माजी मंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर : सुटकेचा निर्णय मात्र १० दिवसांनी
मुंबई,१२ डिसेंबर २०२२ – कथित १०० कोटी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी याचिकेवर ८ डिसेंबरपर्यंतचा निकाल राखून ठेवल्यानंतर आज निकाल दिला.पण अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने आक्रमक भूमिका मांडली. सीबीआयने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनिल देशमुख यांच्या जामिनावर १० दिवसांची स्थगिती दिली आहे.
अनिल देशमुख यांनी केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयनं विरोध केला असला तरी देशमुखांच्या वकिलांनीही कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवाद दरम्यान तपास यंत्रणेकडे कुठला ठोस पुरावा नसल्याचा जोरदार दावा केला होता. पण, देशमुख यांच्या विरोधात पुरावे नसल्याची मत कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे देशमुख आता १३ महिन्यानंतर जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. १ लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेनी दिलेला जबाब विश्वासहार्य नाही, अनिल देशमुख यांचा वाढतं वय, त्यांना असलेले आजार, सुनावणी दरम्यान अनेक वेळा ते चक्कर येऊन पडले. हे सर्व लक्षात त्यांना जामीन देण्यात यावा अशीही विनंती कोर्टाला केली आहे. ईडीकडे दाखल गुन्ह्यात अनिल देशमुख यांना आधीच जामीन मिळाला आहे. अखेर आज हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यामुळे सीबीआयला मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस डबल धमाका दिवस ठरला आहे, कारण आज शरद पवार यांचा वाढदिवस आणि त्यातच अनिल देशमुख तब्बल १३ महिन्यांनी दिलासा मिळाला आहे.
मात्र सीबीआयने या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहे. यासाठी १० दिवसांचा अवधी मागितला आहे. न्यायालयाने सीबीआयची ही मागणी मान्य केली आहे. जामिनावर स्थगिती दिली आहे. त्यामुळे १० दिवस देशमुख यांना जेलमध्येच थांबावे लागणार आहे.