दशक पाचवे समास तिसरा शिष्याची लक्षणे
जय जय रघुवीर समर्थ
मागच्या समासामध्ये सद्गुरुची लक्षणे वर्णन केली. आता शिष्यांची ओळख करून देतो, ती सावधपणे ऐका. सद्गुरु नसताना सत्शिष्य नसेल तर तो निश्चितपणे वाया जातो आणि शिष्य चांगला नसेल तर सद्गुरुला विनाकारण शीण होतो. उत्तम शुद्ध भूमी शोधली, तिथे कीड लागलेले बीज पेरले किंवा चांगलं बीज आणलं परंतु ते दगडावर टाकलं तर काय होईल? चांगला शिष्य आहे पण गुरु मात्र मंत्रतंत्र सांगतो त्यांमुळे इह आणि परलोक कोणताच लाभ होणार नाही. गुरु पूर्ण कृपा करतो, मात्र शिष्य अनधिकारी असेल तर भाग्यवान पुरुषाचा पुत्र भिकारी असावा तशी अवस्था असते.
एकापेक्षा एक असे निरर्थक असतं त्यामुळे परलोकीचे सार्थक होत नाही. म्हणून सद्गुरु आणि सद्शिष्य असेल तर दोघे एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करतात. त्यामध्ये जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. चांगली भूमी आणि उत्तम धान्य असेल तरी पाऊस नसेल तर ते उगवत नाही, त्याप्रमाणे अध्यात्म निरूपण व्यर्थ जाते. शेत पेरले आणि उगवले पण निगा राखली नाही तर ते वाया जाते तसं साधना केली नाही तर साधकाचे होते. पीक हाती येईपर्यंत प्रयत्न करावे लागतात, पीक आल्यावर देखील शांत बसता येत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञान झाले तरीही साधन केलं पाहिजे. एक वेळ उदंड जेवण केले तरी दुसऱ्या वेळी लागतेच तसेच साधन, अभ्यास, सद्गुरु, सत्कर्म, सद्वासना यांच्यामुळे संसार पार होतो. चांगली उपासना, सत्कर्म, सक्रिया, आणि स्वधर्म , सत्संग आणि नित्यनेमाने निरंतर हवा. असं सगळे एकत्र आलं तरच निर्मळ ज्ञान मिळते नाहीतर लोकांमध्ये पाखंडीपणा संचारतो.
येथे शिष्याचा दोष नाही, सगळं सद्गुरूच्या हातात, सद्गुरु नाना प्रयत्न करून अवगुण बदलतात. सद्गुरूच्यामुळे चांगले नसलेले शिष्य देखील चांगले होतात परंतु चांगले शिष्य जर असतील आणि गुरु चांगले नसतील ते गुरु बदलू शकत नाही. कारण मोठेपणा महत्वाचा असतो, सद्गुरु पाहिजे त्यामुळे माणूस सन्मार्गाला लागतो नाहीतर दगडावर ती सगळी विद्या जाते. सद्गुरुचे वर्णन आपण केले. आता आपण सत्शिष्याची ओळख पटवून घेऊ या. सद्गुरुच्या वचनावर पूर्ण विश्वास आणि अनन्यभावाने सद्गुरुला शरण जातो तो सच्चा शिष्य. शिष्य निर्मळ हवा, शिष्य विचारशील पाहिजे,
आचारशील पाहिजे, शिष्य विरक्त पाहिजे, चुकीबद्दल माफी मागणारा असावा, शिष्य निष्ठावंत पाहिजे, आचारशील पाहिजे, शिष्य सर्वप्रकारे विनयशील पाहिजे, शिष्य परम दक्ष पाहिजे, शिष्याने लक्ष दिले पाहिजे, शिष्य धैर्यवान पाहिजे, शिष्य उदार पाहिजे, शिष्य अत्यंत तत्पर पाहिजे, परमार्थाविषयी. शिष्य परोपकारी हवा, अर्थामध्ये प्रवेश करणारा हवा, शिष्य परम शुद्ध हवा, शिष्य परमसावध हवा, शिष्य उत्तम गुणांचा हवा, शिष्य प्रज्ञावंत हवा शिष्य प्रेमळ भक्त हवा, शिष्य मर्यादा पाळणारा, मर्यादा पाळणारा नितिवंत हवा, शिष्य युक्तिवंत हवा, शिष्य बुद्धिवान हवा, शिष्य चांगला-वाईट विचार करणारा हवा. शिष्य धारिष्ट्यवान हवा, दृढ व्रत करणारा हवा. शिष्य उत्तम कुळीच्या पुण्यशील हवा. शिष्य सात्विक असावा, शिष्य भजन करणारा असावा, शिष्य साधक असावा, शिष्य विश्वासू असावा, शिष्य शारीरिक कष्ट करणारा असावा, शिष्य परमार्थ वाढविणारा असावा. शिष्यांची पुढील लक्षणे पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७