देवभूमी नाशिकमधे गंधर्व गायनाची मुहूर्तमेढ

अष्टौप्रहर स्वरहोत्र : मंदिर गायन परंपरेची नांदी ...

0

आपलं जगणं सुंदर व्हावं, आनंदी व्हावं यासाठीच आपण सगळे प्रत्येक कलेत एक वेगळं जगणं जगत असतो. हे जगणं केवळ व्यक्तिगत नसतं तर हा सर्व सुसंस्कृत समाजच एकमेकांचा हात हातात घेऊन जगत असतो. आपल्याबरोबर इतरांनीही आनंदी व्हावं, प्रसन्न व्हावं, जगणं फुलवावं असं ज्यांना वाटतं त्यांची मनं देवाइतकी सुंदर असतात. अशी काही माणसं मानवतेच्या जाणीवेतून इतरांमधेही आनंदाने जगण्याची जाणीव कळत नकळतपणे निर्माण करीत असतात. अशा देवासारख्या व्यक्तींमुळेच जगण्यात खऱ्या अर्थाने “राम” आहे असं म्हणावंसं वाटतं. चारचौघं टीमचे विनायक रानडे, सी एल कुलकर्णी, एनसी देशपांडे आणि समीर देशपांडे ही अशीच देवासारखी माणसं. ज्यांनी जगण्यातला हा राम,अष्टौप्रहर स्वरहोत्राच्या साक्षीने पुन्हा एकदा जागा केला. या महोत्सवातून आठ प्रहराचे भारतीय रागसंगीत सादर व्हावे आणि त्याची सुरुवात रामरक्षेपासून व्हावी असा मनोदय चारचौघांनी ध्रुपद गायक सचिन चंद्रात्रे यांच्याकडे व्यक्त केला आणि तिथेच मुहूर्तमेढ झाली भारतीय राग संगीताचे जनक असलेल्या दहा थाटांमधल्या अष्टौप्रहराची रामरक्षेची … सचिन सरांनी भारतीय संगीतातील आठ प्रहरातील दहा थाटांना रामरक्षेचे कोंदण दिले आणि त्यांच्या संगीत संयोजनाखाली जनता जनार्दनांच्या दरबारात सादर करण्यासाठी अष्टौप्रहर स्वरहोत्राची संगीत संहिता सज्ज झाली … त्यांच्या स्टुडिओत संगीतातील प्रत्येक थाटावर नेमकेपणाने काम सुरू झाले, तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर मीही या निर्मितीचा आनंद जवळून अनुभवीत होते. या प्रयोगाच्या नियोजनापासून अंमलबजावणी पर्यंत प्रत्येक टप्प्यावर माझ्याकडे चंद्रात्रे सरांनी लिहिलेल्या संहितेच्या सुसूत्रतेचे काम होते. इतक्या सगळ्या कलाकारांच्या समन्वयाने आणि कमी वेळात मोठ्या आशयाचे प्रस्तुतीकरण सुलभ व्हावे यासाठी प्रभू रामचंद्रानेच माझ्या हातून हे काम करवून घेतले. त्या थाटबद्ध संहितेमध्ये संपूर्ण कार्यक्रमाचा सारांश सामावलेला होता.

