‘अष्टौप्रहर स्वरहोत्र’: स्वर्गीय सुरांचा आनंद -स्वानंद

कविता शिंगणे गायधनी

0

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वानंद हरवून बसलेलो आहोत. आनंद आणि स्वानंद. स्वानंद म्हणजे आत्मानंद, ब्रह्मानुभव. खरंतर तो हक्काचा असतो आणि सहजी मिळण्यासारखा असतो पण कृत्रिम आणि भौतिक साधनांच्या गर्दीत आपलं मन ईश्वरापासून दूर जात आहे. ते परत भगवंताकडे वळवण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे नवविधा भक्ती आणि या नऊ पायऱ्यांवर चढायची पण गरज भासत नसते. कुठल्याही एका पायरीवरून आत्मीयतेने ईश्वराकडे पाहिले तरी हा ब्रह्मानुभव मिळू शकतो. अष्टौप्रहर स्वरहोत्र हा कार्यक्रम या नऊ पायऱ्यांवर टाकलेल्या पायघड्याच होत्या. सहजी मिळालेले दान होते हे भक्तीचे. भजन म्हणजे रसास्वादन. ईश्वराची भक्ती म्हणजे ईश्वराचा रस घ्यायचा. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, पूजन /अर्चन ,वंदन ,दास्य आणि सख्य या पायऱ्यांवर घडते ती नवविधा भक्ती.

नवविधा भक्तीतील पहिली भक्ती श्रवणाने सुरू होते. श्रवण चांगल्या प्रतीचे असावे. उत्तम नृत्ये पहावीत. अष्टौप्रहर स्वरहोत्र या कार्यक्रमात अष्टौप्रहरातील विविध राग,थाट ऐकण्याचा योग म्हणजे नुसते कानच नाही तर गात्र न गात्र तृप्त झाले.

पहिला प्रहर …राम प्रहर… नाशिकची थंडी…. लाडक्या दैवताचं मंदिर अर्थात राम मंदिर…. इथल्या दगडा दगडावर प्रेम करावं अशी जागा आणि या राम प्रहरी मन प्रसन्न करणारी काकड आरती आणि सुरू झाले स्वरहोत्र. स्वानंद बेदरकर यांचे निरूपण म्हणजे ब्रह्मानुभवच. या एका प्रहरातच साऱ्या भक्तीच्या प्रकारांनी मन भक्तीमय झाले. तल्लीनता वेगळी काय असते…?

उत्तम श्रवण इथूनच सुरू झाले. कीर्तनही यात आलेच. श्रीरामांचे गुण गायन केल्याने सांगणारा आणि ऐकणारा दोघेही आत्मानंदात डुंबू लागतात. त्यात स्वानंद बेदरकर म्हणजे उत्तम ग्रंथावलोकनाचे परिपाक. बहुत करावे पाठांतर | कंठी धरावे ग्रंथांतर | भगवत कथा निरंतर करीत जावी | म्हणजे स्वानंद!! त्यामुळे वजनदार वाणीतून उमटलेले निरूपण निरंतर आनंद देऊन गेले.

हा प्रहार उत्तरोत्तर रंगतच गेला. प्रहराचा प्रारंभच  प्रसन्न अशा भटीयार रागातील धृपदाने झाला.नाशिककरांना ऐकायलाच न मिळणारा धृपद प्रकार सचिन चंद्रात्रे यांनी सादर केला.त्यांनी अतिशय दमदार पण तितक्याच भावपूर्ण  पद्धतीने नोमतोम केली आणि स्वरचित,स्वस्वरबद्ध असे रामरायाचे धृपद गायन केले.

आणि  मग स्वतः दहा थाटात बांधलेली रामरक्षा म्हणजे भगवंतास कीर्तन प्रिय या उक्तीस सार्थ करण्यासाठी केलेले सात्विक प्रयास. भगवंताला स्वतःला कीर्तन आवडते. रामदास स्वामी म्हणतात ध्यानमूर्ती अंत:करणे | लक्षुन कथा करावी | इथे तर साक्षात रामराया उभे केले गेले. ते बिलावल, भैरव, कल्याण ,खमाज, पूर्वी, मारवा, काफी, आसावरी भैरवी आणि तोडी अशा थाटातून!!!

