आई तुळजाभवानी’ची महागाथा ३ ऑक्टोबरपासून ‘कलर्स मराठी’वर

0

Navratri festival 2024
Navratri festival 2024

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

मुंबई,दि,२ ऑक्टोबर २०२४ -‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘आई राजा उदो-उदो’, प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात गुंजणारा हा जयघोष. आई तुळजाभवानीच्या साक्षीने,तिच्या नित्य नामस्मरणाने अवघे मराठी विश्व रोजचा जगण्याचा श्वास घेते. इथल्या मातीतल्या माणसांची कुलस्वामिनी असलेल्या ‘आई तुळजाभवानी’ची महती अपरंपार आहे. ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका प्रेक्षकांना येत्या ३ ऑक्टोबरपासून रात्री ९:००  वाजता प्रेक्षकांना आपल्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची पहिली झलक समोर आली होती. त्यामुळे प्रेक्षकांना आता मालिकेची प्रतीक्षा आहे. अभिनेत्री पूजा काळे या मालिकेत ‘आई तुळजाभवानी’चे पात्र साकारणार आहे.

बलाढ्य महिषासुराचा वध करणारी  देवी तुळजाभवानी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची आई आहे. मायेने जवळ घेणारी, लेकरांचा हट्ट पुरवणारी, योग्य मार्ग दाखवणारी आणि आपल्यावर संकट आलं तर त्वरित धावणारी अशा या ‘आई तुळजाभवानी’ची महागाथा लवकरच ‘कलर्स मराठी’ वाहिनी घेऊन येत आहे.

भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येत दुष्टांचा नाश करणारी देवी त्वरिता- तुरजा – तुळजा…… ते अपरंपार माया करणारी आई तुळजाभवानी हा प्रवास कसा घडला याची प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सुकता असलेली गोष्ट या महागाथेत उलगडणार आहे.

अनेक असुरांचा संहार करत वेळोवेळी भक्तांचे रक्षण देवीने कसे केले,महिषासुर आणि देवीचे चाललेल प्रदीर्घ काळ युद्ध नेमके कसे लढले गेले. दैत्यमाता दीतीची महत्वाकांक्षा नेमकी काय होती, ही आजवर माहीत नसलेली गोष्ट उलगडणार आहेच पण त्याच बरोबर देवीला पृथ्वीतलावर साथ देणारे महादेव  आणि पृथ्वीवर भक्त कल्याणात  रममाण झालेली तुळजारुपातली पार्वती माता यांचे पतीपत्नीचे गोड गमतीदार नातेही पाहायला मिळेल.

कधीच आई होऊ शकणार नाही हा देवी पार्वतींना असलेला  शाप, ते त्यांचा “जगदजननी” जगन्माता हा सगळ्या विश्वाचे आईपण जपणारा  प्रवास प्रत्यक्ष महादेवांना ही भावनिक करणारा होता. या शापाची आणि आईपणाची ही फारशी माहीत नसलेली मायेची गोष्ट या महागाथेची उत्सुकता वाढवणारी आहे.

प्रसंगी योद्धा, पत्नी आणि अनंतकाळ माता रूपात भेटणाऱ्या देवीच्या  तामस , राजस आणि  सात्विक शक्तींचा प्रत्यय देणारा आणि तुळजाभवानी देवीच्या आईपणाची  साक्ष देणारा आहे हा देवीच्या अवताराचा आध्यात्मिक प्रवास प्रेक्षकांसाठी निश्चितच वेगळा ठरणार आहे. पार्वती मातेच्या या अवतारापाठी  जनसामान्यांना प्रेरणा देण्याची दैवी रचना होती म्हणूनच मातेच्या कर्तव्याने प्रत्येकाचे आत्मबळ जागृत करणाऱ्या आपल्या आईची ही गोष्ट  ‘आई तुळजाभवानी’ पाहण्यास संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे.

‘आई तुळजाभवानी’ मालिकेबद्दल बोलताना प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) – केदार शिंदे म्हणाले,”आई तुळजाभवानी’ ही फक्त मालिका नव्हे तर महाराष्ट्रातील  प्रत्येक भक्ताच्या भक्तीचा सण आहे. अतिशय भव्य-दिव्य असणारी ही मालिका आहे. तुळजाभवानी देवीच्या पौराणिक कथांना नव्या दृष्टिकोनातून उलगडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. महाष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती या गाथेला आपलंसं करेल. कारण ही मालिका फक्त मनोरंजनात्मक नसून आपला सांस्कृतिक वारसा जपणारीदेखील आहे”.’आई तुळजाभवानी’ ही मालिका रात्री ९:०० वाजता तर ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना रात्री ९:३० वाजता पाहायला मिळणार आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!