दशक ६ समास ५ माया ब्रह्म निरूपण
जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. श्रोते विचारत आहेत, माया आणि ब्रह्म कसे असते? श्रोत्यांनी वक्त्याला विचारल्यामुळे त्याचे निरुपण करीत आहेत ते ऐकावे. ब्रम्ह निर्गुण निराकार असते तर माया सगुण साकार असते. ब्रह्माला मर्यादा नाही, अंत नाही, मायेला आहे. ब्रह्म निर्मळ आहे, माया चंचल चपळ आहे. ब्रह्म निरूपाधिक आहे, माया उपाधीरूप आहे. माया दिसते, ब्रह्म दिसत नाही, भासत नाही. माया नष्ट होते, कल्पांतकाळी देखील ब्रह्म नष्ट होत नाही. माया रचली जाते, ब्रह्म रचना करीत नाही. माया खचते ब्रह्म खचत नाही. माया रुचते, ब्रह्म रुचत नाही. माया उपजते, ब्रह्म निर्माण होत नाही.
माया मरते, ब्रम्ह मरत नाही. माया धरते, ब्रह्म धरत नाही. माया फुटते ब्रम्ह तुटत नाही. ही माया वीटते. ब्रह्म विटत नाही. ते अविनाशी असते. माझ्या विकारी असते ब्रम्ह निर्विकार असते. माया सर्व करते ब्रह्म काहीच करत नाही. माया नाना रूपे धरते, ब्रम्ह अरूप असते. माया पंचभौतिक असते, ब्रह्म शाश्वत असते. माया आणि ब्रह्मातील वेगळेपण विचारी लोक जाणतात. माया लहान, ब्रह्म थोर. माया असार, ब्रह्म सार. मायेला शेवट आहे, ब्रह्माला नाही. मायेने संपूर्ण विस्तार करून ब्रह्मस्थिती झाकली तरीसुध्दा साधू जणांनी ब्रह्म निवडले. शेवाळ बाजूला सारून पाणी घ्यावे आणि पाणी बाजूला सारून दूध सेवन करावे त्याप्रमाणे मायेला बाजूला सारून ब्रह्माचा अनुभव घ्यावा. ब्रह्म हे आकाशासारखे आहे तर माया ही गढूळ आहे. ब्रह्म सूक्ष्म आहे तर माया स्थूल आहे. ब्रम्ह अप्रत्यक्ष असते तर माया प्रत्यक्ष दिसते.
ब्रह्म हे सम असते तर माया विषमरूपी असते. माया लक्ष, ब्रह्म अलक्ष. माया साक्ष ब्रम्ह असाक्ष. मायेमध्ये दोन्ही पक्ष असतात, ब्रह्मामध्ये पक्षच नाहीत. माया पूर्वपक्ष, ब्रह्म सिद्धांत! माया असंत ब्रह्म संत. ब्रह्माचा काही करण्याचा हेतू नाही मायेला आहे. ब्रह्म अखंड घनदाट, माया पंचमहाभौतिक, पोचट. ब्रम्हे निरंतर परिपूर्ण, माया जुनी जर्जर. माया घडते ब्रह्म घडत नाही, माया पडते ब्रह्म पडत नाही, माया बिघडते ब्रह्म बिघडत नाही. काही झाले तरी ब्रह्म असतेच असते निरसन केले की माया जाते. ब्रह्माला कल्पांत नाही, मायेला आहे. माया कठीण आहे, ब्रह्म कोमल आहे. माया अल्प आहे ब्रह्म विशाल आहे. माया नसते ब्रह्मच सर्वकाळ असते. ब्रह्म हे बोलण्यासारखे नाही, माया जशी बोलावी तशी असते. वस्तू म्हणजे ब्रह्मावर काळ घाला घालू शकत नाही,
मायेवर मात्र झडप घालते. नाना रूप, नाना रंग. तितके मायेचे प्रसंग. माया भंग पावते ब्रह्म अभंग असते. असा हा विस्तार आहे. असो जितके चराचर तितकी माया आहे. परमेश्वर मात्र आतबाहेर सर्वत्र आहे. सर्व उपाधीपासून वेगळा परमात्मा निराळाच आहे. आकाश जसे पाण्याला स्पर्शत नाही तसा तो असतो. मायाब्रह्माचे विवरण केल्यावर जन्म-मरण चुकते. संतांना शरण गेल्यावर मोक्ष लाभतो. या संतांचा महिमा वर्णन करण्यास सीमा नाही. या संतांच्या हृदयात अंतरात्मा प्रगट होतो. इतीश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे माया ब्रह्म निरूपण नाम समास पंचम. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे