नाशिक,दि.१५ मार्च २०२३-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करतांना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून त्यांनी पक्ष प्रवेश करतांना केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहे. मुळात त्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या चिन्हावर निवडून आल्या असतांना त्यांनी नेहमीच पक्षविरोधी भूमिका घेतली. तसेच भाजपच्या अनेक कार्यक्रमात तसेच भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या थेट सहभागी झाल्या होत्या त्यामुळे त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठतेबाबत शिकवू नये अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कॉंग्रेस मधून बाहेर पडत पवार साहेबांनी जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेऊन अनेकांनी त्यांना साथ दिली. त्यामध्ये सर्व प्रथम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे होते. त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर असतांना देखील त्यांनी ती संधी धुडकावून पवार साहेबांना खंबीर साथ दिली. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस घराघरात पोचविण्यासाठी भुजबळ साहेब हे रात्रंदिवस फिरले.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, अमृता पवार या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या तिकिटावर देवगाव गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. मात्र त्यांनी या संपूर्ण कार्यकाळात पक्षाच्या विरोधी भूमिका घेतली. त्या कायमच भाजपच्या संपर्कात राहिल्या.
केवळ सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी मनात द्वेष ठेऊन त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे तथ्यहीन आहे. तसेच त्यांच्या जाण्याने पक्षाला कुठलाही फरक पडणार अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा योगिता आहेर, युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केली आहे.