गांधीनगर,३१ जानेवारी २०२३ – तथाकथित धर्मगुरू आसाराम बापू यांना बलात्कार प्रकरणात गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सोमवारी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. याआधी न्यायालयात सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादात आरोपी आसाराम बापूला जन्मठेपेची मागणी केली होती. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापूंना ३१ ऑगस्ट २०१३रोजी अटक करून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते.याप्रकरणातील दुसऱ्या आरोपीला न्यायालयाने निर्दोष ठरवत त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
आसाराम बापूना २०१३ मध्ये दोषी ठरवण्यात आले होते
गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने २०१३ मध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूंना दोषी ठरवले होते. अहमदाबादमधील मोटेरा येथील आश्रमात आसाराम बापूने २००१ ते २००६ दरम्यान महिला शिष्यावर अनेकदा बलात्कार केला असा आरोप होता.
न्यायालयाने सोमवारी सुनावणी पूर्ण केली
गांधीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी आसारामविरुद्धचा खटला पूर्ण केला आणि त्याला आयपीसीच्या कलम ३७६, ३७७, ३४२, ३५४, ३५७ आणि ५०६ अंतर्गत दोषी ठरवले. महिलेच्या बलात्कार प्रकरणात आसारामची पत्नी लक्ष्मीबेन, त्यांची मुलगी आणि इतर चार शिष्यांसह सहा आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.