मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२५ – Bal Karve Passed Away : मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजनवर आपल्या सहजसुंदर अभिनयाने छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे (Bal Karve) यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. ‘चिमणराव-गुंड्याभाऊ’ मालिकेतल्या ‘गुंड्याभाऊ’ या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले होते. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे.
इंजिनिअर ते अभिनेता – एक वेगळा प्रवास(Bal Karve Passed Away)
बाळ कर्वे यांचं खरं नाव बाळकृष्ण कर्वे होतं. मूळचे इंजिनिअर असले तरी अभिनयाची ओढ त्यांना रंगभूमीकडे घेऊन आली. ‘बाळ’ या नावानेच त्यांना लोकप्रियता मिळाली. रंगकर्मी विजया मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाट्यसृष्टीत पहिले पाऊल टाकले. अभिनयातील प्रगल्भता, मराठी भाषेवरचं प्रभुत्व आणि भूमिकेची उत्तम समज यामुळे ते पटकन प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले.
टेलिव्हिजनवरील अजरामर भूमिका
१९८० च्या दशकात प्रदर्शित झालेली चिमणराव-गुंड्याभाऊ ही भारतीय टेलिव्हिजनवरील पहिली मराठी मालिका होती. यात दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत ‘गुंड्याभाऊ’ म्हणून बाळ कर्वे यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही ताजी आहे. त्यानंतर स्वामी मालिकेत त्यांनी साकारलेला गंगोबा तात्या विशेष गाजला. वहिनीसाहेब, राधा ही बावरी, प्रपंच, उंच माझा झोका यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही त्यांच्या भूमिकांनी वेगळा ठसा उमटवला.
दर्जेदार नाट्यकृतींमध्ये ठसा
नाट्यसृष्टी हा बाळ कर्वे यांचा खरा आत्मा होता. सूर्याची पिल्ले, रथचक्र, कुसुम मनोहर लेले, मनोमनी, तांदुळ निवडता निवडता या नाटकांतील त्यांच्या भूमिका रंगभूमीवर गाजल्या. त्यांनी अभिनयासोबत प्रेक्षकांचं दर्जेदार मनोरंजन करण्याचा नेहमी प्रयत्न केला.
चित्रपटसृष्टीतील योगदान
जैत रे जैत हा त्यांचा पहिला सिनेमा. त्यानंतर सुंदरा सातारकर, चांदोबा चांदोबा भागलास का, चटक चांदणी, बन्याबापू अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. बन्याबापू चित्रपटातील बापूची भूमिका विशेष लोकप्रिय झाली. याशिवाय दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या कथा या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. मराठी चित्रपटातील प्रीतीचं झुळझुळ पाणी हे प्रसिद्ध गाणं त्यांच्यावर चित्रित झालं आहे.
नम्र स्वभाव, मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व
बाळ कर्वे हे केवळ उत्तम अभिनेता नव्हते, तर ते एक उत्तम सहकारी आणि नम्र व्यक्तिमत्व होते. सहकलाकारांशी मैत्रीपूर्ण वर्तन, अभिनयाबद्दलची खोल समज, आणि प्रत्येक भूमिकेकडे गांभीर्यानं पाहण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते सर्वांचे लाडके होते.
सिनेसृष्टीत शोककळा
त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली असून, ‘गुंड्याभाऊ’ म्हणून घराघरात पोहोचलेले बाळ कर्वे आज पडद्याआड गेले असले तरी त्यांचा अभिनयसंपदा प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहील.