नाही तर कोडं वाटतं. सगळं उघड दिसतं म्हणून एकांतात बसून विचार पहावा. प्रत्यय असलेले संत मिळाले आणि एकांतासारखा एकांत मिळाला की मग सावध चित्ताने नाना चर्चा केली पाहिजे. पहिल्याशिवाय कळत नाही, कळता कळता संदेह नाहीसा होतो, विवेक पाहिला तर मायाजाळ कुठेच नाही. गगनामध्ये आभाळ आले, नंतर सगळे उडून गेलं.
त्याप्रमाणे अंतरात्म्याशी झालेल्या तादात्म्यामुळे दृश्य सत्य वाटते, परंतु निश्चल साक्षात्कारामुळे ते मिथ्या ठरते.आपल्यापासून ते परब्रम्हापर्यंत विचार करून विवरण केलं तर एक निश्चय होतो आणि तो कधीही चळत नाही. वरवरचे जे निश्चय असतात अंदाजपंचे केलेले असतात,त्यांनी काहीही साध्य होत नाही. ज्या पुरुषांना प्रचिती असते ते या गोष्टी मानत नाहीत. अनुमानाचं उगाच बोलतात, अनुमानाचं काही कामाचं नाही. तिथे अशा प्रकारच्या विचारांचे काम नाही. अंदाजपंचे विचार म्हणजे अविचार. कित्येक काहीतरी एकच धरून बसतात. मात्र निर्विकार स्वरूप सर्वत्र एकच आहे परंतु विकारी जाणीवेत अनेकत्व असल्याने व्यवहारात सर्व सारखेच मानणे अयोग्य होय. असा भ्रष्टाचार करू नये. अथवा दृश्य देह, अंतरात्मा हे सर्व प्रत्यक्ष ब्रह्म मानणे अयोग्य होय. यामुळे साधन भ्रष्ट होण्याची भीती असते. कृत्रिम सगळं सोडावं, शुद्ध असेल तेवढे घ्यावे. जाणीवपूर्वक सार आणि असार यातून निवड करावी. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्म निरूपण नाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७