नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये ५००च्या तब्बल २ हजार मिलियन नोटांची छपाई होणार

नाशिक नोटप्रेसच्या कामगारांना चार महिने २४ तास कामकाज करावे लागणार

0

नाशिक,दि. २२ मे २०२३ –२३ मे पासून दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार असल्याने यानंतर ५०० रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे.त्यामुळे आता नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधील जवळपास दिड हजार कामगारांना पुढील चार महिन्याच्या कालावधीत नोटबंदीच्या काळाप्रमाणेच २४ तास कामकाज करावे लागणार आहे.

२०१८-१९ मध्येच दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतचा म्हणजे जवळपास ४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून दोन हजारांच्या नोटा नागरिकांना बँकेत जाऊन बदलता येणार आहेत.त्यामुळेच आता पाचशेच्या नोटांची अधिक गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या नोटप्रेसमध्ये पाचशेच्या जवळपास २ हजार ८०० मिलियन नोटांची छपाई करण्यात येणार आहे.

काही महिन्यापूर्वी अर्थ मंत्रालयाने नाशिक करन्सी नोट प्रेसला ५०० रुपयांच्या नोटांची छपाई करण्याचे उद्दिष्ट दिले होते. एप्रिलपासून आतापर्यंत ३० कोटी नोटांची छपाईही झाली आहे. आता येत्या काही दिवसांतच दोन हजार रुपयांची नोटच चलनातून बाद होत असल्याने एक दोन हजाराची नोट बदलून देण्यासाठी पाचशे रुपयांच्या ४ नोटा लागणार असल्याने ५०० च्या नोटांची मागणी वाढणार आहे. अपुऱ्या मनुष्यबळातही हे उद्दिष्ट कामगार पूर्ण करतील असा मजदूर संघाच्या नेतृत्वाला विश्वास आहे. दरम्यान, दोन हजारांच्या नोटांची छपाई ही २०१८-२०१९ या आर्थिक वर्षापासूनच बंद करण्यात आली होती, ती रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर आणि सालगोणी येथील नोट प्रेसमध्ये होत होती.

त्याचबरोबर नाशिकच्या नोटप्रेसने नोटबंदी काळात नोटप्रेसच्या कामगारांनी महत्वाची भूमिका बजावत जवळपास दोन वर्षे दिवसरात्र मेहनत घेतली होती. त्यावेळी दोनशे आणि पाचशेच्या अंदाजे दहा हजार मिलियन नोटांची छपाई केली होती. सध्या दोन हजारांच्या अंदाजे १ हजार ८३३ मिलियन नोटा बाजारात आहेत आणि हे बघता पाचशेच्या जवळपास साडेसात हजार मिलियन नोटांची भविष्यात गरज भासणार आहे. म्हैसूर, सालभोनी, देवास आणि नाशिकमध्ये या नोटा तयार केल्या जाणार असून येत्या चार महिन्यात २ हजार ८०० मिलियन नोटाची छपाई एकट्या नाशिक नोटप्रेसमध्ये होणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.