गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या आमदारांचा एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न ?

सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड असीम सरोदेंचा आरोप

0

 पुणे,दि. ४ मार्च २०२४ – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत ठरलेलं विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेनेतून फुटून राज्याबाहेर पळालेले  आमदारांपैकी काहींनी गुवाहाटीच्या हॉटेलात  एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता,’ असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

धाराशीवमध्ये रविवारी ‘निर्भया बनो’ सभेत बोलताना सरोदे यांनी शिंदे गटातील आमदारांचा संदर्भ देत जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे आरोप केलेत. “गुवाहाटीमधील त्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेले होते. जवळपास 8 किलोमीटर अंतर कापल्यानंतर त्यांना पुन्हा पकडून हॉटेलमध्ये आणण्यात आलं. त्यांना हॉटेलमध्ये ठेऊन मारहाण करण्यात आली. यानंतर आणखीन एका आमदारालाही मारहाण करण्यात आली. या दोन्ही आमदारांना कोणी मारहाण केली?” असा सवाल सरोदेंनी जाहीर भाषणात केला. एवढ्यावरच न थांबता सरोदेंनी या कालावधीमध्ये या हॉटेलमधील एअरहोस्टसवर विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे प्रयत्न झाल्याचंही म्हटलं आहे.

लैंगिक छळ कोणी केला?
सरोदे यांनी थेट कोणत्याही आमदाराचा उल्लेख न करता लैंगिक अत्याचाराचे प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. तसेच शिंदे गटाचे आमदार सत्तासंघर्षादरम्यान जेव्हा या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते तेव्हाचा उल्लेख करत सरोदेंनी हा दावा केला आहे. “गुवाहाटीमधील ज्या हॉटेलमध्ये हे सगळे (शिंदे गटाचे बंडखोर आमदार) थांहलेले तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. मात्र ‘स्पाईस जेट’ आणि ‘इंडिगो’ या २ विमान कंपन्यांसाठी काही खोल्या आधीपासूनच बूक होत्या. त्या हॉटेल बरोबर त्यांचं वर्षाचं कंत्राट होतं. वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. त्यांचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला? हे सर्व महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. दारुच्या नशेत हे नेते झिंगत होते. हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही,” असं सरोदे आपल्या भाषणात म्हणाले.

कोणत्या हॉटेलमध्ये होते हे आमदार?
काही आठवड्यांपूर्वी पुण्यातील ‘निर्भया बनो’ कार्यक्रमाआधी पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला झाला त्यावेळी असीम सरोदे हे त्यांच्याबरोबर त्यांच्या कारमध्येच होते.आता सरोदेंनी केलेल्या गंभीर आरोपांवर शिंदे गट काय प्रतिक्रिया देतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीमध्ये रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.असीम सरोदे यांचे संपूर्ण भाषण

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.