दशक दुसरे समास दहावा पढतमूर्खाची लक्षणे उत्तरार्ध
अभ्यासामुळे ज्याला सर्व विद्या येतात पण लोकांना शिकवता येत नाही तो एक पढतमूर्ख. कोळीष्टकांच्या धाग्याने हत्तीला बांधावे, लोभाने भुंगा कमळात अडकतो त्याप्रमाणे प्रपंचामध्ये गुंतून पडतो तो एक पढतमूर्ख. स्त्रियांची संगत धरतो, स्त्रियांना निरूपण करतो, निंद्य गोष्टी करतो तो एक पढतमूर्ख. ज्याच्याकडे देहबुद्धी आहे, आपल्या शरीरामध्ये जी उणीव आहे तीच लक्षात घेऊन न्यूनगंड बाळगतो तो एक पढतमूर्ख. परमेश्वर सोडून माणसाची स्तुती करतो, दृष्टीस पडलेल्याची कीर्ति वर्णन करतो तो एक पढतमूर्ख. स्त्रियांच्या अवयवाचे वर्णन करतो, नाना नाटके, हावभाव करतो, देवाला विसरणारा जो माणूस आहे तो एक पढतमूर्ख. वैभवाचा डोलारा पाहून सर्व जीवमात्राला तुच्छ मानतो, शास्त्रविरुद्ध मत प्रतिपादन करतो तो एक पढतमूर्ख. व्युत्पन्न आणि वैराग्य, ब्रह्मज्ञान असलेला योगी असून जगाला भविष्य सांगत बसतो तो एक पढतमूर्ख.
विविध गोष्टी ऐकूनही गुणदोषांची खात्री करत नाही दुसऱ्यांच्या गुणांचा मत्सर करतो तो एक पढतमूर्ख. ज्याच्याकडे भक्तीचे साधन नाही ही वैराग्य नाही भजन नाही कृती नसताना नुसते ब्रह्मज्ञान बडबड करतो तो एक पढतमूर्ख. मनामध्ये तीर्थक्षेत्र वेदशास्त्र यांचा विचार नाही, पवित्र कुळामध्ये जन्म घेऊनही अपवित्र आहे तो एक पढतमूर्ख. आदर पाहून मनधरणी करतो, कीर्ती नसली तरी स्तुति करतो आणि कधी निंदा करून अनादर करतो तो एक पढतमूर्ख. मागे आणि पुढे एक अशी ज्याची वागण्याची रीत आहे, बोलतो एक आणि करतो एक अशी ज्याची वागण्याची रीत तो एक पढतमूर्ख. प्रपंचाची खूप आवड पण परमार्थाची नावड, स्वतःचे मत सांगण्यासाठी शास्त्राचा आधार घेतो तो एक पढतमूर्ख.
मुख्य गोष्टी सोडून दुसऱ्याच गोष्टी सांगतो, ज्याचे जीवन पराधीन आहे तो एक पढतमूर्ख. वरवरचे सोंग संपादन करतो, करू नये तेच करतो, भराभर चालून रस्ता चुकतो तोही पढतमूर्ख. रात्रंदिवस कथा श्रवण करतो मात्र आपले अवगुण सोडत नाही तो एक पढतमूर्ख. निरूपण ऐकण्यासाठी मोठमोठ्या श्रोते येऊन बसले तरी क्षुद्र माणसाला उद्देशून बोलतो तो एक पढतमूर्ख. एखादा शिष्य अनधिकारी असेल आपली आज्ञा मानत नसेल तरी तो पुन्हा आपले ऐकेल अशी आशा धरतो तो एक पढतमूर्ख. श्रवण केल्याने शरीराला कमीपणा आला , अशी क्रोधाने चिडचिड करतो तो एक पढतमूर्ख. भरपूर वैभव पैसा असल्याने सद्गुरुची उपेक्षा करतो, गुरुपरंपरेचे चोरी करतो तो एक पढतमूर्ख. बोलताना ज्ञान सांगतो आणि स्वार्थ साधतो तो एक पढतमुर्ख. पैशासाठी परमार्थाचा उपयोग करतो तो एक पढतमूर्ख. स्वतः आचरण केल्याशिवाय शिकवतो, पोटासाठी कथा-कीर्तन करतो दुसऱ्याच्या आधीन असलेला गोसावी म्हणजे पढतमूर्ख.
भक्तीमार्गाची मोडतोड करतो, चांगल्या प्रथा मोडतो असे वागणाऱ्या माणसाचे गुणगान करतो तो एक पढतमूर्ख. हातचा प्रपंच गेला, परमार्थ कणभरही नाही, देवा-ब्राह्मणांचा द्वेष करतो तो एक पढतमूर्ख. पढतमूर्खांची लक्षणे मी अवगुणांचा त्याग करण्यासाठी सांगितली आहेत त्याच्यात काही कमी जास्त झाले असेल तर क्षमा करावी. संसार दु:खाइतके दुःख कुठेच नसताना संसाराला सुख मानतो तो मूर्ख पेक्षाही मूर्ख परममूर्ख म्हणावा. त्याचेच पुढे वर्णन करणार असून दारुण गर्भवास, जन्म दुःखाचे लक्षण पुढे सांगत आहे. इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पढतमूर्ख लक्षण निरूपण नाम समास दशम समाप्त.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७