भावार्थ दासबोध -भाग ७२

निरुपण :पद्माकर देशपांडे

0

दशक पाचवे समास दहावा सिद्धाची लक्षणे 
जय जय रघुवीर समर्थ. संसारिक माणसाने त्याग केला नाही तर साधक होऊ शकत नाही का ? हा प्रश्न मागील समासात विचारला होता. त्याचे उत्तर देत आहे. चांगला मार्ग स्वीकारणे, वाईट मार्गाचा त्याग करणे अशा प्रकारचा संसारिक माणसाचा त्याग असावा.वाईट बुद्धीचा त्याग केल्याशिवाय चांगली बुद्धी लाभणार नाही असा संसारिक त्याग असतो. प्रपंचाचा वीट मानला, मनाने विषयांचा त्याग केला तरच पुढे परमार्थाचा मार्ग अवलंबता येतो.

अभावाचा त्याग,संशयाचा त्याग, अज्ञानाचा त्याग हळूहळू घडू शकतो.असा सूक्ष्म त्याग घडतो,निस्पृह व्यक्तीस बाहेरील गोष्टी देखील त्याग करणे आवश्यक आहे. संसार व्यक्तीस वेळोवेळी बाह्य त्याग करावा लागतो. त्याग केल्याशिवाय नित्यनियम, कथा श्रवण करता येत नाही. अशा त्यागाशिवाय साधक होता येत नाही. मनात निर्माण झालेल्या शंका आता मिटल्या.आता पुढील कथा ऐका. मागे आपण साधकाची ओळख करून घेतली आता सिद्ध लक्षणे जाणून घेऊया.ब्रह्म होऊन गेला,संशय ब्रह्मांडाच्या बाहेर गेला,परमेश्वराप्रती दृढ श्रद्धा निर्माण झाल्याने तो सिद्ध होतो. बध्दपणाचे अवगुण मुमुक्षु पणात नसतात.मुमुक्षु पणाचे लक्षण साधकपणात नसतात.

साधकाला संदेह वृत्ती असते ती पुढे नष्ट होते.त्यामुळे निसंदेह असेल तो साधू असल्याचे ओळखावे.संशयरहित ज्ञान हेच साधूचे लक्षण आहे, सिद्धाच्या अंगी संशय कसा बरे असेल? कर्ममार्ग मध्ये संशय भरलेला,साधनांमध्ये संशय असेल, सर्वांमध्ये संशय भरलेला असला तरी साधू मात्र निस्संदेह असतो.संशयाचे ज्ञान खोटे,समस्याचे वैराग्य पोरके,संशयाचे भजन खोटे असते ते निष्फळ असते. संशयाचा देव व्यर्थ आहे,संशयाचा भाव व्यर्थ आहे,संशयाचा स्वभाव व्यर्थ आहे,संशयाचे व्रत व्यर्थ आहे,संशयाचं तीर्थ व्यर्थ आहे,निश्चय नसेल तर संशयाचा परमार्थ व्यर्थ आहे.संशयाची भक्ती व्यर्थ आहे.संशयाची प्रीती व्यर्थ आहे.संशयाची संगती व्यर्थ आहे.

तिच्यामुळे संशय वाढतो.संशयाचे जगणे व्यर्थ आहे,संशयाचे धरणे व्यर्थ आहे,संशयाचे करणे व्यर्थ आहे,संशयाची पोथी व्यर्थ आहे,संशयाची व्युत्पत्ती व्यर्थ आहे.संशयाची गती निश्चयाविना व्यर्थ आहे. संशय असलेली दक्षता व्यर्थ आहे,संशयाचा पक्ष व्यर्थ आहे,संशयाचा मोक्ष व्यर्थ आहे,कारण तो होणारच नाही.संशयाचा संत व्यर्थ आहे,संशयाचा पंडित व्यर्थ आहे,निश्चायानिवा संशयाचा बहुश्रुत व्यर्थ आहे.संशयाची श्रेष्ठता,संशयाची व्युत्पन्नता, संशयाचा

ज्ञाता निश्चय नसेल तर व्यर्थ आहे.निश्चयाशिवाय सर्व काही असले तरी ते अणुमात्रही प्रमाण नाही.संदेहाच्या प्रवाहात पडणे व्यर्थ आहे.निश्चय नसेल तर जे बोलले असते ते सगळे कंटाळवाणे आहे.
वाचाळपणे सगळे बाष्कळ बोलणे निरर्थक आहे. निश्चयाच्या विना वल्गना म्हणजे अवघी विटंबना होय. संशयामुळे मनाला समाधान मिळत नाही, म्हणून संदेहरहीत ज्ञान हेच निश्चयाचे समाधान, हेच निश्चितपणे सिद्धांचे लक्षण आहे.तेव्हा श्रोता प्रश्न विचारतो निश्चय कसा करावा?निश्चयाचे मुख्य लक्षण मला सांगावं.निश्चय असा असतो,मुख्य म्हणजे देव कसा आहे,नाना देवांचा गलबला करूच नये, गोंधळ करू नये. ज्याने सर्व चराचर निर्माण केले त्याचा विचार करावा, तोच परमेश्वर आहे, असे विवेकाने ओळखावे!समर्थ रामदास स्वामी सिद्धांची लक्षणे सांगत आहेत.पुढील माहिती भागात ऐकूया. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!