नाशिक,दि. १८ जुलै २०२३ –जिल्ह्याच्या आदिवासी भागातील रस्त्यांचे मजबुतीकरण व काँक्रिटीकरण व्हावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे.यासाठी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांमधील तीस कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यासह नाशिक तसेच सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील इगतपुरी, त्रंबकेश्वर ,सिन्नर, नाशिक या तालुक्यांमधील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे.गावांमधील रस्त्यांचे डांबरीकरण तसेच काँक्रीटीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील रहिवासी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून रस्ता दुरुस्तीसाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे सततची मागणी होत होती.नागरिकांकडून आलेल्या मागणीची दखल घेत गेल्या काही महिन्यांपासून खा.गोडसे यांनी रस्त्यांच्या डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. खा. गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांना यश आले असून आजच्या पुरवणी मागणी अंतर्गत तीस कोटी रुपयें खर्चाच्या रस्त्यांच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 20 कोटी रुपयांची कामे आदिवासी विभागाकडून तर उर्वारित दहा कोटी रुपयांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात येणार आहेत.
यामध्ये इगतपुरी तालुक्यातील खोडाळा – त्र्यंबक – देवगाव रस्ता येथे संरक्षण भिंतीचे बांधकामासाठी 1.20 कोटी रूपये, कथ्रुवंगनवाडी येथे काँक्रीट रस्त्याचे व संरक्षक भिंतीचे बांधकामासाठी 1.20 कोटी रूपये, कुशेगाव ते भंबाळे फाटा रस्ता सुधारणीच्या कामासाठी 1.20 कोटी रूपये, लहांगेवाडी ते गडगड सांगवी रस्त्याच्या बांधकामासाठी 1.20 कोटी रूपये, ट्रिंगलवाडी ते वाकी रस्त्याच्या सुधारणेसाठी 2 कोटी रूपये, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रा.म.मा. 160 अ ते आंबई रस्त्याचे पुल मोऱ्यांसह मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 3 कोटी रूपये, मुळेगाव ते भोकरवाडी दऱ्याचीवाडी ते अंजनेरी गड रस्त्याच्या बांधकामासाठी 3 कोटी रूपये, इजिमा 55 ते काथवडपाडा रस्ता सुधारणा 2.45 कोटी रूपये, नाशिक तालुक्यातील गिरणारे ते साडगांव रस्ता सुधारणीसाठी 2 कोटी रूपये, रायगड नगर ते वालदेवी ते पिंपळद रस्ता सुधारणीसाठी 1.50 कोटी रूपये, बेळगांव ढगा ते तिरडशेत रस्ता सुधारणा करण्यासाठी 2 कोटी रूपये ह्या कामांचा समावेश आहे. याबरोबरच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रा.मा. 30 ते अंजनेरी – मुळेगांव – जातेगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 3 कोटी रूपये, देवरगांव-कुळवंडी-होलदारनगर रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा 13 यासाठी 2.50 कोटी रूपये, निफाड तालुक्यातील इजिमा क्र. 42 पिंपळस बसस्थानक दत्तमंदिर ते भाऊसाहेब नगर व्ही.आर. 128 रस्ता काँक्रीटीकरण व डांबरीकरणासह मजबुतीकरणासाठी 4.50 कोटी रूपये कामांचा समावेश आहे.