बिलावल, कल्याण, भैरव, आसावरी, तोडी, भैरवी, पूर्वी, काफी, खमाज आणि मारवा… भारतीय संगीतामधील हे दहा थाट… आपले भारतीय रागसंगीत व ‘त्यातील प्रहर-विभागणी’ ही पं. विष्णू नारायण भातखंडे प्रणित या दहा थाटांवर आधारित आहे. तर बुधकौशिक मुनी विरचित रामरक्षा म्हणजे आम्हा भारतीयांसाठी रामचरित्रसार… सर्वतोमुखी असलेले आणि वसलेले रामरक्षाचे हे मधुर महाकाव्य म्हणजे आपल्या वेद संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे…. नाशिकच्या गोदामाईच्या वाहत्या पाण्यात रामरक्षेची स्पंदने अनुभवास येतात असे गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर म्हणत असत… त्यांचे व प्रभू रामचंद्रांचे स्मरण करून, संगीत आणि वेद या दोन्ही अलौकिक कलांच्या संगमाने ‘दशथाट मंडित श्रीरामरक्षा स्तोत्र गायन’ या संकल्पनेचा अश्रुतपूर्ण विचार आणि आविष्कार सचिन सरांनी साकारला, आणि प्रभू श्रीरामचंद्राने तो त्यांच्याकडून पूर्णही करवून घेतला. त्यांच्या दमदार ध्रुपद गायन आणि रामरक्षेने अष्टौप्रहर स्वरहोत्र या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमात सादर झालेली ही श्रीरामरक्षा म्हणजे दहा अंकी नाट्यप्रवेश होता … प्रत्येक अंकामध्ये एक थाट प्रवेश करेल आणि त्या थाटाच्या भावाला धरून श्री रामरक्षा स्तोत्रातील एकेक भाग गाईला जाईल, पुढे जाईल अशी योजना होती. हे स्तोत्र ‘कोरस गायन’ या आधुनिक पद्धतीने सादर न करता, पाश्चात्य संगीताच्या ‘हार्मनी बैंड’ या संकल्पनेवर आधारित होते. नाशिकच्या गुणी गायक कलावंतांच्या ‘घोषसमूहाने’ ही रामरक्षा अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने सादर केली… यातील प्रत्येक गायक, गायिका, शास्त्रीय संगीताच्या स्वतंत्र मैफिली करणारे कलाकार होते हे विशेष … सौ असावरी खांडेकर, श्री उदय कुलकर्णी, चिन्मय भार्गवे, सूर गोखले, विणा गोखले, रुद्राक्ष साक्रीकर, दिगंबर सोनवणे, श्रावणी गीते या प्रत्येकाच्याच सहभागाने रामरक्षा गायनाची ही अभूतपूर्व आणि अश्रूतपूर्व संकल्पना सुरेलपणे साकारली गेली. निरूपणकर स्वानंद बेदरकर यांनी या आगळ्यावेगळ्या प्रयोगाला चढविलेला संयत शब्दसाज अत्यंत शोभनीय होता. पहिल्या प्रहराची सांगता करताना सचिन चंद्रात्रे यांच्या संगीत संयोजनाखाली प्रसिद्ध कथक नृत्यांगना सुमुखी अथणी यांनी सादर केलेली रामस्तुती म्हणजे श्राव्य कलेपाठोपाठ सादर झालेली दृश्यकलेची उत्तम प्रस्तुती होती.

अष्टौप्रहरच्या निमित्ताने आता एक अत्यंत आगळीवेगळी अशी रामरक्षा दहा थाटात नटून थटून जगासमोर आली आहे. या रामरक्षेत रामाचा जन्म आहे, रामाचे ध्यान आहे, रामाचे रणकंदन आहे, रामाची भक्ती आहे, रामाची स्तुती आहे, रामाचे अभय आहे, रामाचे कवच आहे, आणि रामाचे ‘सर्वस्व’ आहे … ध्येय, ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी बांधणारी ही अनोखी रचना आहे… रामचरित्रातील दहा निरनिराळ्या भावछटांचे हे दर्शन असले तरी शेवटी प्रभूराम हे व्यापक तत्व आहे… भारतीय गायन कला आणि रक्षण करणारा राम यांचा हा शुद्ध संगम आहे. संपूर्ण भारतीय संगीत हा या रचनेचा गाभा असून ध्रुपद गायकी हा या रचनेचा आधार आहे. गातांना कर्नाटक संगीत देखील नजरेसमोर ठेवले आहे. संपूर्ण भारतीय संगीताचे ‘साररूप दर्शन’ दहा थाटातून आणि रामस्तुतीतून साकारणारी ही प्रासादिक रचना प्रभू श्री रामचंद्रांचीच… आणि प्रभू रामचंद्रांना समर्पित …

रविवार दि. १४ जानेवारी २०२४ पुनहा एकदा “अष्टौप्रहर स्वरहोत्र” हा दृश्य आणि श्राव्य कलेचा आगळावेगळा सोहळा गोदावरी नदीच्या काठी असलेल्या बालाजी मंदिरामध्ये आयोजित केलेला आहे. सकाळी पाच वाजल्यापासून पुन्हा एकदा शास्त्रीय संगीताची सुरेल आणि रंगतदार पर्वणी सर्व नाशिककरांनी अनुभवता येणार आहे. नाशिक नगरी ही गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली संगीत नगरी आहे. अशा सांस्कृतिक महत्त्व असलेल्या नगरीत अष्टौप्रहर स्वरहोत्र हा संगीत महोत्सव पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवाइतका मोठा व्हावा आणि तो जगप्रसिद्ध व्हावा अशी सर्व नाशिककरांची फार मनापासून इच्छा आहे. श्रीराम कृपेने ही इच्छा नक्की पूर्ण होईल.
-तृप्ती चावरे-तिजारे
(समन्वयक, अष्टौप्रहर स्वरहोत्र, दशथाट मंडित श्रीरामरक्षा स्तोत्र गायन टीम.)

