अमिताभ बच्चन,राजेश खन्ना यांची एक अप्रतिम कलाकृती “नमक हराम”

नमक हराम हा चित्रपट प्रदर्शित होऊन नुकतेच ४८ वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने....

0

दीपक ठाकूर
नमक हराम ला रिलीज होऊन बरोबर ४८ वर्ष झाली २३ नोव्हेंबर रोजी. खरंतर हा चित्रपट पाहताना नेमका नमक हराम कोण आहे हा प्रश्न प्रेक्षकांना आज ही पडतो.वंचितांच्या कार्यात सामील होऊन आपल्या जिवलग मित्राचा विश्वासघात करणारा राजेश खन्ना नमक हराम आहे की मित्राची बाजू घेऊन आपल्या उद्योगपती वडिलांचा विश्वासघात करणारा अमिताभ बच्चन नमक हराम आहे हे कोडं आपल्याला कायम पडतं. आणि हेच ह्या चित्रपटा चे वैशिष्ट्य आहे.

हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेली ही एक अप्रतिम कलाकृती आहे. त्यांनी गुलजार यांच्यासोबत ही कथा लिहिली होती. फक्त अमिताभ राजेश च नाही तर ,आरडी बर्मन, किशोर कुमार, आशा भोसले, रेखा, सिमी आणि इतर अनेक प्रतिभावंत ह्या नितांत सुंदर कलाकृतीत एकत्र आले होते. रिलीज झाल्यावर, ह्या चित्रपटाने लोकांना अमिताभची एक स्टारअभिनेता म्हणून दखल घ्यायला नक्कीच लावली. या चित्रपटाने आणि जंजीरने त्याला अँग्री यंग मॅन बनवले.

अमर प्रेम, कटी पतंग, दाग इत्यादींच्या मुळे त्याच सुमारास राजेश कलाकार म्हणून त्याच्या शिखरावर होता . दोघांमध्ये ऑनस्क्रीन आणि ऑफ स्क्रीन तुल्यबळ स्पर्धा होती.राजेशने भावनात्मक असलेल्या माणसाची भूमिका साकारली होती, तर अमिताभ यांची भूमिका अनेक स्तरांवर विकसित होत गेली आहे. तो एक भोळा श्रीमंत मुलगा आहे जो चांदीच्या चमच्याने वाढला आहे. तो गर्विष्ठ आहे, रागावलेला आहे आणि त्याला जे हवे आहे ते तो मिळवत असतो त्याच बरोबर दुसरीकडे तो एक प्रेमळ मुलगा आणि भाऊ देखील आहे. जेव्हा राजेश त्याला सांगतो की व्हिस्कीचा एक पेग एका कुटुंबाला महिनाभर खाऊ घालू शकतो, तेव्हा तो आश्चर्यचकित होतो पण आणि गरिबांवर हसतो देखिल.परंतु काही दृश्यांनंतर जेव्हा तुम्ही त्याचे पात्र बदलताना आपल्या दिसते. तो त्याच्या वडिलांना विचारतो की त्याचे कामगार योग्य जेवण जेवू शकत नाहीत तर ते योग्य काम कसे करतील, तेव्हा तुम्हाला त्याच्या अभिनयाची खोली दिसते. खरं तर प्रशंसा करताना कंजूस असणारे नसीरुद्दीन शाह एकदा म्हणाले की, अमिताभच्या अप्रतिम कामगिरीचे वर्णन करताना हिंदी चित्रपटात अश्रू इतके खरे कधीच वाटले नव्हते.

अमिताभला समांतर भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्याची ही बहुधा पहिलीच वेळ होती. सुरुवातीला दारूच्या नशेत असलेल्या दृश्यात त्याने त्याची थोडीशी हलकी बाजू दाखवली पण त्याच बरोबर जेव्हा तो राजेशला मारहाण करणाऱ्या कामगारांचा सामना करतो तेव्हा तो घाबरत नाही तर त्यांना समोर येण्यासाठी आव्हान देतो हे अफलातून दृश्य आहे. एक प्रेमळ मुलगा, दोस्त, भाऊ त्याने अप्रतिमरित्या वठवला आहे.सिमी सोबतचा त्याचा मूक रोमान्स हा केवळ एका अभूतपूर्व प्रयोग आहे.हृषिकेश मुखर्जी यांच्या कारकिर्दीतील हा एक सर्वोत्तम चित्रपट आहे.नदीया से दरीया, दिये जलते है,मै शायर बदनाम ही तीन अफलातून गाणी किशोर कुमार ने पुर्ण जीव ओतून गाऊन अजरामर करून ठेवली आहेत. एकंदरीत नमक हराम हा एक सुंदर कलात्मक अविष्कार आहे जो चित्रपट गुहा बाहेर पडताना फक्त आणि फक्त सुन्न करतो आणि राजेश अमिताभ ह्या जोडगोळी च्या अभिनयातील जुगल बंदी ची चर्चा करतच आपण परततो.
दीपक ठाकूर-९८२३३५१५०५

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!