भावार्थ दासबोध – भाग ५४

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक ४ समास ९ वा आत्मनिवेदन भक्ती 
मागे आपण आठव्या भक्तीचे लक्षण सांगितल.आता सावधपणे नववी भक्ती जाणून घ्या.नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती.ते मी प्रांजळपणे कथन करीत आहे.परमेश्वराच्या चरणी समर्पित भाव म्हणजे आत्मनिवेदन होय. मी भक्त असे म्हणून विभक्त पणाने मी वेगळेपणाने देवाची पूजा करावी हे विलक्षण आहे.लक्षण असूनही विलक्षण,ज्ञान असूनही अज्ञान,भक्त असूनही विभक्तपण असं हे आहे.भक्त म्हणजे विभक्त नाही आणि विभक्त म्हणजे भक्त नाही याचा विचार जर केला तर त्याच्यातील समाधान तुमच्या लक्षात येईल, तेव्हा त्याचा विचार करावा.

देव कोण तो ओळखावा. आपण आपला अंतर्यामी शोध घ्यावा. मी कोण याचा शोध घेतला तर आपण नाही! असं लक्षात येतं.अशा तऱ्हेने आपण नाहीच हे लक्षात आल्यानंतर आत्मनिवेदन तत्व सहजपणे साध्य होते. तात्त्विकदृष्ट्या सगळ आहे परंतु विचार केला असता त्या सगळ्याचा निरास होतो. प्रकृतीचा निरास झाला की आत्मा आपल्याला सापडतो. तात्त्विक दृष्ट्या पाहिले तर भासते, विचार केला तर निरास होतो, प्रकृती नाहीशी होताच आत्मा असतो मग मी कुठे आला? परमेश्वर हा मुख्य आहे, दुसरी जगदाकार प्रकृती आहे. तिसरा आपण मध्येच कुठून आला चोरासारखा? अशाप्रकारे ही देह अहंता खोटी आहे हे सिद्धच झाले. विचार केला असता काहीही नाही!

तत्त्वविवेचन करू गेले तर पिंड-ब्रह्मांड तत्त्व रचना विश्वाकार केलेली आहे, म्हणजे नाना तत्त्वच विस्तारलेली आहेत. ही तत्वे आपण पाहायला गेले तर दिसत नाहीत आणि न पाहायला गेले तर तुम्हाला आत्म्याची प्रचीति येते.अशाप्रकारे आदि आणि अंती आत्माच आहे, आपण नाहीच हे समजते. आत्मा हा एकच स्वानंदघन आहे आणि मी म्हणजे आत्मा हे वचन आहे तर मग आपण वेगळे कुठे उरतो? सोहम हंसः हे याचे उत्तर असून आत्म्याचा विचार केला तर आपण कुठे येतो? आपण तिथे उरत नाही! आत्मा निर्गुण निरंजन आहे. तो एकमेव आहे. तिथे आपण म्हणजे शब्दच नाही येत.आत्मा म्हणजे अद्वैत तिथे द्वैत अद्वैत असा भेद नाही म्हणून मी पणाचा तिथे विचारच येत नाही. आत्मा म्हणजे पूर्णपणे परिपूर्ण. तिथे गुण-अगुण नाहीत. निखळ निर्गुण असेल तर तेथे आपण कुठून येणार? मी-तू पण नष्ट झाल्याने वस्तूही एकमेव आहे.

जीव शिव उपाधीचे वर्णन करता जीव शिवं स्वरूपाशी दृढ बुद्धी झाला असताना आपण असे वेगळे ओळखत नाही. आपण मिथ्या आहोत. परमेश्वर हाच खरा आहे. देव आणि भक्त हे दोघेही एक आहेत असा या वचनाचा अर्थ आहे. हे अनुभवी लोक जाणतात. याचं नाव आत्मनिवेदन असून ज्ञानी लोकांचे समाधान आणि नवव्या वृत्तीचे लक्षण हेच होय.  पंचभूतांमध्ये आकाश आहे. सर्व देवांमध्ये जगदीश आहे आणि नवविधाभक्तिमध्ये नववी भक्ती आत्मनिवेदन भक्ती विशेष आहे. ही आत्मनिवेदन भक्ती जर झाली नाही तर जन्ममरण चुकणार नाही हे सत्य वचन आहे. त्याला दुसरे प्रमाण नाही.  अशी ही नवविधाभक्ति सायुज्य मुक्तीसाठी केली पाहिजे.

सायुज्यमुक्ती ही युगाचा अंत झाला तरी न ढळणारी आहे.तिन्ही मुक्तीत नाश आहे, पण सायुज्यमुक्ती मात्र अचळ आहे. त्रेलोक्याचा नाश झाला तरी सायुज्यमुक्ती नष्ट होत नाही. चत्वारमुक्ती म्हणजे सायुज्यमुक्ती, वेदशास्त्र सांगतात, त्यामध्ये तीन नष्ट होणार्या आहेत तर चौथी अविनाशी आहे. पहिली मुक्ती म्हणजे स्वलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सायुज्यमुक्ती.अशा प्रकारच्या चार मुक्ती आहेत. त्या भगवदभजनामुळे प्राण्याला प्राप्त होतात. असं हे प्रांजळ निरूपण आहे ते त्यांनी सावधपणे पुढे ऐकावे.  इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मनिवेदन भक्ती नाम समास नववा समाप्त.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!