नृत्य,गायन,शास्त्रीय संगीत,सुलेखना सह अनेक कलांचा संगम “अष्टोप्रहर स्वरहोत्र”

सुलेखनकार पूजा निलेश यांचा विशेष लेख 

0

‘ब्राह्मणे बाळबोध अक्षर, घडसून करावे सुंदर, जे देखताचि चतुर, समाधान पावती’या समर्थ रामदासांनी दासबोधात लिहीलेल्या ओळीत सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व अगदी साध्या शब्दात वर्णिले आहे.

सुलेखन कला ( कॅलिग्राफी) म्हणजेच सुंदर हस्ताक्षराची कला हे आपणा सर्वांना आतापर्यंत माहित झाले आहे. मात्र सुलेखन हे माणसाचे सामान्य हस्ताक्षर असे नसून एका विशिष्ट हेतूने प्रेरित सौंदर्यपूर्ण हस्ताक्षर या दृष्टिकोनातून त्याकडे पाहावे लागते. वाचनीयता हा या  अक्षर सौंदर्याचा प्रमुख घटक आहे. या दृष्टीने अक्षरांच्या उंची-लांबी-रुंदी प्रमाणे ही लेखणीच्या टोकाच्या (कटनिब) जाडीच्या पटीचा मापदंड ठेवून लिहावी लागते. सुवाच्य, सुस्पष्ट अक्षर-लेखनाबरोबरच अक्षरांच्या सौंदर्यावर, अलंकरण व सजावटीवर सुलेखनात जास्त भर दिला जातो. सुलेखनामागे प्रामुख्याने कलात्मक उद्दिष्टे व प्रेरणा असतात आणि दर्शकाला सौंदर्यानुभूती व उच्च प्रतीचा कलात्मक आनंद देण्याची भूमिका असते. त्यामुळे सुलेखन हा एक ललित कला प्रकार मानला जातो. सुलेखनात वर्णाला, अक्षरे यांची आकारिक चिन्हे (सिम्बॉल्स) ही कलात्मक आविष्काराची साधने म्हणून वापरली जातात. ‘कॅलिग्राफी’ हा शब्द मूळ ग्रीक ‘Kalligraphia’ ह्या, ‘सुंदर अक्षर’ ह्या अर्थाच्या शब्दापासून उत्पन्न झाला आहे. सुलेखनाचे आद्य व प्रधान उद्दिष्ट म्हणजे नेत्रसुखदता हे होय.

सुलेखन हे फक्त अक्षर सजावटी पुरता मर्यादीत नाही या कलेचा आपल्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम होत असतो. जसे एक सरळ काढलेली उभी रेष तुम्हाला आयुष्य उभारण्यात मदत करते. दोन सरळ रेषा तुम्हाला दोन व्यक्तींमधील अंतर  कसं राखावं हे शिकवते. मुळाक्षरे सातत्याने गिरवून तुमच्या मनावर शरीरावर एक संस्कार होत असतो. अक्षर घोटवून लिहील्याने तुमच्या मनाची एकाग्रता वाढते तुम्हाला आतून शिस्त लागते. तुम्ही अधिक संवेदनशील होऊन तुमचा संयम देखील वाढवता. हाताने लिहिण्याचे शास्त्रीयदृष्ट्या असंख्य फायदे आहेत. हाताने लिहिताना मेंदूचा वापर अधिक होतो, बोटांवर व्यवस्थित नियंत्रण येते, नवनवीन विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि बौद्धिक जडणघडणही चांगली होते. व्यक्तिमत्व विकासाची नीव उत्तम हस्ताक्षराने घातली जाते.

या सर्वांचा विचार करता शंकराचार्य न्यास आयोजित आणि चार चौघं, ग्रंथ तुमच्या दारी चे सर्वेसर्वा विनायक रानडे, सी. एल. कुलकर्णी, एन्. सी देशपांडे, समीर देशपांडे  यांच्या संकल्पनेतून १४ जानेवारीला होणाऱ्या अष्टौप्रहर स्वरहोत्र या कार्यक्रमात गोदावरी तिरावर श्री विष्णु म्हणजेच श्री देव बालाजी यांच्या साक्षीने आपण एक उपक्रम राबवित आहोत, ज्यात *विष्णू सहस्त्रनामावली* या विषयावर सुलेखन सादर करण्यात येणार आहे. या सारखा एक उपक्रम सौ. अलका चंद्रात्रे यांच्या संकल्पनेतून मनाचे श्लोक हा विषय घेऊन राबविण्यात आला होता त्या उपक्रमास देखील विद्यार्थ्यांकडून सुलेखनाचे धडे गिरवून सुलेखन याग सादर करण्यात आला होता. या वेळेस देखील आपल्या उपक्रमास समन्वयक म्हणून त्या सेवा देत आहेत त्यांनी अनेक शाळांमधून इच्छुक विद्यार्थी निवडले व त्यांना मी म्हणजेच पूजा निलेश गायधनी, कामिनी तांबे, महेंद्र जगताप यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कार्यशाळा घेऊन मुलांना सुलेखनाचे धडे देण्यात आले  आहेत. मुलांनी यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मागचे कारण असे कि मुलांनी आजच्या या कॉन्व्हेंटच्या आणि डिजिटल युगात इंग्रजी लेखना सोबत देवनागरी लिपीला देखील तितकच महत्त्व दिले पाहिजे, त्यांच्यावर अक्षर घोटवून लिहिण्याचे संस्कार वाढून त्यांची एकाग्रता वाढली पाहिजे. आणि याला अध्यात्माची जोड असल्यामुळे आपल्या मुखातून नामस्मरण होऊन ईश्वर सेवा देखील घडेल. हे प्रशिक्षण घेतलेली मुले कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्येक प्रहरात गटा गटाने विष्णुसहस्र नामावलीचे सुलेखन करून सेवा देणार आहेत. प्रत्येक प्रहर अखंड नेत्रसुखद लिखाणाने विष्णुमय होणार आहे.

या उपक्रमा सोबत दृकश्राव्य माध्यमातून अनेक कला सादर होणार आहेत. या कार्यक्रमात पूजा गायधनी, महेंद्र जगताप आणि निलेश गायधनी हे 10×3 लांबी रूंदी च्या मोठ्या पेपरवर सुलेखन प्रात्यक्षिक सादर करून सेवा देणार आहेत. नृत्य, गायन, शास्त्रीय संगीत, चित्रकला, सुलेखन, शिल्पकला अशा अनेक कलांचा संगम एकाच ठिकाणी पाहण्याची पर्वणी नाशिक करांना लाभणार आहे. अष्टौप्रहर स्वरहोत्र हा कार्यक्रम नाशिकचा सांस्कृतिक वारसा जपण्यात मोलाचे काम करणार आहे.
पूजा निलेश….
अबीर क्रिएशन्स..

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.