दशक दुसरे, समास दुसरा उत्तम लक्षणे
श्रोत्यांनी आता सावधान व्हावे; मी आपणास सर्वज्ञपणाचे लक्षण असलेले उत्तम गुण सांगत आहे. वाट विचारल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, पडलेली वस्तू एकदम घेऊ नये, अतिवाद घालू नये, मनात कपट धरू नये, कूळ-शील शोधल्याशिवाय पत्नी करू नये, विचार केल्याशिवाय बोलू नये. विचारल्याशिवाय निर्णय घेऊ नये. मर्यादा ओळखून वागावे. प्रिती नसेल तर रुसू नये. चोराला ओळख विचारू नये. एकदम रात्री प्रवासाला निघू नये. लोकांशी बोलताना विनम्रता सोडू नये. पापाने द्रव्य जोडू नये. पुण्याचा रस्ता कधीही सोडू नये. निंदा द्वेष करू नये. चुकीच्या माणसाची संगत धरू नये. बळजबरीने द्रव्य हरण करू नये. वक्त्याचे खंडन करू नये. तोंडाळ व्यक्तीशी भांडू नये. वाचाळ व्यक्तीशी तंडू नये. संतसंग मनापासून करावा तो सोडू नये. अति क्रोध करू नये. जिवलग व्यक्तीला दुःख देऊ नये. शिकवण्याचा मनाला वीट वाटू देऊ नये. क्षणोक्षणी रुसू नये. खोटा पुरुषार्थ बोलू नये. केल्याविना पराक्रम सांगू नये. आपण बोललेले विसरू नये. प्रसंगी सामर्थ्य दाखवण्यास चुकू नये. काही कारण नसताना समोरच्याचा निषेध करू नये.
आळसामध्ये सुख मानु नये. एखाद्याने चहाडी केली तर लगेच त्यावर विश्वास ठेवू नये. शोध घेतल्याशिवाय काम स्वीकारू नये. सुखाची सवय लागू देऊ नये. पुरुषाने कधीही प्रयत्न सोडू नये. निरंतर कष्ट करण्याचा त्रास वाटून घेऊ नये. सभेमध्ये बोलताना लाजू नये. मात्र भरकटलेपणे बोलू नये. उगाचच पैज शर्यत लावू नये. जास्त चिंता करू नये, पण अगदी निश्चिंत देखील राहू नये. परस्त्रीकडे पापबुद्धीने पाहू नये. कोणाचे उपकार घेऊ नये, घेतले तरी वेळ पाहून फेडावे. परपीडा-विश्वासघात करू नये. अशुद्धता असू नये. मलीन वस्त्र नेसू नये. जाणाऱ्या व्यक्तीस कुठे जातो? म्हणून विचारू नये. व्यापकपणा सोडू नये तर कोणाच्या आधीन होऊ नये.
आपले ओझे दुसऱ्यावर टाकू नये. लेखी कराराशिवाय काम करू नये. हिन व्यक्तीकडून ऋण घेऊ नये. परवानगी घेतल्याशिवाय राजद्वारी जाऊ नये. खोटे आरोप करू नये. सभेमध्ये खोटे बोलू नये. आदर नसताना बोलू नये. स्वाभाविक वर्तन करावे. अकारण मत्सर करू नये. कोणी अन्याय केला नसेल तर त्याला त्रास देऊ नये. अनीतीने वागू नये. कोणास शारीरिक त्रास देऊ नये. खूप अन्न खाऊ नये. खुप निद्रा करू नये. दृष्ट व्यक्तीच्या घरी खूप दिवस राहू नये. आपल्याच गोष्टी सांगू नये. आपलीच कीर्ती वर्णू नये. आपल्या आपण गोष्टी सांगून हसू नये. धूम्रपान करू नये, मद्यपान करू नये. वाचाळ व्यक्तीशी मैत्री कधीही करू नये. कामं करण्याशिवाय राहू नये.
एखाद्याने नीच बोलल्यास ते सहन करू नये. ते वडिलांचेही आयते अन्न खाऊ नये. तोंडामध्ये शिवी असू नये. दुसऱ्याला पाहून हसू नये. गुणवंत व्यक्तीचे वाईट गुण घेऊ नये. पाहिलेली वस्तू चोरू नये. जास्त कंजूष होऊ नये. जिवलगांशी नेहमी कलह करू नये. कोणाचाही घात करू नये. खोटे उदाहरण सांगू नये. कधीही चुकीचे वर्तन करू नये. चहाडी, चोरी करू नये. दुसऱ्याच्या घरी जाऊ नये. त्याच्या एखाद्याच्या मागे त्याचे उणे दुणे सांगत बसू नये. वेळप्रसंगी धैर्य बाळगावे. सत्त्वगुण सोडू नये, शरण आलेल्या शत्रूला शिक्षा देऊ नये.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७