विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनातून शब्द,सुर,ताल,यांच्या मिलाफातून अलवार अनुभुती

0

नाशिक,दि.१६ एप्रिल २०२३ –  स्वरांची नेमकी जाण आणि प्रगल्भता घेऊन सुरविश्वास मध्ये शब्द सूरांची अनोखी मैफील रसिकांनी अनुभवली.नादातून येणारा शास्त्रीय संगीतातील रागांचा स्वभाव किती पद्धतीने सादर होतो याची प्रचिती या मैफीलीतून आली.

सूर विश्वास’  मैफिलीत विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन संपन्न झाले. आदित्य कुलकर्णी (तबला), दिव्या रानडे (संवादिनी) अदिती नगरकर (तंबोरा) यांनी त्यांना साथसंगत केली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.

मैफिलीचे हे पंचवीसावे पुष्प  होते विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे.  विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न  झाला . उदयोन्मुख कलावंताच्या प्रयोगशीलेचा अविष्कार रसिकांना दर महिन्याला अनुभवण्यास मिळत आहे. सानिया पाटणकर यांनी मैफिलीची सुरुवात राग बैरागी  ने केली.त्यानंतर झपताल सादर केला त्यात ‘धरले ध्यान ‘ गीतातून शब्दांची ,अध्यात्माच्या वाटेवरची हाक जीवनाला बळ देते असा जीवनमंत्र दिला .नंतर दृक एकतालातील ‘लगन लागी ‘ बंदिश सादर केली.

सुर आणि शब्दांचा रुपबंध किती अवीट असतो याची ही प्रचिती आली.मैफल  उत्तरोत्तर रंगत गेली नंतर खमाज टप्पा  सादर केला शब्द होते.’ ऋतू बरखा ‘ ताल होता पश्टो.समारोप होरी गीताने केला.शब्द ब्रह्म आणि स्वर मिलाफ यांचा हा एकत्रित अनुभव होता.

विश्वास जयदेव ठाकूर म्हणाले की समाजमन घडवण्यासाठी शहराची सांस्कृतिक उंची वाढावी यासाठी सकस कार्यक्रमांची मेजवानी देणे हे विश्वास ग्रुप चे ध्येय आहे त्यातून अभिरुची संपन्न रसिक घडावेत ही अपेक्षा आहे त्यासाठी हा स्वरयज्ञ आहे. रौप्य महोत्सवी मैफल त्याचेच प्रतीक आहे. यावेळी डॉ.स्मिता मालपुरे यांना वाढदिवसानिमित्त सी एल कुलकर्णी यांनी लिहिलेले  मानपत्र  त्यांच्याच हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चित्रकार, पूजा गायधनी,निलेश गायधनी यांनी मैफील सुरू असताना पेंटिंग केलेत व सुलेखन केले त्यालाही रसिकांनी दाद दिली.इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल डॉ.सुधीर संकलेचा यांचा सन्मान डॉ.मनोज शिंपी यांचे हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी डॉ अतुल वडगावकर, डॉ मनोज शिंपी ,रोहिणी बागल, डॉ हेमंत कोतवाल,,विलास हावरे,इंद्रायणी पटणी, डॉ दिनेश बागुल,धवल नांदेडकर ,ज्ञानेश्वर कासार,नीलम नांदेडकर ,अंजली धडपडे,आदींच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आले.

सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी, ऑडियो पार्टनर दि ऑर्क ऑडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.