अफगाणिस्तान,दि. ११ ऑक्टोबर २०२३ –आज बुधवारी सकाळी पश्चिम अफगाणिस्तानात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ६.३ इतकी मोजली गेली. याआधी शनिवारी याच ठिकाणी झालेल्या जोरदार भूकंपामुळे दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेने सांगितले की, बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात प्रांताची राजधानी हेरात पासून २८ किलोमीटर अंतरावर जमिनीपासून दहा किलोमीटर खोलीवर होता. शनिवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू प्रांतीय राजधानीच्या वायव्येस ४० किलोमीटर अंतरावर होता. हे भूकंपाचे धक्के जमिनीखाली १० किमी (६.२१मैल) जाणवले. या पूर्वी शनिवारी झालेल्या भूकंपामुळे अफगाणिस्तानात मोठी हानी झाली होती. सलग सहा भूकंपाचे धक्के बसल्याने ४ हजार नागरिक ठार झाले होते. या धक्क्यातून सावरत असतांना आज पुन्हा भूकंप झाला.
त्या भूकंपानंतर या भागात अनेक जोरदार हादरे बसले आहेत. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारच्या भूकंपात हेरातमध्ये २,००० हून अधिक लोक मरण पावले आणि हजारो जखमी झाले.मात्र मृत आणि जखमींची नेमकी संख्या त्यांनी दिली नाही.
आज सकाळच्या भूकंपामुळे जीवित व वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती तात्काळ उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी भूकंप झाला तेथील गावे आधीच मोडकळीस आली आहेत. नायब रफी गावात पूर्वी सुमारे २,५०० लोक राहत होते.
लोकांनी सांगितले की,भूकंपाच्या वेळी कामासाठी बाहेर गेलेल्या पुरुषांशिवाय कोणीही जिवंत राहिले नाही. लोक मृतदेहाच्या सामूहिक दफनासाठी मोठी कबर खोदण्यात व्यस्त आहेत. तालिबानने सांगितले की, २० गावांतील किमान दोन हजार घरे उद्ध्वस्त झाली आहेत. भूकंपग्रस्त भागात एकच सरकारी रुग्णालय आहे.
An earthquake with a magnitude of 6.1 on the Richter Scale hit Afghanistan at 06:11 am today: National Center for Seismology pic.twitter.com/ta7McYoN8n
— ANI (@ANI) October 11, 2023