‘राष्ट्राभिमानी लोकमान्य’ विषयावर अमृतवक्ता स्वानंद बेदरकर यांचे आज व्याख्यान
मैत्रविश्व आणि दक्ष नागरिक मंचतर्फे व्याख्यानाचे आयोजन

नाशिक,दि.१४ मे २०२३ – मैत्रविश्व आणि दक्ष नागरिक मंच या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अमृतवक्ता स्वानंद बेदरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवार दिनांक १४ मे या दिवशी संध्याकाळी ६ वाजता ‘राष्ट्राभिमानी लोकमान्य’ या विषयावर हे व्याख्यान होईल.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मैत्रविश्व आणि दक्ष नागरिक मंच यांच्या वतीने सातत्याने सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्रात विविध कामे केली जातात.त्याचाच एक भाग म्हणून यंदा या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक आणि त्यांचा काळ, त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वातंत्र्यलढ्यात त्या संपूर्ण लढ्याचे एक काळ त्यांनी केलेले नेतृत्व या सगळ्याचा उहापोह या व्याख्यानात बेदरकर आपल्या अमोघ वाणीद्वारे करणार आहेत.
गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासच्या डॉ.कुर्तकोटी सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानाचा लाभ सर्वांनी घ्यावा;असे आवाहन मैत्रविश्व आणि दक्ष नागरिक मंच यांच्यावतीने करण्यात आले आहे.


