जागावाटपात शिंदेंनी मित्रपक्षांना झुकतं माप द्या :अमित शाहांचे वक्तव्य
दिल्लीतील बैठकीत अमित शाहांचं मोठं विधान । चर्चाना उधाण
नवी दिल्ली ,दि, १६ ऑक्टोबर २०२४ – महायुतीतील जागावाटपावरून मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.एकनाथ शिंदेंनी आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यात अमित शहा यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. भारतीय जनता पक्षाकडे जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, तसेच राष्ट्रवादी अजित पवार यांनाही चांगल्या जागा मिळाव्यात यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच शिंदेंकडे मुख्यमंत्री पद असल्याने त्यांनी मित्रपक्षांना थोडं झुकतं माप द्यावं असा भाजपचा आग्रह आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद, ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी त्याग केला, त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंनी मित्रपक्षांना झुकतं माप द्यावं असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंकडे आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत महायुतीची जागावाटपाची चर्चा सुरू असून केंद्रीय मंत्री अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून हे वक्तव्य केल्याची माहिती महायुतीतील एका मोठ्या नेत्याने दिली.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले “शिंदे जी, या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पदं महत्त्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे जागावाटपात मित्रपक्षांना झुकतं माप द्या.”
अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीच्या माध्यमातूनच विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे अजित पवारांना सत्तेत सामील होताना भाजपने जो शब्द दिला आहे तो शब्द पाळणार असल्याची माहिती आहे. त्याचमुळे आता भाजप नेते अमित शाहांनी स्वतः जागावाटपामध्ये सक्रिय भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रिपद हे शिंदेंकडे आहे, त्यामुळे मित्रपक्षांना त्यांनी जास्तीत जास्त जागा द्याव्यात असा आग्रह आता भाजपकडून केला जात आहे.
या बाबत शिंदेंचे खासदार नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमच्यामध्ये जागावाटपासंदर्भात कोणताही वाद नाही. आमचं जागावाटप पूर्ण झालं आहे. एकमेकांना समजून घेऊन ते झालं असल्याने कोणताही वाद नाही.