भावार्थ दासबोध – भाग २५६

निरुपण : पद्माकर देशपांडे

1

दशक २० समास दहावा विमळ ब्रह्म निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. धरायला गेलं तर धरता येत नाही, टाकायला गेलं तर टाकता येत नाही जिथे तिथे सर्वत्र आहे ते म्हणजे परब्रम्ह. जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख होते, काही केल्या सन्मुखता चुकत नाही. बसलेला माणूस उठून गेला तिथे आकाशच राहीले, चहुकडे पाहिलं तरी आकाश समोरच आहे! जिकडे तिकडे प्राणी पळून जातात तिकडे आकाशच भोवती असतं. आकाशाबाहेर त्यांनी कसं जावं? जिकडेतिकडे प्राण्यांनी पाहिलं तरी तेच समोरच आहे मध्यान्ही सर्वांच्या मस्तकावर तळपणाऱ्या सूर्यासारखे! पण तो सूर्य आहे एकांगी, मर्यादित. त्याचा दृष्टांत हा काही ब्रह्माला देता येत नाही. काही एक चमत्कार म्हणून देऊन पहिला. नाना तीर्थ नाना देशामध्ये असतात ती पाहण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात,

तसं परब्रम्ह असे शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाही. बसल्या ठायी ते तुम्हाला प्राप्त होतं. प्राणी बसून राहिला किंवा जोरात पळून जायला लागला तरी परब्रह्म त्याच्या सोबत येते. पक्षी अंतराळामध्ये गेला की त्याच्याभोवती आकाशच असते त्याप्रमाणे सर्व प्राण्यांना ब्रह्म व्यापून आहे. परब्रम्ह पोकळ घनदाट, ब्रह्म शेवटचा शेवट, ज्याचे त्याचे ब्रह्म नीट सर्वकाळ जवळ. आत-बाहेर सगळीकडे, ब्रह्मांडामध्ये ब्रह्म दाटलेलं आहे. अरे त्या विमलाची सर कुणालाही नाही! वैकुंठ, कैलास, स्वर्गलोकी, इंद्रलोकी चौदा लोकांचे पाताळ लोक तिथेही ब्रह्म आहे. काशीपासून रामेश्वरपर्यंत सगळं अपार दाटले आहे. पलीकडे पलीकडे कितीही लांब वर गेले तरी त्याचा अंत नाही. परब्रम्ह हे एकमेव आहेत त्यानेच सगळ्यांना व्यापले आहे. सगळ्यांनाच स्पर्शून राहिलेले, सगळ्यांच्या ठायी तेच आहे. परब्रम्ह पावसाने भिजत नाही किंवा चिखलाने भरत नाही.

पूर आला तरी ते वाहत नाही. पुराबरोबर ते एकाच वेळी खाली वर डावीकडे उजवीकडे दोन्हीकडे सगळीकडे आहे. ते सर्वत्र व्यापून आहे. आकाशाचा डोह उसळला तरी त्याला भरती येत नाही. त्याप्रमाणे असंभाव्यपणे ब्रह्म सगळीकडे पसरलेले आहे. एक जिन्सी, दृश्यभास नसल्यामुळे गगन एकसारखं उदास शून्य वाटतं. पण जिथे दृश्य भास नाही, भास नसलेले निराभास ते परब्रह्म जाणावे! संत साधू महानुभाव देव दान मानव सगळ्यांचा विसावा आणि विश्रांतीचे ठिकाण म्हणजे ब्रह्म. शेवटी कुणीकडे जावं? कुणीकडे काय पहावं? जे असंभाव्य आहे ते कसं काय शोधावं? स्थूल नाही सूक्ष्म नाही काही एकासारखं नाही. ज्ञानदुष्टीशिवाय समाधान नाही. सर्व प्रकृतीचा निरास केल्यानंतरच मग निराभास ब्रह्म स्वरूपाशी तादात्म्य पावता येते.

मात्र त्याला वेगळेपणाने पाहू गेलो तर सर्वत्र उदासवाणे आकाशच दिसेल. तात्पर्य; ब्रह्मस्वरूप पाहता येणार नाही, होता येईल. ब्रह्म व्यापक हे तर खरं, दृश्य आहे का? तर त्याचे उत्तर, व्यापाशिवाय कोणत्या प्रकारे व्यापक म्हणावे? ब्रह्माला शब्दच नाही. त्याची कल्पना करता येत नाही. कल्पनातीत निरंजन, ते विवेकाने ओळखावं. शुद्ध सार श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मनन, विज्ञानस्वरूप झाल्याने सहजच मनातीत होता येत. या नित्य वाचनानंतर येथून पुढील १२ ओव्या म्हणण्याचा परिपाठ आहे. संसार सफल झाला, साधनाचे फळ मिळालं. निर्गुण निश्चळ ब्रह्म अंतरी बिंबलं. मायेचा हिशोब झाला. तत्वांचा निवाडा झाला. ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर साक्षात्कारानंतर साधनाचं कारण उरले नाही. स्वप्नामध्ये जे जे दिसलं ते जागृती मध्ये उडून गेलं. सहजपणे आणि अनिर्वाच्य झालं. ते बोलता येत नाही असं हे विवेकाने जाणावे. प्रत्यय घेऊन खुणगाठ बांधावी.

जन्म मृत्यू म्हणजे निव्वळ शून्य आहे. भक्तांच्या अभिमानामुळे दाशरथी रामाने कृपा केली त्यातून समर्थ कृपेची वचने निर्माण झाली आहेत ती म्हणजे हा दासबोध. वीस दशकांचा हा दासबोध आहे. श्रवणाद्वारे त्याचा शोध घेतला, त्याचे मनन करून अर्थ जाणून घेतला म्हणजे परमार्थ साध्य होतो. वीस दशक दोनशे समास साधकाने सावकाश पाहावे. विचारपूर्वक ते हळूहळू पाहिले की कळायला लागेल. ग्रंथाचे पारायण करावं. पारायणाचं काय प्रयोजन? प्रत्यय यायला पाहिजे तो महत्वाचा आहे. देह हा पंच भूतांचा आहे. आत्मा हा तेथील कर्ता आहे मग कवित्व हा प्रकार मनुष्याचा कशावरून? सगळं करणं जगदीशाचे आहे आणि कवित्वच काय माणसाचं? अशा अप्रमाण बोलण्याचं कारण काय? सगळ्या देहाचा आढावा घेतला तर तत्वसमुदाय उडाला; तिथे एक कोणत्या पदार्थाला आपलं म्हणायचं? अशी ही विचाराची कामें आहेत. उगीच भ्रमात भ्रमिष्टपणा करू नये. सगळे काही जगदेश्वराने नियमानुसार केलेलं आहे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विमळ ब्रह्म निरूपण नाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

(गोदावरी काठी असलेल्या नाशिकमधील पद्माकर रघुनाथ देशपांडे यांनी भावार्थ दासबोध लेखन कार्तिक कृ. नवमी, दि.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण केले.
नाशिकमधील रेडीओ विश्वास आणि मिरज येथील रेडीओ मराठी तरंगवरून ते नियमित प्रसारित करण्यात आले.)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

निरूपणकाराचे मनोगत
गेल्या सुमारे आठ महिन्यापासून जनस्थान या वृत्त पोर्टलवर भावार्थ दासबोध हे माझे लेखन प्रसिद्ध होत आहे. आता त्याचा समारोप होताना संमिश्र भावना आहेत. हे लेखन वाचून अनेकांनी मोठी दाद दिली, अनेकांना हे लेखन आवडले. रोजच्या धबडग्यात थोडा थोडा दासबोध वाचून समजून घेता आला. कारण एवढा मोठा ग्रंथ मुळातून वाचणे आणि समजावून घेणे ही अवघड प्रक्रिया आहे. मला याचा आनंद वाटतो की मी संपूर्ण ग्रंथाचा अर्थ स्पष्ट केला. त्यात कधी पुनरुक्ती आली असली तरी मुळात आहे तसेच फक्त आजच्या भाषेत सांगितलेले आहे. त्यात माझ्या पदरचे काही सांगितले नाही तसेच काही वगळले देखील नाही. सर्व लेखनाचे श्रेय श्री समर्थ रामदास स्वामी यांचे आहे.

त्याबरोबरच हे लेखन नियमित प्रसिद्ध करून माझे दीर्घकाळपासूनचे सहकारी आणि मित्र अभय ओझरकर यांनी मोठे काम केले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त करतो. यापूर्वी मी स्वबोध ज्ञानेश्वरी याच पद्धतीने सादर केली होती. त्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अशाच प्रकारे अन्य काही लेखन आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न राहणार आहेच, त्याला देखील चांगला प्रतिसाद द्यावा, दाद द्यावी आणि माझ्याकडून उत्तम लेखन करवून घ्यावे अशी रसिक वाचक, संपादक अभय ओझरकर आणि सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे.सर्वाना खूप खूप धन्यवाद!
आपला कृपाभिलाषी
पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. दासबोध चे एके एके करुन दोनशे छपन्न भाग वाचायला मिळाले व त्यातून नवीन गोष्टी वाचायला मिळाल्या श्री पद्यमाकर देशपांडे याचे मनक पुर्व आभार.

कॉपी करू नका.