आशिया कप 2025: भारताचा पाकिस्तानवर विजयी झेंडा; तिलक वर्माचा विजयी ‘तिलक’
कुलदीप यादवचा कहर आणि टीम इंडिया नवव्यांदा आशियाई चॅम्पियन
दुबई, दि. २९ सप्टेंबर २०२५ – Asia Cup 2025 Final क्रिकेटप्रेमींनी आतुरतेने वाट पाहिलेल्या आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानवर ५ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय विशेष ठरला कारण भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आशिया कपच्या अंतिम सामन्यात आमनेसामने आले होते. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने बाजी मारत नवव्यांदा आशियाई विजेतेपद पटकावले.
पाकिस्तानची दमदार सुरुवात, पण कुलदीपचा कहर(Asia Cup 2025 Final)
सामन्याची सुरुवात पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारत केली. त्यांच्या सलामीवीरांनी जोरदार खेळी करत भारतीय गोलंदाजांवर दडपण आणलं.साहिबजादा फरहानने जसप्रीत बुमराहला लक्ष्य करत केवळ ३८ चेंडूत ५७ धावा ठोकल्या.त्याला साथ देत फखर जमांनेही आक्रमक फलंदाजी केली आणि दोघांनी मिळून ८४ धावांची भागीदारी उभारली. असा भास होत होता की पाकिस्तान १८०-१९० धावांपर्यंत सहज पोहोचेल. पण १३ व्या षटकात कुलदीप यादवने डाव फिरवला. त्याने प्रथम साइम अयूबला बाद केले आणि त्यानंतर पुढच्या पाच षटकांत पाकिस्तानची फलंदाजी अक्षरशः कोसळली.
कुलदीप यादव – ४ षटकांत ३० धावांत ४ बळी(Kuldeep Yadav Bowling)
त्याशिवाय अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि बुमराह यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. फरहान आणि फखरच्या जोडीमुळे जोरदार स्थितीत असलेला पाकिस्तान केवळ १४६ धावांवर गारद झाला.
भारताची खराब सुरुवात – २० धावांत ३ गडी बाद(India vs Pakistan Highlights)
१४७ धावांचं लक्ष्य भारतासमोर अवघड वाटत नव्हतं. पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच धक्के दिले.दुसऱ्याच षटकात अभिषेक शर्मा बाद झाले.त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिलही लवकर माघारी परतले.भारताचा स्कोर २० धावांपर्यंत पोहोचण्याआधी ३ बळी गेले होते. सामन्यात भारताचा पराभव होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण या प्रसंगी तिलक वर्माने जबाबदारी घेत डाव सावरला.
तिलक वर्माचा ‘तिलक’ – जिंकून दिलेला अर्धशतक(Tilak Varma Match Winning Knock)
तिलकने एका टोकाला संयमी पण प्रभावी फलंदाजी करत संघाचा डाव स्थिरावला.प्रथम संजू सॅमसनसोबत ५७ धावांची भागीदारी केली.सॅमसनने २१ चेंडूत २४ धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली.यानंतर तिलकला साथ देण्यासाठी शिवम दुबे आला. दोघांनी मिळून फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणले.दुबेनं २२ चेंडूत ३३ धावा केल्या, त्यात २ षटकार होते.तिलकने ४१ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.तिलकने अखेरपर्यंत एकतर्फी खेळ करत भारताला विजय मिळवून दिला.त्याने ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या.या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार होते.ही त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरची सर्वात मोठी आणि संस्मरणीय खेळी ठरली.
शेवटचा ओव्हर – तणाव आणि विजय(Pakistan vs India Cricket News)
भारताला शेवटच्या ६ चेंडूत १० धावा हव्या होत्या. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफसमोर तणावपूर्ण परिस्थिती होती.दुसऱ्या चेंडूवर तिलकने षटकार ठोकत सामना जवळजवळ जिंकून दिला.चौथ्या चेंडूवर रिंकू सिंगने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केले.भारताने सामना ५ गडी राखून जिंकला आणि पुन्हा एकदा आशियाई क्रिकेटचा बादशाह असल्याचं सिद्ध केलं.
सामन्याचा नायक – तिलक वर्मा आणि कुलदीप यादव
या विजयानंतर तिलक वर्मा आणि कुलदीप यादव हे सामन्याचे खरे हिरो ठरले.
तिलक वर्मा – नाबाद ६९ धावा
कुलदीप यादव – ४ बळी, पाकिस्तानच्या डावाला अक्षरशः उध्वस्त केलं
याशिवाय शिवम दुबे आणि संजू सॅमसनच्या योगदानाचाही विजयात महत्त्वाचा वाटा होता.
भारताचा नवा इतिहास
भारताने नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली.पाकिस्तानविरुद्ध सलग तिसरा विजय मिळवला.विशेष म्हणजे भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्याच फायनलमध्ये भारताने बाजी मारली.
चाहत्यांचा जल्लोष
#WATCH | Maharashtra | Massive celebrations by fans of the Indian cricket team in Nagpur post India’s victory against Pakistan in the #AsiaCup2025. pic.twitter.com/odITUwKaHo
— ANI (@ANI) September 28, 2025
दुबई स्टेडियममध्ये भारतीय प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. शेवटचा चौकार लागताच स्टेडियममध्ये “भारत माता की जय”च्या घोषणा सुरू झाल्या. सोशल मीडियावर चाहत्यांनी तिलक वर्मा आणि कुलदीप यादवचं कौतुक केलं. अनेकांनी लिहिलं – “टीम इंडियाने पाकिस्तानला पुन्हा एकदा हरवलं, हा आहे खरा चॅम्पियन.”आशिया कप 2025 चा अंतिम सामना हा क्रिकेट इतिहासात लक्षात राहील असाच ठरला. पाकिस्तानने दमदार सुरुवात केली, पण कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ्यातून ते बाहेर पडू शकले नाहीत. त्यानंतर भारताच्या डावात तिलक वर्मा भक्कम भिंत ठरला. त्याने केवळ धावांचं ओझं उचललं नाही तर संपूर्ण सामन्याचं पारडं भारताकडे वळवलं.टीम इंडिया पुन्हा एकदा आशियाई क्रिकेटची शान ठरली असून नवव्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला.
[…] […]