तब्बल ७ तासानंतर व्हॉटअॅपसह फेसबुक आणि इन्स्टाग्राम सुरु
नवी दिल्ली -काल रात्री भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजून ११ मिनिटाने जगभरातील फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामने काम करणे बंद केले. तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या सेवा ठप्प झाल्याचे बोलण्यात येत असले तरी हा तांत्रिक बिघाड म्हणजे DNS (डोमेन नेम सिस्टीम) मुळे हा बिघाड झाल्याची चर्चा आहे मात्र कंपनीने नेमके कारण उघड केलेले नाही. इंटरनेटवर ग्लोबल आऊटरेज म्हणजेच जागतिक स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेच्या तब्बल सात तासांनंतर तिन्ही सेवा हळूहळू पुन्हा रुळावर येत आहेत. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.
भारतीय वेळेनुसार ४ वाजून १९ मिनिटाने या सेवा पूर्ववत सुरु होण्यास सुरुवातझाली.फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपचे सर्व्हर एकमेकांशी जोडलेले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे सर्व फेसबुकच्या मालकीचे आहेत, म्हणूनच या तिघांचे सर्व्हर देखील एकमेकांशी जोडलेले आहेत. ज्यामुळे तिघेही थोड्या बदलाने प्रभावित झालेत. मात्र, फेसबुकच्या सर्व्हरमध्ये झालेल्या बदलामुळे ही समस्या निर्माण झाली. मात्र, ठोस कारण स्पष्ट झालेले नाही.
फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसलाय. सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४४ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अवघ्या काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही मार्क झुकरबर्ग एक स्थानाने खाली घसरला आहे.
सायबर हल्ला ही असू शकतो?
हा एक सायबर हल्ला देखील असू शकतो. जसा-जसा वेळ जाईल किंवा उद्यापर्यंत हा सायबर हल्ला आहे की सर्व्हर डाऊन आहे, याची माहिती समोर येईल, अशा प्रतिक्रिया सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.