_____________

अष्टौप्रहर स्वरहोत्र : मंदिर गायन परंपरेची नांदी …
“योजक:स्तत्र दुर्लभ:” असे खरे म्हणजे म्हणतात, पण नाशिकचे विनायक रानडे, एनसी देशपांडे सी.एल. कुलकर्णी आणि समीर देशपांडे ‘चारचौघं’ टीमने हीच उक्ती ‘सुलभ’ करून दाखवली. व्यक्ती म्हणून मनात या सगळ्यांबद्दल आणि सहभागी कलाकारांबद्दल आदर आहेच, पण त्याहीपेक्षा, चाराचौघातल्याच या व्यक्तिरेखांनी चाराचौघांपलीकडचा पायंडा समाजात पाडला आहे असे मला वाटते. ‘अभिजात संगीताचे मंदिर परंपरेतील सादरीकरण’ ही लुप्तप्राय होत चाललेली परंपरा पुनर्जीवित करण्याचा संकल्प या चारचौघांनी केला आणि अष्टौप्रहर स्वरहोत्राची कल्पना उदयाला आली. प्रत्येक प्रहराचे रागसंगीत रामाच्या चरणी आणि रसिकांच्या दरबारात सादर झाले. अनेक मोठ्या दिग्गजांनी या महोत्सवात सेवाभावाने हजेरी लावली. कोविडनंतर प्रायोगिक कला क्षेत्रामध्ये उदासीनतेचे सावट गडद होत असतानाच, अनेक कलांमधील सौंदर्य नामशेष होतांनाही जाणवत होते. अशा वातावरणात त्यांनी कलावंतांकडून करवून घेतलेली रामसेवा संगीतक्षेत्राला नवीन ऊर्जा, प्रेरणा आणि दिशा देणारी ठरली.

या महोत्सवाची सुरुवात ‘ध्रुपद गायक सचिन चंद्रात्रे’ यांच्या दमदार ध्रुपदाने झाली. भारतीय संगीताचे मूलमंत्र ज्या गायकीत दडलेले आहेत, ती गायकी म्हणजे ध्रुपद गायकी … ही गायकी म्हणजे मंदिर गायन परंपरेची ओळख. लुप्तप्राय होत चाललेल्या या शैलीतून महोत्सवाचे पहिले पुष्प गुंफले गेले हेच या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य होय. ध्रुव म्हणजे अढळ आणि पद म्हणजे वर्णाक्षरांची पाऊले… भारतीय गायकीच्या वाटेवर साधकाला, भक्कम पाय रोवून उभे करणारी ही अनोखी शैली… आज ही शैली ऐकणे दुर्मिळ झाले असले तरी भारतीय गायनातील मुळाक्षरे आणि शुद्धत्व याच गायकीत दडलेले आहेत …. भावभावनांचा शृंगार नसलेली, मदमस्त सौंदर्य नसलेली, काहीशी रूक्ष अशी, मात्र आपल्यातील भक्तीभावाच्या रसपरिपोषाने अलौकिकत्वाची प्रचिती देणारी अशी ही गायकी…. “नोमतोम आलाप गायकी” हे या शैलीचे पहिले वैशिष्ट्य… या आलापीतील निरर्थक वर्ण, म्हणजेच वेदमंत्रातील “र द न ना” या वर्गातील बीजाक्षरे… ध्रुपद गायकीत हीच बीजाक्षरे नादरूप घेऊन निराकारातून साकार होत असतात…. जणु सुरांचा (आहात संवाद, अनाहत आत्मसंवादाच्या अंतरंगात प्रवेश करतो … ढोबळ सुरांचे प्रवेशद्वार ओलांडून, सूक्ष्म श्रुतींच्या विलोभनीय राजमहालात साधकाचा प्रवेश होतो आणि नादब्रम्हाच्या त्या प्रचितीने त्याचे आणि ऐकणाऱ्याचे अंतकरण उजळून निघते… अष्टौप्रहर स्वरहोत्रातून हा उजळून जाण्याचा अनुभव ध्रुपद गायकीतून मिळाला.

