नाशिक, दि. ९ जुलै २०२५ – AI-Traffic Signals Nashik शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि सिंहस्थ २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता वाहतुकीचे शिस्तबद्ध नियमन करण्यासाठी ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधारित सिग्नल बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरातील २८ ठिकाणी हे ‘स्मार्ट’ सिग्नल कार्यान्वित होणार आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलसह आडगाव नाका, गंगापूर रोड, कॉलेज रोड, त्र्यंबक रोड यांसारख्या प्रमुख ठिकाणी दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पोलिस विभागाच्या शिफारशीवरून महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
‘एआय’ सिग्नलची वैशिष्ट्ये
या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक सिग्नल मार्गिकेवरील वाहनांची संख्या ओळखून तिथे सिग्नलला अधिक वेळ दिला जाईल. ज्या मार्गिकांवर गर्दी कमी असेल, तिथे सिग्नल कमी वेळासाठी चालू राहील. यामुळे वाहतुकीचा वेग सुरळीत होईल आणि नागरिकांचा मौल्यवान वेळही वाचेल. नागपूरमध्ये या तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग सुरू असून, आता नाशिकमध्येही द्वारका सर्कलपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
कामाची गती वाढवली
स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांनी सांगितले की, “जुलै अखेरीस यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पार पडेल आणि सप्टेंबरपासून प्रत्यक्ष काम सुरू होईल. सिंहस्थापूर्वी सर्व २८ ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.”
पार्किंग प्रश्नावरही उपाय
वाहतूक कोंडीचा एक मुख्य कारण म्हणजे पार्किंग अभाव. शहरातील रस्ते अरुंद असून, वाढत्या वाहनसंख्येमुळे रस्त्यांवरच पार्किंग केली जाते. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी ३५ पार्किंग स्थळे पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पार्किंग व सिग्नल दोन्ही आघाड्यांवर उपाययोजना राबवली जात आहे.
या २८ ठिकाणी बसणार एआय सिग्नल (AI-Traffic Signals Nashik)
पारिजातनगर, बी. डी. कामगार चौक, अमृतधाम, सारडा सर्कल, मॅरेथॉन चौक, सिद्धिविनायक चौक, संभाजीनगर रोड, डी. के. नगर, निर्मला कॉन्व्हेंट, मायको सर्कल, भोसला टी पॉइंट, राणे नगर, पवननगर, मॉडेल चौक, सातपूर सर्कल, दत्त चौक, लेखानगर, काठे गल्ली, वडाळा टी पॉइंट, एचडीएफसी चौक, तिबेटियन मार्केट, माऊली लॉन्स, कार्बन नाका, गरवारे पॉइंट, पाथर्डी फाटा, दत्त मंदिर, अंबड लिंक रोड, पंचवटी.
नाशिकमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित वाहतूक सिग्नल बसवणे ही काळाची गरज ठरली आहे. त्यामुळे वाहतूक नियमनात सुधारणा होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असे स्पष्ट संकेत आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.