भावार्थ दासबोध -भाग ७६

निरुपण :पद्माकर देशपांडे

0

दशक ६ समास ३ मायेचा उद्भव
आकाश अंतराळ जसे सदोदित निर्मळ निश्चळ असते त्याप्रमाणे आत्मा निर्मळ निर्गुण असतो. जे खंडन केले जात नाही ते अखंड असते, जे उदंडाहून उदंड असते, जे आकाशापेक्षा मोठे आणि सूक्ष्म असते. ते दिसत नाही की भासत नाही. जे निर्माण होत नाही,ज्याचा नाश होत नाही.ते येत नाही आणि जात नाही,ते परब्रम्ह असते.ते चळत नाही आणि ढळत नाही,जे तुटत नाही आणि फुटत नाही, रचले जात नाही आणि खचले जात नाही ते परब्रम्ह असते.जे सदासर्वकाळ सन्मुख असते, निष्कलंक आणि निखळ असते, सर्व आकाश आणि पातळ व्यापून असते. ब्रह्म हे निर्गुण अविनाशी असते तर माया सगुण व नष्ट होणारी असते. सगुण आणि निर्गुण कालवले या मिश्रणाचा विचार योगेश्वर करतात.ज्याप्रमाणे राजहंस दूध आणि पाणी वेगळे करतात, त्या प्रमाणे चेतन आणि उपाधी असलेल्या वस्तूमध्ये व्यापक आत्मा असतो हे नित्यानित्य विवेक असलेल्यासच कळते.

ऊसामधील रस घ्यावा, चोयट्या  फेकून द्याव्या त्याप्रमाणे जगामध्ये जगदीश आहे हे हे विवेकाने ओळखावे. रस हा नाशवंत पातळ असतो तर आत्मा शाश्वत निश्चय असतो. रस अपूर्ण तर आत्मा केवळ परिपूर्ण. आत्म्यासारखे दुसरे काही एक असेल तर ते उदाहरण देवून समजावून सांगता येईल पण तसा कोणताही दृष्टांत देता येत नाही. अशा तऱ्हेची आत्मस्थिती निर्माण झाल्यावर तिथे माया राहू शकत नाही आकाशामध्ये वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे ती निघून जाते.वायूपासून तेज तयार झाले, तेजापासून पाणी निर्माण झाले, पाण्यापासून भूमंडळ आकारास आले. भूमंडळापासून किती जीव निर्माण झाले कोणी सांगू शकत नाही, परंतु ब्रह्म आदि अंती व्यापून उरलेले आहे. जे जे काही निर्माण झाले ते ते सर्व नष्ट झाले, मात्र ब्रह्म होते तसेच आहे. घट तयार करण्यापूर्वी आकाश असते आणि घटांमध्ये ही आकाश भासते, घट फुटल्यानंतर आकाश नाहीसे होते असे नाही.

त्याप्रमाणे परब्रम्ह हे अचळ आणि अटळ आहे. त्यामध्येच हे सर्व चराचर निर्माण होतात. जे जे काही निर्माण झाले ते सगळे आधीच ब्रह्माने व्यापलेले आहे. सर्व नष्ट झाले तरी ब्रम्ह अविनाशी राहिले.  असे ब्रह्म अविनाशी आहे. ते ज्ञानी पुरुष तत्वाचे पालन करून स्वतः  स्वतःचा लाभ करून घेतात. तत्त्वांमध्ये तत्त्व मिळवले त्याचे नाव देह ठेवले, ज्ञानी पुरुषांनी तत्त्वाने तत्त्व शोधले. नि:शेष तत्त्व जाणल्यावर देह अहंता शमली.  विवेकाने निर्गुण ब्रह्माच्या ठाई ऐक्य निर्माण होते. विचारपूर्वक देहाकडे पाहिले तर तत्त्वाने तत्व ओसरले आपण काहीच नाही याचा प्रत्यय येतो. आपण आपला शोध घेतल्यावर आपण म्हणजे मायीक रूप आहोत हे तत्व निरसनानंतर निर्गुण ब्रह्म असल्याचे लक्षात येते.

आपण विरहीत निर्गुण ब्रह्म हेच या निवेदनाचे सार आहे. तत्व सापडल्यावर मी तू पणाचा भ्रम गेला. मी पाहिल्यावर कुठे दिसत नाही आणि निर्गुण ब्रह्म दूर होत नाही ते म्हणजे आपण आहोत, पण हे सद्गुरुवाचून समजत नाही. सारसार अवघे शोधल्यावर असार निघून गेले आणि निर्गुण ब्रह्म हेच सार उरले. आधी ब्रह्माची माहिती दिली तेच सगळ्यांमध्ये व्यापून उरले आहे सगळे काही नष्ट झालेले आहे आणि उरले आहे ते केवळ ब्रम्ह. विवेकाने असा संहार झाल्यावर सारासार विचार केल्यावर मग आपल्याही लक्षात येते मी पण ही आपली एक कल्पना होती. मी पण सोडल्यावर ते सापडले नाही मी पण गेल्यावर निर्गुण आत्मा आहोत आपण हे लक्षात येते. तत्व लक्षात येताच आपण म्हणजे आत्मा हे समजते मग मी पण दाखवले जात नाही …

या दशकातील काही भाग आपण पाहिला पुढील भाग पाहू या पुढील कथेत. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!