ध्रुपद गायकीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या गायकीमध्ये लय आणि श्रुती या संकल्पना ‘वेगवेगळ्या’ नाहीत ….’लयदार श्रुती’ किंवा ‘श्रुतीगामी लय’ असे संगीताचे विलोभनीय अखंडत्व सिद्ध करणारी ही गायकी आहे….

ध्रुपद गायकीचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे, एका सुराचा दुसऱ्या सुराशी असलेला संवाद व त्याचे गायन… रागातील सूर हे जणू एक कुटुंब आहे अशा पद्धतीने एका व्यक्तिमत्त्वाचा दुसऱ्या व्यक्तिमत्वाशी परिचय, संवाद, सुसंवाद आणि विसंवाद सुरू असतो हा संजीवन सूरसंवाद प्रस्थापित व प्रसारित करण्याचा आनंद गायक अथवा वादक घेत असतो आणि श्रोत्यांना तो देत असतो… आणि सगळ्यात शेवटी निराकारातून जे साकार झाले ते माझे नाही या समर्पण भावनेने राग दर्शनाचा सगळा भाव एका ॐकारामध्ये विसर्जित होत असतो… ध्रुपद गायकीच्या चार बानी (म्हणजे घराणी)… खंडहार, नौहार गौहार आणि डागुर बाजी… पुष्टीमार्गी वल्लभ संप्रदायातील ध्रुपद परंपरा हा देखील एक वेगळा विषय आहे. तो मुख्यत्वे भक्तिमार्गाकडे झुकणारा आहे. ध्रुपद गायकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गायकीतील बंदिशी व त्यांचे अचलत्व. ज्याप्रमाणे तबलावादनात कायदा पाळला जातो त्याचप्रमाणे ध्रुपदाच्या बंदिश गायनात देखील कायदा पाळला जातो. ‘खयाल’ म्हणजे कल्पना… अर्थात, या कल्पनाप्रांताला ध्रुपदात फारसा वाव नसतो, त्या पलीकडे जाऊन शुद्धत्वाला जास्त महत्त्व असते सौंदर्याचे दर्शन घडविणारी ही शैली नव्हे, तर कायद्याच्या चौकटीत बसेल त्या लयकारीच्या अंगाने ही प्रयोगात्मक कला शुद्ध स्वरूपात, ‘जशी आहे ‘ती’ सादर होत असते. …

नोमतोमच्या आलापित शृंगार नाही, बंदिशीच्या रचनेमध्ये भावपक्ष नाही, तरीही केवळ शुद्धत्वाच्या जोरावर या गायकीने राग गायनामध्ये जे अढळ स्थान निर्माण केले ते स्थान म्हणजेच भारतीय संगीताची पहिली ओळख आणि अलौकिकत्व आहे. ज्याप्रमाणे वेद हे ‘अपौरुषेय’ मानले जातात, त्याचप्रमाणे ही गायकी अपौरुषेय मानली जाते. भक्ती या शुद्ध भावनेतून तिचा जन्म झाल्यामुळे तिचे नेमके ‘कर्तेपण’ कुणीही घेतलेले नाही. म्हणूनच ध्रुपद गायकी ही शुद्ध आणि पवित्र मानली जाते. तिला शृंगारचा, रती भावनेचा आणि कल्पनेचा स्पर्श होऊ दिला जात नाही, म्हणूनच ही गायकी स्वयंसिद्ध व परमेश्वर प्रित्यर्थ आहे असेही म्हटले जाते. अशा गायकीचा रसास्वाद रसिकांना तिच्यात घडलेल्या वैशिष्ट्यांच्या विवरणासह घेता आला हे अष्टोप्रहर स्वरहोत्राचे वैशिष्ट्य.

रविवार १४ जानेवारी २०२४, पुन्हा एकदा “अष्टौप्रहर स्वरहोत्र” हा दृश्य आणि श्राव्य कलेचा आगळावेगळा सोहळा गोदावरी नदीच्या काठी असलेल्या बालाजी मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला आहे. सकाळी पाच वाजल्यापासून शास्त्रीय संगीताची सुरेल आणि रंगतदार बरसात सर्व नाशिककरांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.संपूर्ण जगात गाजलेल्या पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाप्रमाणेच नाशिकचा अष्टौप्रहर स्वरहोत्र संगीत महोत्सव जगभर रसिक मान्य व्हावा अशी श्रीरामा चरणी प्रार्थना.
(आधार : ध्रुपद गायक सचिन चंद्रात्रे यांची मुलाखत.)
-शब्दांकन : तृप्ती चावरे-तिजारे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.