भावार्थ दासबोध – भाग ८१

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक सहावे समास सातवा सगुण भजन
जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानामुळे दृश्य खोटे ठरले तरी देखील भजन का केले पाहिजे त्याने काय मिळेल? हे मला सांगावे. हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ दुसरे काही नाही तरीदेखील उपासना का पाहिजे? उपासनेनेने लोकांना काय मिळते? निर्गुण हेच मुख्य सार आहे सगुण दिसतच नाही मग भजन का करावे? ते मला सांगावे. सगळे नाशवंत आहे तर मग भजन कशासाठी करायचे? सत्य सोडून असत्याचे भजन का करायचे? असत्याचा प्रत्यय आला मग नियम कशासाठी लावून घ्यायचे?

सत्य सोडून गलबला का करायचा? निर्गुणामुळे मोक्ष होतो, प्रत्यक्ष त्याचा प्रत्यय येतो मग सगुणामुळे काय मिळते? हे स्वामिनी सांगावे. सगळं नाशवंत असे सांगता आणि पुन्हा भजन करावे असे म्हणता, मग कशासाठी मी भजन करू? स्वामींच्या भिडेमुळे मला बोलता येत नाही, पण काही पटत नाही. एखादी गोष्ट साध्य झाल्यावर पुन्हा साधन का करायचे? अशाप्रकारे सर्व त्याने घाबरत घाबरत प्रश्न विचारले. त्याचे उत्तर ऐका असे वक्ता म्हणाला. गुरुचे वचन पाळणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे वचनभंग झालं तर काही उपयोग होत नाही म्हणून आज्ञेला मान द्यावा. सगुण भजन मानावे. यावर श्रोता म्हणाला, हे देवाने का योजिले आहे? कोणामुळे उपकार झाला, कोणाला साक्षात्कार झाला, देवाने प्रारब्धाचे अक्षर पुसून टाकले. जे होणार ते होतेच मग लोकांनी भजन का करायचे? याचा काही अर्थ लागत नाही.

स्वामींची आज्ञा प्रमाण आहे ती कोणी टाळणार नाही परंतु त्याचा काय उपयोग ते सांगावे. यावर वक्ता म्हणाला, ज्ञानाची लक्षणे पाहिली असता तुला काही करायला हवे की नको? भोजन करावे लागते, पाणी प्यावे लागते, मलमूत्र त्याग करावा लागतो या गोष्टी तर कराव्या लागतात. तर लोकांचे समाधान करावे, आपले आणि परके ओळखावे लागतेच. मग भजनच करायचे नाही? हे कोणते ज्ञान आहे! ज्ञानाच्या विवेकामुळे सर्व खोटे झाले परंतु सगळे सोडून देता येत नाही तर मग भजनच का सोडून द्यायचे? हे मला सांग. मालकाच्या पुढे लोटांगण घालावे आणि नीच व्यक्ती सारखे व्हावे पण देवास मानू नये हे कोणते ज्ञान आहे? हरिहर आणि ब्रह्मादिक हे ज्यांचे आज्ञाधारक आहे, त्याच्यापुढे तू एक मानवी रंक आहे, भजन केले तर काय तुझे गेले? आमच्या कुळात रघुनाथ आहे. रघुनाथामुळे आमचा परमार्थ आहे. जो समर्थांपेकक्षाही समर्थ आहे तो आम्हाला सोडवतो. त्याचे आम्ही सेवकजन आहोत. सेवेसाठी आमचे ज्ञान आहे, त्यामुळे आम्ही न केल्यास आमचे पतन होईल. गुरु सार असार सांगतात त्याला असार कसे म्हणावे? तुला आणखी काय सांगायचे? शहाणे लोक हे जाणतात. समर्थांच्या मनातुन उतरल्यास आपले प्रारब्ध खोटे, ते राज्यपदापासून भ्रष्टले असे जाणावे.

मी थोर आहे असे मनात वाटते तो ब्रह्मज्ञानी नाही. तो देहाभिमानी असल्याचे प्रत्यक्ष दिसते. वस्तू भजन कर असे म्हणत नाही तसेच भजन करू नको असंही म्हणत नाही, ही कल्पना गुप्त आहे. ज्ञानही नाही आणि भजन ही नाही मात्र उगाच देहाचा अभिमान आहे येथे तुझे अनुमान किंवा प्रत्यय चालणार नाही. तरी आता असे करू नये. रघुनाथाचे भजन करावे. त्यालाच नष्ट न होणारे ज्ञान बोलावे. दुर्जनांचा संहार करतो, भक्तजनांना आधार देतो असा हा रोकडा चमत्कार आहे. मनात धरावे ते होते, संपूर्ण विघ्न नाहीसे होते, रघुनाथाने यांच्या कृपा केली याची प्रचिती येते. सगुण भजनाची आणखी काही माहिती पुढील भागात पाहू या. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!