६ वर्षांनंतर अजय पूरकर यांचा मालिकेत धमाकेदार पुनरागमन!
स्टार प्रवाहच्या ‘नशिबवान’ मालिकेत साकारणार भयानक खलनायक
मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२५ – Ajay Purkar comeback मराठी मालिकांच्या दुनियेत आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारे सुप्रसिद्ध अभिनेता अजय पूरकर तब्बल सहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील नवी मालिका ‘नशिबवान’ यात ते प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करणारी खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
स्टार प्रवाह ही वाहिनी गेली पाच वर्षं दर्जेदार आणि कथानकप्रधान मालिका सादर करत आहे. या मालिकांच्या माध्यमातून वाहिनीने केवळ प्रेक्षकांचं मनोरंजनच केलं नाही, तर सामाजिक भावनांनाही हात घातला आहे. याच प्रवासात आता आणखी एक आगळीवेगळी मालिका ‘नशिबवान’ प्रेक्षकांसमोर येत आहे.
‘नशिबवान’ची कथा(Ajay Purkar comeback)
ही मालिका आहे गिरीजा नावाच्या तरुणीची, जिच्या आयुष्यात अनेक संकटं आहेत. लहान वयात आई-वडिलांचं छत्र हरवलेलं, घरची जबाबदारी खांद्यावर आलेली आणि जगण्यासाठी सततचा संघर्ष – अशा परिस्थितीतही गिरीजा स्वतःला नशिबवान मानते. या संकल्पनेतून उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना भावनिक प्रवास घडवून आणणार आहे.
अजय पूरकर यांचा ‘नागेश्वर घोरपडे’
या मालिकेत अजय पूरकर ‘नागेश्वर घोरपडे’ नावाचा भयंकर खलनायक साकारणार आहेत. नागेश्वर हा पैश्याच्या बळावर सामान्य लोकांना त्रास देणारा, खून करण्यातही मागेपुढे न पाहणारा, देवीची पूजा करणारा पण प्रत्यक्षात राक्षसासारखा वागणारा व्यक्ती आहे. त्याच्या प्रभावामुळे तो कधीच कायद्याच्या जाळ्यात सापडत नाही.
अजय पूरकर यांनी सांगितलं –
“सहा वर्षांनंतर मालिकेत काम करत आहे आणि नागेश्वरचं पात्र ऐकताक्षणीच मला भावलं. स्टार प्रवाहसारखी नंबर वन वाहिनी आणि कोठारे व्हिजन्ससारखी ताकदीची निर्मिती संस्था असताना नकार देणं शक्यच नव्हतं. महेश कोठारेंसोबत काम करण्याचं स्वप्नही या निमित्ताने पूर्ण होतंय. याआधी इतका प्रभावशाली खलनायक मी साकारलेला नाही, त्यामुळे हा रोल माझ्यासाठी अभिनेता म्हणून एक मोठं आव्हान आहे.”
प्रेक्षकांसाठी आकर्षण
‘नशिबवान’ ही मालिका नाट्यमय वळणांनी, भावनिक क्षणांनी आणि प्रभावी अभिनयाने सजलेली असेल. विशेष म्हणजे अजय पूरकर यांचा खलनायक अवतार ही मालिकेची एक मोठी ताकद ठरणार आहे.ही नवी मालिका लवकरच फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.