भावार्थ दासबोध – भाग १६

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

कुढणारा, कामचुकार, नाठाळ, कोपिष्ट, कुधन, टवाळक्या करणारा, अतिशय तामसी, अविचारी, पापी, अर्थाचा अनर्थ करणारा, भूत-संमन्धाचा संचार असलेला, आत्महत्या करणारा, स्त्रीहत्या करणारा, गोहत्या करणारा, ब्रह्महत्या करणारा, मातृहत्या करणारा, पितृहत्या करणारा, महापापी पतित, उणे बोलणारा, कुपात्र, कुतर्क करणारा, मित्रद्रोही,  विश्वासघातकी, कृतघ्न, मात्रागमनी, आतताई, अघोरी, बडबड्या, विपरीत भावना बाळगणारा, भांडण झगडा, कलह  लावणारा, रूढीविरुद्ध वागणारा, अधर्मी, शोक करणारा,  चहाड्या करणारा, व्यसनी, धाकात ठेवणारा, अस्वच्छ, द्वाड, अपयशी,चाळविणारा,  कृपण, लोचट, स्वार्थी, अभिलाशी, आसक्त, कवडीचुंबक,  कोडगा, द्वेष करणारा, बेअक्कल, भ्याड, कशातही डोकं खूपसणारा, थकवणारा, बंड  करणारा, पाषाणहृदयी, चोरटा, तस्कर, अपहरण करणारा, सैराट, मोकाट, बडबड्या, वात्रट, कुभांड रचणारा, भ्रष्ट बुद्धी असलेला, मारेकरी, लुटारू, दरोडेखोर, काळीजखाऊ, भोंदू, दुसऱ्याच्या घरात राहणारा,

मोहिनी विद्येने भुलवणारा, चेटक्या, निशंक, निलाजरा, भांडकुदळ, गलेलठ्ठ, धटिंगण, नफ्फट, ठोंब्या, अक्षरशत्रू, शठ, विकार असलेला, जगावर राग काढणारा, अधीर, हावरट, अनाचारी, अंध, पंगु, खोकलेकरी, थोटा, बधीर, दमेकरी तरीसुद्धा ताठा न सोडणारा, विद्याहिन, वैभवहिन, कुळहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, अदृष्टहीन, भिकारी, कळाहीन, बलहीन, मुद्राहीन, लावण्यहीन, कुरूप, शक्तिहीन, बुद्धीहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी, भक्तीहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतीहीन, क्षमाहीन, सर्वहीन, क्षुल्लक. वेळ काळ  प्रसंग न जाणणारा,  प्रयत्न न करणारा, अभ्यास न करणारा, नम्रता नसलेला, मैत्री न करणारा, काहीच येत नसलेला, अभागी!  असे विकार म्हणजे कुलक्षणाचे कोठारच होय. असा जो आहे तो कुविद्येचा नर आहे असे श्रोत्यांनी ओळखावे. अशा प्रकारची कुविद्येची लक्षणे आढळतील तेव्हा त्याचा त्याग करावा. अभिमानाने अट्टाहास पेटणे  हे योग्य नव्हे!  ईतीश्री दासबोधे, गुरुशिष्यसंवादे कुविद्या लक्षणनाम समास तृतीय समाप्त.

दशक दुसरे समास चौथा भक्ती निरूपण 
विविध चांगल्या कृत्यांचे फळ म्हणून नरदेह लाभलेला आहे त्यातही आपले भाग्य चांगले असेल तर सन्मार्ग सापडतो. नरदेहामध्ये ब्राम्हण हा विशेष असून संध्या-स्नान करणे, चांगले विचार बाळगणे, परमेश्वराचे भजन करणे हे पूर्व पुण्याने घडते.   भगवत भक्ती ही उत्तम आहे, त्यापेक्षाही संतांचा सहवास महत्त्वाचा असून त्यामुळे आपला वेळ चांगला सार्थकी लागतो, तोच लाभ होय.  स्नेह, प्रेम, सद्भावना आणि भक्तांचा समुदाय आणि त्यामध्ये हरिकथा असेल तर प्रेम दुपटीने वाढते. परमदुर्लभ  असलेल्या परलोक प्राप्त होण्यासाठी हे आवश्यक आहे.

विधीपूर्वक उपासना-कर्म करावे. दया दान धर्म जरूर करावा किंवा परमेश्वराचे भजन करणे हाही एक सोपा मार्ग आहे. काही कारणामुळे पश्‍चात्ताप होत असेल तर त्याचा त्याग करावा किंवा भक्तीयोग आचरावा. याबरोबरच साधू जणांचा सहवास देतील महत्वाचा आहे. पापक्षय होण्यासठी  नाना शास्त्रे धांडोळावी किंवा तीर्थयात्रा करावी, पुरश्चरणे करावी.  दुसर्यांवर उपकार करावा, ज्ञानाचा विचार करावा, वाचन करून निरूपण  करून त्यातील काय घेता येईल याचा विचार करावा. वेदांची आज्ञा पाळावी, कर्म उपासना केली असता ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो. काया वाचा आणि मन यांच्यासह  पाने, फुले, फळे यांचा उपयोग करून पूजा करावी. भजन करावे  व जीवनाचे सार्थक करावे. जन्माला आल्यानंतर असं काही करून जीवन सफल करावं तसं न झाल्यास आपले जीवन निष्ठा व भूमीला भार असल्याचे ओळखावे. नरदेहाचे सार्थक करण्यासाठी यथानुशक्ती मन आणि धन सर्व धर्मकार्यासाठी लावावे, हे जो ओळखत नाही तो मृतप्राय जीवन जगतो. जन्माला येऊन त्याने मातेला उगीचच कष्ट दिले असे म्हणावे लागेल.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.