
दशक पाचवा समास दहावा सिद्ध लक्षणे
जय जय रघुवीर समर्थ. मुख्य देव कोणता? भक्ताचे लक्षण काय? असत्य सोडून सत्याची ओळख कशी पटवावी? आपल्या देवाला ओळखावे, मग मी कोण हे पहावे, मी पण त्यागून परब्रह्म रूप भरून राहावे. बंधनाचा संशय तोडावा, मोक्षाचा निश्चय करावा, सृष्टीची उभारणी व संहार कसा झाला याच्यासह भूतांचा अन्वयार्थ लावावा. पूर्वपक्षात सिद्धांत मांडून प्रकृतीचा अंत पहावा, मग निवांतपणे देवाचा निश्चय करावा.
देहाच्या योगामुळे निर्माण झालेला संशय समाधानाचा क्षय करतो.त्यामुळे आत्म तत्त्वाचा निश्चय नाहीसा होऊ देऊ नये.सिद्ध असल्यास आत्मज्ञान तर संदेहामुळे देहाभिमान वाढतो, त्यामुळे आत्मनिश्चयाद्वारे समाधान राखावे. देहबुद्धी आठवली की विवेकावरील विश्वास उडतो, त्यामुळे आत्मबुद्धी सुदृढ करावी. आत्मबुद्धीचा निश्चय म्हणजेच मोक्षश्रीची स्थिती हे विसरू नये. निश्चयाचे असे लक्षण सांगितले असले तरी ते सत्संगाशिवाय समजत नाही. संतांना शरण गेल्यावर संशय नाहीसे होतात. आता सिद्धांची लक्षणे ऐका. ज्याला कोणताही संदेह नाही तो सिद्ध असे म्हणतात.
सिद्धस्वरूपी देह असेल तर संदेह निर्माण होत नाही.देहाच्या संबंधामुळे विविध दोष निर्माण होतात.देहातीताची लक्षणे किती म्हणून सांगावी? जे डोळ्यांनी पाहता येत नाही त्याची लक्षणे कशी सांगावी? निर्मळ वस्तू सिद्धच असते त्याला कोणती लक्षणे? लक्षणे म्हणजे केवळ गुण, पण परब्रम्ह वस्तू ही मुळातच निर्गुण आहे. त्यामुळे तेच सिद्धांचे असं लक्षण म्हणता येईल. तरीसुद्धा ज्ञान दशकांमध्ये सांगितले म्हणून येथे माझे वक्तृत्व संपवतो. त्यात कमी जास्त असेल तर श्रोत्यांनी क्षमा करावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्ध लक्षण नाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक सहावे समास पहिला देवशोधन नाम दशक जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. चित्त शुद्ध करावे. बोलले ते नीट ऐकावे. सावध होऊन क्षणभर बसावे. कुठल्यातरी गावांमध्ये किंवा देशांमध्ये आपल्याला राहावे लागते पण तिथल्या प्रभूशी भेटले नाही तर आपल्याला सुख कसे मिळेल? म्हणून ज्याला जिथे राहायचं तिथे त्या प्रभूची भेट घेणे म्हणजे त्यात सगळे मिळेल. प्रभूची भेट घेतली नाही तर मान्यता कशी मिळेल? आपले महत्त्व गेले तर उपयोग होणार नाही, म्हणून राजापासून रंक कोणीतरी एक किंवा अनेक यांना भेटणे हा विवेक आहे हे विवेकी लोक जाणतात. त्याला न भेटता त्याच्या नगरमध्ये राहिले तर त्याला धरून चोरी न करता सुद्धा आळ येईल. म्हणून जो शहाणा आहे त्यांनी प्रभूला किंवा प्रमुखाला भेटावे. असं करणार नाही त्याचा संसार दैन्यवाणा होईल.
गावामध्ये ग्राम अधिपती थोर आहे, त्याच्यापेक्षा देशाधिपती थोर आहे, देशाधिपतीहून होऊन नृपती म्हणजे राजा थोर जाणावा. राष्ट्राचा प्रभु तो राजा.मोठ्या राष्ट्राचा प्रमुख तो महाराजा.महाराजांचाही राजा चक्रवर्ती! एक नरपति.गजपती,एक हयपती,भूपती, सगळ्यांमध्ये चक्रवर्ती श्रेष्ठ राजा.असे अनेक आहेत.त्यामध्ये निर्माण करणारा ब्रम्हा आहे. त्या ब्रह्माचाही निर्माता कोण आहे? ब्रम्हा विष्णू आणि हर त्याचा निर्माता जो आहे तो थोर आहे. तोच परमेश्वर आहे असं नाना प्रयत्नांनी जाणावं. देव माहिती नसेल तर यमयातना चुकणार नाही.ब्रम्हांडनायक ओळखता येत नाही हे बरे नव्हे.ज्याने संसारामध्ये आणले, सगळे ब्रम्हांड निर्माण केले, त्याला ओळखले नाही नाही तो पापी.म्हणून देव ओळखावा,जन्माचे सार्थक करावे, समजत नसेल तर सत्संग धरावा म्हणजे समजेल. याप्रमाणे देवाचा शोध समर्थ रामदास स्वामी घेत आहेत. पुढील भागात ऐकुया पुढील कथा.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७

