भावार्थ दासबोध – भाग ३१

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक तिसरे समास तिसरा सगुण परीक्षा
समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत, दुसऱ्यांदा विवाह झाला त्यामुळे आधीचे दुःख विसरला, संसाराचे सुख मानून दिवस कंठू लागला. मग तो अत्यंत कंजूषपणा करायला लागला. पोटाला अन्न न खाता पैशासाठी प्राण सोडायला लागला. दमडी देखील खर्च करण्याचे त्याच्या जीवावर येऊ लागले. आणखी आणखी पैसे साठवू लागला. मनात सद्वासना कुठून येणार? स्वतः धर्म करीत नव्हता आणि धर्मपालन करणाऱ्यांना विरोध करू लागला. साधूजनांची नेहमी निंदा करायला लागला. तीर्थ नाही, व्रत नाही, अतिथी नाही, अभ्यागताचे स्वागत नाही. मुंगीच्या मुखातील शीत देखील वेचुन ते साठवायला लागला. स्वतः पुण्य करेनासा झाला आणि कोणी दुसरं करीत असेल तर त्याला पहावेना. त्याचा उपहास करू लागला थट्टा करू लागला. देव, भक्तांचा तो द्वेष करायला लागला, त्यांना शारीरिक त्रास द्यायला लागला. निष्ठुर बोलून प्राणिमात्रांमध्ये अंतर निर्माण करू लागला. नीती सोडून दिली आणि अनितिने वागू लागला.

सदा सर्वकाळ गर्व बाळगू लागला. पूर्वजांना फसवलं, पक्ष श्राद्ध केले नाही. कुळधर्म केला नाही. बहिणीला सवाष्ण आणि मेव्हण्याला ब्राह्मण सांगून पाहुण्यांवर भागवले. हरिकथा आवडेनाशी झाली, देव नकोसा झाला. उगीचच स्नान संध्या कशासाठी करायची? असा प्रश्न विचारू लागला. पैशाची अभिलाषा वाढली आणि त्यासाठी तो विश्वासघात करायला सिद्ध झाला. तारुण्याच्या गर्वाने उन्मत्तपणे मातला. तारुण्य असले तरी धीर नव्हता त्यामुळे करायला नको ते महापाप करीत राहिला. बायको केली ती पण लहान वयाची. धीर धरत नाही म्हणून तो ओळखीपाळखी विसरायला लागला. माय बहिणीला विचारीनासा झाला. दुसऱ्याच्या घरी पाप केले. शेवटी राजाच्या द्वारी त्याला दंड झाला तरी त्याच्यामध्ये बदल होईना.

परस्त्रीला पाहून त्याच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण व्हायला लागली आणि तो पुन्हा पुन्हा कष्टी होऊ लागला. अशा प्रकरची अनेक पापे त्यांने केली, शुभ अशुभ काही उरलं नाही. त्याने त्याच्या जीवनामध्ये दुःख व दोष भरून राहिले. सगळ्या शरीरामध्ये व्याधी निर्माण झाली. क्षयरोग झाला. आपल्याच भोगामुळे सर्व दोष निर्माण झाले. दुःखामुळे सर्वांग फुटले, नाक बसले, चांगली लक्षणे जाऊन वाईट लक्षणे दिसायला लागली. देहाला क्षीणता आली. नाना व्यथा निर्माण झाल्या. तारुण्य शक्ती राहिली नाही. प्राणी खंगला. सर्वांग दुखायला लागलं, देहाला अवकळा आली. अंग चळचळा कापू लागले. शक्ती नाही. हातपाय झडले. सर्व अंगात किडे पडले. लहानथोर लोक पाहून थुंकू लागले. विष्ठा जमा झाली, भोवती घाण झाली. आता जीव जगतो की वाचतो असे वाटू लागले. आमच्या पापाचा घडा भरला नाही का? देवा आता मरण दे, जीवाला कष्ट होत आहेत. दुःखामुळे घळघळा रडू लागला. जो जो अंगाकडे पाहावे तो जीव तळमळू लागला. असे खूप कष्ट झाले. सगळी वाताहात झाली.

दरम्यान दरोडा घालून चोरट्यांनी सगळं चोरून नेलं. आता ना इकडे ना तिकडे आता समोर प्रारब्ध उभं राहिलं. आपल्या आपणच मलमूत्र सेवन करण्यासारखी दुःखदायक स्थिती उद्भवली. हळूहळू पाप सरत गेले तसं दुखणं कमी होत गेलं. वैद्याने औषध दिली उपचार केले मग मरता मरता वाचला. त्याचा पुन्हा जन्म झाला. लोक म्हणाले, आता पुन्हा माणसात आला. त्याने पुन्हा बायकोला आणले, पुन्हा संसार मांडला. पुन्हा स्वार्थबुद्धी धरली. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!