बरं या कलावंतांचे तादात्म्य तरी काय वर्णावे…. सात्विक भावाने मन भरून जावे अशी शरीराची अवस्था… कंपित व्हावे, शहारे यावे, प्रेमाश्रू यावे अशी प्रत्येक उपस्थित असणाऱ्या भक्ताच्या मनाची अवस्था झालेली होती आणि ती पूर्णतः निर्माण करण्याचे श्रेय जाते ते सचिन चंद्रात्रे आणि आपले आसावरी नाव सार्थ करणाऱ्या आसावरी खांडेकर यांना. सारंगी वाजवणाऱ्या रुद्राक्ष यांना… खरंतर त्यांनी सारंगी वाजवली नाहीच… एकेक शब्द जणू सारंगीतून घरंगळत होता आणि थेट काळजात पोहोचत होता. खरंतर सारंगी हे करूण वाद्य मानले जाते परंतु रामरायाच्या भक्तीत त्यांच्या सारंगीतून इतके प्रसन्न स्वर निर्माण होत होते की सारे वातावरण प्रसन्नमय होऊन गेलेले होते. प्रत्यक्ष रामरायाचा वास या पूर्ण प्रहरात जाणवत राहिला. दिगंबर सोनवणे यांचा पखवाज तर ऐकतच राहावा असा क्षण होता. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्रघोषाची आवर्तने म्हणजे समूहाची पराकोटीची भक्ती ठरली. मंत्रघोषाची आवर्तने सचिनजींसोबत त्यांच्यासोबतच्या प्रत्येकाने सार्थ केली.

नाम हे मूर्त आणि अमूर्त यांना जोडणारी साखळी असते. ही रामरक्षा म्हणजे दृष्यातून अदृश्यात आणि अदृश्यातून अव्यकतात जाण्याची साधनाच होती. सुमुखी अथणीने दृश्यातला श्रीराम तर साक्षात उभा केलेलाच होता. त्यांची पुष्पांजली म्हणजे जणू श्रीरामाच्या पायाशी वाहिलेले प्राणार्पण होते.

ज्याच्या निकट संगतीमध्ये आपण राहतो त्याच्या देहाचा आणि मनाचा परिणाम आपल्याही देहावर होतो. अष्टौप्रहर स्वरहोत्र म्हणजे भक्तीचा संगच होता. प्रत्येक प्रहराचा रंग आणि समूहाने श्रीराम चरणी केलेले पुष्पार्चन ही पादसेवन भक्ती प्रत्येक प्रहरात घडली. पहिल्या प्रहराची समर्पितता सर्व प्रहरात कसोशीने सांभाळली गेली. भक्तीतील उन्मनी अवस्था काय असते याची प्रत्येक प्रहरात भक्तांनी अनुभूती घेतली. मग ते अष्टूरकरांची सतार ऐकणे असो, अथर्व वारे यांचा तबला असो की वैरागकरांचे गायन असो की दसककरांची संवादीनी.आशिष रानडे यांनी इंद्रायणी काठी म्हणताना जी समाधी लावली… स्वतःची आणि भक्तांची देखील ….त्याला तोडच नाही !!!!

मधल्या प्रहरांमध्ये अस्मिता सेवेकरी आणि मधुरा बेळे यांची स्वरपूजा देखील लक्षणीयच होती. पंडित अविराज तायडे, ज्ञानेश्वर कासार, प्रीतम  नाकिल यांचेही प्रहर उल्लेखनीय आणि आनंददायी. ‘अस्मिता सेवेकरी, देवश्री नवघरे, केतन इनामदार, राजश्री वैरागकर, अमृता खटी, शंतनु गुणे, सोनाली भुसारे, श्रीराम तत्त्वावादी’ अशा साऱ्याच कलाकारांनी आपली साधना श्रीरामाच्या चरणी अर्पित केली. क्षितिजा शेवतकर आणि लितेश जेठवा यांचे सतार आणि बासरी वादन सगळ्यांना एका अनोख्या विश्वात घेऊन गेले. शिल्पा नाकील यांचा नृत्यविष्कार मंत्रमुग्ध करून गेला. दसककर घराणे तर नासिकसाठी अभिमानास्पद आहेतच. त्यांच्याशिवाय नासिकचा कुठलाही सांगीतिक महोत्सव पूर्णच होऊ शकत नाही.

जगात जे जे उत्तम आहे पवित्र आहे ते भगवंताला अर्पण करणे म्हणजे अर्चन भक्ती. हा भाव मोहन उपासनींच्या बासरीने भक्तांच्या आणि पर्यायाने श्रीरामाशी तादात्म्य पावला. कारण भगवंत आणि आपण वेगळे नसतोच ना…!!!

प्रत्येकाच्या हृदयातला राम काल भक्तीने लीनही झालेला होता आणि प्रसन्नही झालेला होता. पंडित खापर्डे यांची सेवा म्हणजे ‘काया, वाचा, मन, चित्त, जीव, प्राण’ भगवंताच्या पायी समर्पित करणे होते. यात वित्तही आलेच. कारण अष्टोप्रहरात एकही कलाकार असा नव्हता ज्याने बिदागी घेतली होती. निखळ सेवेचा परिपाक म्हणजे अष्टौप्रहर स्वरहोत्र हा कार्यक्रम.

