मुंबई,दि,९ फेब्रुवारी २०२४ – शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.राज ठाकरे यांनी फेसबुक वर पोस्ट करुन ही मागणी केली आहे .शुक्रवारी पंतप्रधानांनी आणखी तीन दिग्गजांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी माजी पंतप्रधान नरसिंह राव,चरणसिंह चौधरी आणि कृषीतज्ज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर केल्याचं ट्वीट करत सांगितलं.नुकतंच लालकृष्ण अडवाणी आणि कर्पुरी ठाकूर यांनाही भारतरत्न जाहीर झाला आहे.
राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये काय म्हंटलं
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही.नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो.
राज ठाकरे पुढे म्हणतात, बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून,केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी बाळासाहेबांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायला हवं.
देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.
अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार स्व. बाळासाहेबांना भारतरत्न देणार का ? असा प्रश्न उपस्थित होतोय.
https://www.facebook.com/RajThackeray/posts/941114354042135?