मुंबई,दि.७ डिसेंबर २०२३ –दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान आत्महत्या प्रकरणामध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ सुत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सुजाता सौनिक एसआयटी संदर्भात आजच चौकशीची ऑर्डर काढणार असल्याचे समजते आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना आता चौकशीला सामोरे जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही.
मागील काही दिवसांत दिशा सालियन हत्या प्रकरण फारच ढवळून निघालं आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक आमदारांनी आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्याने उपस्थित करण्यात आला होता. दिशा सालियान प्रकरणामध्ये सध्या सत्तेत असलेलं एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार विशेष तुकडी (एसआयटी) स्थापन करुन चौकशी करणार आहे.
दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी मागील काही काळापासून सातत्याने काही आमदारांकडून केली जात होती.याच मागणीची दखल घेत मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. आता लवकरच ही चौकशी केली जाईल असं सूत्रांचं म्हणणं आहे.