सातव्या प्रहरात नियमाचे बंधन आले तरी ‘विवेक केळकर, मिलिंद धटिंगण, प्रांजली बिरारी आणि श्रेयसी राय’ यांनी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला. नियमाची अगतिकता आणि रागाधिष्टीत भावगीतं यांच्या ओढाताणीत सुरू झालेला श्रीरामाचा नामघोष आणि मिलिंद धटिंगण यांचा आलाप हा क्षण म्हणजे श्रीरामासाठी प्राणपणाने प्रत्येकाच्या डोळ्यात दाटलेले अश्रू आणि गदगदलेला सूर !!!!
आणि या साऱ्या प्रहरांचा कळस ठरलेला प्रहर म्हणजे आठवा प्रहर. सत्तरी पार केलेले जेष्ठ, पंडित शंकरराव वैरागकर औरंगाबाद, वैजापूर येथील तीन मैफिली उरकून श्रीराम चरणी सेवा रुजू करायला असोशीने साडेअकरा वाजता पोहोचले. आणि प्रत्येकाची नजर ओली झाली. हे जे दिवसभर भाव एक झालेले होते ते श्रीरामचरणी  रुजू झालेच असणार. वंदन भक्ती म्हणजे लिन होणे. ही लिनताच कलाकारांना मोठे करते. पंडितजींचा लीन भाव साऱ्या प्रहरांचा कळसच ठरला.

कलाकार, भक्त यांचा भाव श्रीरामांपर्यंत पोहोचवणे हा निखळ हेतू असणारे विनायक रानडे यांची ही संकल्पना!!! हा जो पूर्ण चमू होता हे सारे पार पाडणारा… येथे दास्यभक्ती अगदी यथार्थ पार पडली. भक्तीच्या साम्राज्यात दास्य भावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रामदास स्वामी पण म्हणतात मी रामाचा दास झालो पण त्यामुळे जगाचा स्वामी झालो आणि अकिंचन असूनही समर्थपणे मिरवलो. हे या अष्टौप्रहर स्वरहोत्राच्या पूर्ण समूहासाठी म्हणता येईल. ‘श्री विनायक रानडे, श्री एन सी देशपांडे, सी एल कुलकर्णी, समीर देशपांडे आणि अजय निकम’ हे श्रीरामांचे खरेखुरे दास म्हणायला हवे!!! म्हणूनच प्रत्येकाच्या हृदयाचे ते स्वामी झाले!!!

आपल्या सेवेचे काय फळ मिळेल याचा किंचितही विचार न करता सेवा करणारे हे सेवा प्रवीण रामरायांचेही वैभव वाढवून गेले. कारण दासभक्तीत म्हणले आहे देवाचे वैभव सांभाळावे | न्यूनपूर्ण पडोची नेदावे | चढते वाढते वाढवावे | भजन देवाचे | रामरायाचे वैभव वाढावे म्हणून या सेवकांनी अक्षरशः पडेल ती कामे केली आणि जीवाचे रान केले. बरं एकदा दास्यत्व पत्करलंय म्हणलं की श्रेय घेण्याचा प्रश्नच येत नाही. पूर्ण कार्यक्रमात कोणाचेही वेगळे सत्कार समारंभ, श्रेय नामावली या गोष्टींना फाटा होता. हा सुज्ञ निर्णय मनापासून आवडला.

अष्टौप्रहर स्वरहोत्रामधे प्रत्येक जण भक्तीत लीन होऊन श्रीरामाशी एकरूप झालेला होता. भक्तीची ही अवस्था फार मधुर असते कारण भक्ताचा आपलेपणा आणि भगवंताचा मंगल भाव ….मग दाटून येते ती सख्य भक्ती…!!!

असे म्हणतात पुंण्याचे पारडे जड झाले की संचित निर्माण होते. ही सख्य भक्ती जुळवून आणणारे हे जे सेवक आहेत यांच्या पुण्याचे पारडे मूळचेच जड असावे म्हणून त्यांना हे सारे करण्याची इच्छा व्हावी …ती फलद्रूप व्हावी आणि आम्हा पामरांच्या पुण्यातही त्यामुळे भर पडावी!!!! यासाठी त्यांचे आभार काय आणि कसे मानावे….?

असे पुण्य  त्यांच्या हातून कायम घडो !!!!अर्थात अशी कामे घडण्यासाठी असंख्य हात लागतात. श्रीराम चरणी मनस्वी प्रार्थना आहे की अशा कामांसाठी, भक्तीसाठी मदतीचे ओघ यावेत म्हणजे वारंवार नाशिककरांना रामरायाच्या चिंतनात मग्न होता येईल. स्वतःस विसरून आनंदसागरात डुंबता येईल…. मग मुक्ती निराळी राहीलच कोठे …..?

अद्वैत भक्ती म्हणतात ती अष्टौप्रहर स्वरहोत्रच्या निमित्ताने अनुभवता आली.अर्थात भक्तीचे पारडे जड करण्यासाठी श्री रामरायाने हे सारे अद्वैत घडवून आणणे हे नाशिककरांचे अहोभाग्य !!!!
आपण सारे नाशिककर भाग्यवान !!!!
श्रीरामाचे आशीर्वाद आणि कृपादृष्टी अशीच सदैव राहो!!!!
जय श्रीराम
कविता शिंगणे गायधनी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.