दशक पाचवे समास आठवा मुमुक्षु लक्षणे
जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत, संत ओळखले नाहीत, भगवंताची पूजा केली नाही, अतिथी अभ्यागतांना संतुष्ट केले नाही. पूर्व पापामुळे माझ्याकडून काहीच घडले नाही. माझे मन कुमार्गावर गेले. शरीराला कष्ट दिले नाहीत, परोपकार केले नाहीत, काममदामुळे आचाराचे रक्षण केले नाही. भक्ती बुडवली, शांती विश्रांती मोडून टाकली, मी सद्बुद्धी सद्वासना बिघडवली आता कसे सार्थक घडेल? निरर्थक दोष केले,माझ्याकडे विवेक उरला नाही. मी कोणता उपाय करावा? परलोकी कसे जावे? हे देवाधिदेवा तू कसा पावशील? सद्भाव नाही निर्माण झाला, नाही लौकिक संपादन केला, वरवरचा दंभ केला खटाटोप कर्मांचा. पोटासाठी कीर्तन केले. बाजारात देव मांडले. देवा माझी बुद्धी खोटी, मी जाणतो. पोटात अभिमान धरून शब्द बोललो, मनामध्ये धनाची इच्छा धरून ध्यानस्थ झालो. विद्वत्तेने लोकांना फसवले. पोटासाठी संतांची निंदा केली. माझ्यामध्ये नाना प्रकारचे दोषच भरले आहेत. सत्य उधळून लावले, खोटे प्रतिपादन केले, पोट भरण्यासाठी नाना कर्म केले. अशाप्रकारे मला पस्तावा झाला.
निरूपणामुळे त्याच्यामध्ये बदल झाला तो मुमुक्षु असं विविध ग्रंथात म्हंटल आहे. मग त्याने पुण्यमार्गाची इच्छा धरली, सत्संगाची इच्छा केली, संसारापासून विरक्त झाला त्याचे नाव मुमुक्षु. अनेक राजे चक्रवर्ती गेले, माझे वैभव किती? आता आता सत्संगती धरू! असे म्हणतो त्याचे नाव मुमुक्षु. आपले अवगुण पाहिले, विरक्तीचे बळ ओळखले, स्वतःला दुःखाने निंदू लागला त्याचे नाव मुमुक्षु. तो म्हणतो मी उपकार केले नाहीत, मी दंभधारी आहे, मी अनाचारी आहे त्याचे नाव मुमुक्षु. मी पतित आहे, चांडाळ आहे, म्हणून मी दुराचारी आहे, दुर्जन आहे असे म्हणतो त्याचे नाव मुमुक्षु. मी अभक्त, दुर्जन आहे. मी पाषाण म्हणून जन्माला आलो, असे म्हणतो त्याचे नाव मुमुक्षु.
मी दुराभिमानी आहे, मी कोपिष्ट आहे, नाना व्यसनी आहे असे म्हणतो याचे नाव मुमुक्षु. म्हणे मी आळशी अंगचोर आहे, म्हणे मी कपटी भित्रा आहे, म्हणे मी मूर्ख अविचारी आहे याचे नाव मुमुक्षु. म्हणे मी निकामी वाचाळ, मी पाखंडी तोंडाळ आहे, म्हणे मी कुबुद्धी कुटील आहे त्याचे नाव मुमुक्षु. म्हणे मी काहीच जाणत नाही, म्हणतो मी सगळ्यांमध्ये कमी आहे, माझ्यामध्ये वाईट लक्षणे आहेत असे म्हणतो त्याचे नाव मुमुक्षु. म्हणे मी अनधिकारी आहे, मी कठोर आहे, भ्रष्ट आहे, म्हणे मी नाना परीने नीच आहे. याचे नाव मुमुक्षु. मी आपमतलबी, अनर्थ करणारा आहे, म्हणे मी परमार्थी नाही याचे नाव मुमुक्षु, म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी का व्यर्थ आलो जन्माशी? म्हणे मी भार झालो भूमीशी. याचे नाव मुमुक्षु. स्वतःची निंदा करतो, पोटामध्ये संसाराचा त्रास वाटतो, सत्संगाचा हव्यास धरतो त्याचे नाव मुमुक्षु. नाना तीर्थ धुंडाळतो, समाधी साधने करतो, नाना ग्रंथांत शोधून पाहतो त्याचं समाधान होत नाही, त्यामुळे संतांना शरण जाऊ असं त्याला वाटतं. त्याचे नाव मुमुक्षु.
देहाभिमान, कुलाभिमान, द्रव्यअभिमान, नाना अभिमान सोडून संतांच्या चरणी अनन्यभावे जावे असे वाटते याचे नाव मुमुक्षु. अहंकार सोडून स्वतःची नाना परीने निंदा करतो. मोक्षाची अपेक्षा करतो. तो मुमुक्षु. थोरपण दिले असता लाजतो, परमार्थासाठी कष्ट करतो, संतांवर विश्वास ठेवतो त्याचे नाव मुमुक्षु. प्रपंचाचा स्वार्थ सोडून परमार्थाचा हव्यास धरतो. सज्जनांचा अंकित होतो तो मुमुक्षु. असा मुमुक्षु असतो. त्याची चिन्हे ओळखावी, साधकाची लक्षणे जाणण्यासाठी श्रोत्यांनी पुढे लक्ष द्यावे.इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे मुमुक्षु लक्षणे नाम समास अष्टम समाप्त.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७