माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आजच भाजपमध्ये प्रवेश

0

मुंबई,दि,१३ फेब्रुवारी २०२४ –राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्या नंतर २ दिवसांनी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते. प्राप्त माहिती नुसार ते १५ फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थिती भाजपा प्रवेश करणार होते परंतु अशोक चव्हाण आजच दुपारी साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.

अशोक चव्हाण यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते कि मी इतकी वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले. आता मला वेगळा पर्याय शोधावासा वाटत आहे, असे चव्हाण यांनी म्हटले होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी पुढील दोन दिवसांमध्ये पुढील भूमिका स्पष्ट करेन, असे म्हटले होते. परंतु, आता अशोक चव्हाण दुसऱ्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या घाईमागे राज्यसभा निवडणुकीचे गणित असल्याचे सांगितले जात आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर आजच भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. त्यामध्ये अशोक चव्हाण यांचे नाव असण्याची शक्यता आहे. त्यासाठीच अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या पक्षसदस्यत्त्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला.

चव्हाण यांना १५ फेब्रुवारीलाही भाजपमध्ये प्रवेश करणे शक्य होते. मात्र, यामुळे राज्यसभेच्या उमदेवारी दाखल करताना अडचण झाली असती.त्यामुळे भाजपकडून आजच अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा उरकण्यात येणार असल्याचे समजते.

काँग्रेसची खलबतं
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आणि काँग्रेस आमदार फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता गांधी भवन (तन्ना हाऊस) कुलाबा, मुंबई येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते देवरा, सिद्दीकी आणि आता चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला फटका मानला जातोय. चव्हाण यांच्यासह सध्या अनेक काँग्रेसचे आमदार पक्ष सोडण्याचा मार्गांवर असल्याने डॅमेज कंट्रोलसाठी आज महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक होतेय.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.