भावार्थ दासबोध -भाग ५८

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक पाचवे समास दुसरा सद्गुरुची लक्षणे
जय जय रघुवीर समर्थ
जीव हा एकांगी आहे म्हणून अल्पज्ञानी,मर्यादित आहे.गुरू केवळ आपल्या वचनाद्वारे त्याचे संसारसंकट दूर करून त्याला ब्रह्म करतो.वेदांमध्ये लपलेले ज्ञान मुलाला घास भरवावा तसे शिष्याला आपल्या उद्गाराने देतो.वेदशास्त्र,अनुभवी,हा एकच अनुभव घेतो तोच खरा गुरू होय.संशय पूर्णपणे जाळून टाकतो,स्वधर्माचे आदराने प्रतिपादन करतो,वेदाशिवाय अन्य बडबड करीत नाही.जे जे मनाला वाटते ते स्वतः मुक्तपणे करतो तो गुरु नव्हे,गळी पडलेला भिकारी होय.

शिष्याला साधन सांगत नाही,इंद्रियांचे दमन करायला लावत नाही,असे गुरु पैशाला तीन मिळाले तरी त्यागावे!ज्ञानाचा बोध करतो,अविद्या संपूर्ण नाहीशी करतो,इंद्रियांचे दमन करण्यास सांगतो तो सद्गुरू जाणावा. काही गुरु द्रव्याने विकले जातात,काही शिष्यांचे ऐकत राहतात,काही वाईट इच्हामुळे दीन होतात.शिष्याला आवडते त्याची मनधरणी करतात त्यामुळे पापिणी कामना गळ्यात पडते. स्पष्टपणे सत्य न सांगणारा गुरु अधमाहून अधम आहे.चोरटा खोटारडा आणि द्रव्याचा लाचार आहे.दुराचारी वैद्य पैशांची राखरांगोळी करतो आणि शेखी मिरवतो तसा तो घातकी असतो.

गर्दी करून बंधनाचा गुंता करील आणि देवापासून दूर नेईल असा गुरु नसावा. जिथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन आहे तोच सद्गुरु असून डोळ्यांनी आपल्याला इच्छित गोष्ट दाखवतो. अनेक गुरु प्रकाश दर्शन आदि चमत्कार दाखवतात,कानामध्ये मंत्र फुंकतात, त्यांना तितकाच ज्ञान असतं मात्र भगवंतापासून ते दूर नेणारे असतात.शास्त्रप्रचिती,गुरुप्रचिती आणि आत्मप्रचीती हे जिथे दिसते तोच सुलक्षणी गुरु होय. त्यालाच शरण जावे.त्यानाच मुमुक्षुने आदरपूर्वक शरण जावे.निरूपण करताना उत्तम वक्ता आहे, मात्र विषयांची आसक्ती आहे अशा गुरुमुळे जीवनाचे सार्थक होणार नाही. निरुपणाच्या वेळी मन वावगे कृत्य करते,चंचल आणि ध्येय रहित आहे हे उपयोगाचे नाही.

निरुपणाचे सामर्थ्य सिद्धी आहे पण ऐकल्यावर त्याची वाईट इच्छा त्रास देतात, नाना चमत्कारामुळे बुद्धी डळमळते असे नको. ज्ञाते, विरक्त भक्त हे प्रत्यक्ष भगवंताच्या बरोबरीचे असतात. सिद्धीमुळे त्यांचे सामर्थ्य अद्भुत असते. मात्र त्यात स्वार्थ नसावा. सगळ्या वाईट इच्छा नाहीशा झाल्या तरच भगवंत भेटतो. वाईट इच्छा धरणारे केवळ शाब्दिक ज्ञानी असतात. ज्ञानी म्हणवणाऱ्या अनेकांनी नागवले, इच्छा अपेक्षांमुळे वेडे केले, कामना केल्यामुळे त्या बापड्या मूर्खांचे मरण ओढवले. कामनाविरहीत असा जो विरळ संत आहे त्याचे मत सगळ्यांपेक्षा वेगळे अक्षय असे असते.

एखाद्याकडे अक्षय ठेवा असतो परंतु शरीराचे ममत्व कमी होत नाही तेव्हा ईश्वराकडे जाण्याचा मार्ग चुकतो. सिद्धीमुळे सामर्थ्य आले, सामर्थ्यामुळे देहाला महत्त्व आले त्यामुळे देहबुद्धीचे जू खांद्यावर आले! त्यामुळे अक्षय सुख सोडून जे लोक सामर्थ्याची इच्छा करतात ते मूर्ख आहेत. इच्छेसारखे दुःख आणखी काहीही नाही. ईश्वराव्यतिरिक्त जे कामना करतात त्यामुळे त्यांना नाना यातना भोगाव्या लागतात. त्यांचे पतन होते. शरीराचा अंत होताच सामर्थ्यही निघून जाते. कामनेमुळे मनुष्य भगवंतापासून दूर होतो, म्हणून निष्कामता विचार हाच दृढ बुद्धिचा निर्धार असून सद्गुरुच पैलपार करू शकतो. विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती हेच सद्गुरूचे मुख्य लक्षण आहे. प्रबळ वैराग्य, उदास वृत्ती, आणि स्वधर्माचे निर्मळ आचरण हे गुरुचे वैशिष्ट्य आहे. या भागांमध्ये आपण सदगुरची काही लक्षणे पाहिली आता पुढील लक्षणे पुढील भागात! जय जय रघुवीर समर्थ ! (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.