भावार्थ दासबोध -भाग ८२

निरुपण :पद्माकर देशपांडे

0

दशक ६ समास ७ सगुण भजन
जय जय रघुवीर समर्थ. रघुनाथाच्या भजनामुळे ज्ञान झाले. रघुनाथाच्या भजनामुळे महत्त्व वाढले, म्हणून तुला ते आधी केले पाहिजे. हे स्वानुभवाचे बोल आहे आणि तुला खरे वाटत नाहीत? त्याचा अनुभव पटण्यासाठी आचरणात आणावे. रघुनाथाचे स्मरण करून कार्य करावे, म्हणजे ते तात्काळ सिद्धीस जाते. कर्ता राम हे मनात असावे. कर्ता राम आहे मी नव्हे! असे सगुण निवेदन केले असता ते अपोआप निर्गुण होते. मी कर्ता असे म्हटले तर काहीच घडत नाही त्याची प्रचिती लगेच घेऊ शकता. मी कर्ता असे म्हटले तर तू कष्टी होशील. राम कर्ता म्हणशील तर यश-किर्ती प्रताप मिळवशिल.

एका भावनेमुळे देवापासून दुरावा निर्माण होतो, देवाला कर्ता म्हटल्याने त्याची कृपादृष्टी आपल्यावर होते. आपण दोन दिवसांपुरते आहोत, देव मात्र अनंत काळासाठी आहे. आपल्या ओळखीचे लोक थोडेच आहेत देवाला सगळे त्रैलोक्य ओळखते, म्हणून रघुनाथ भजन करावे, त्याला सर्व लोक मानतात. ब्रह्मादि करून देखील रामभजन करण्यास तत्पर असतात. ज्ञानाच्या बळामुळे उपासना केली जाते ती नसेल तर स्वतःला भक्त मानू नये. हे दोष निर्माण होऊन अभक्तपण प्राप्त होते. स्वतःला थोर म्हणून देवाची उपेक्षा केली तर त्याची जबाबदारी त्यांने घ्यावी. स्वतःला श्रेष्ठ समजणे अप्रमाण, ते श्रेष्ठपणाचे लक्षण नाही. देहाला उपासनेची आवड निर्माण झाली असता आपण स्वतः काही करत नाही अशी सजनांच्या अंतरीची स्थिती होते.

सर्व मिथ्या होते. हे राम भजनाने कळते. दृश्य ज्ञान स्वप्न वाटू लागते. स्वप्नातील विवंचना खोटी असते, तशी सृष्टीची रचना होय. हे दृश्य जे आहे ते आहे हे साधूजनाना समजलेले आहे. जे मिथ्या आहे ते का दिसते हा जो आक्षेप श्रोत्यांनी घेतला आहे, त्यावर पुढल्या समासात बोलत आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे सगुणभजन नाम समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. समास आठवा दृष्यनिर्णय

जय जय रघुवीर समर्थ. मागे श्रोत्यांनी विचारले, दृश्य खोटे असते तरी का दिसते? त्याचे उत्तर सांगत आहे, ते सावधपणे ऐकावे. जे पाहिले ते खरे मानावे हे ज्ञानी माणसाचे लक्षण नव्हे. जड मूढ अज्ञानी लोक ते सत्य मानतात. फक्त पाहिलेल्या गोष्टीसाठी कोटी ग्रंथांमध्ये सांगितलेल्या संत महंतांच्या गोष्टही खोट्या कशा म्हणायच्या? माझे दिसते हेच खरे, इथे दुसरं चालत नाही नाही अशा संशयामध्ये पडू नये. मृगाने मृगजळ पाहिले, मग ते धावायला लागले, पण तेथे पाणी नाही हे त्या पशूला कोणी सांगायचे? रात्री स्वप्न पाहिले, खूप द्रव्य सापडले, खूप जणांना ते दिले, त्याच्यात व्यवहार केला हे खरं कसं मानायचं? चित्रकाराने विचित्र चित्र निर्माण केले, पाहिल्यावर ते आवडले पण तिथे आहे फक्त माती. नाना स्त्रीया, हत्तीघोडे रात्री पाहिल्यावर मन त्यात रमले, दिवसा पाहिल्यावर कंटाळवाणे कातडे आढळते. नाना ठेवणीच्या आकारातील लाकूड, दगडाच्या पुतळ्या निर्माण केल्या, खूप सुंदर वाटल्या, पण पाहिले ते पाषाण! नाना देवद्वारावरील मजल्यावर सुंदर मूर्ती असतात, त्यांची वक्र अंगे पाहून कामुक वृत्ती उत्पन्न होते,

परंतु पाहू गेले तर चुना वाळू आणि ताग यांचे मिश्रण असते. दशावतारी खेळ चांगले खेळले जातात, तिथे सुंदर नारी येतात त्या डोळ्यांच्या आकर्षक हालचाली केल्या जातात पण पाहिले तर सगळे धटिंगण पुरुष! बहुरूपी सृष्टी ही असत्य आहे ते बहुरुप्याचे कृत्य आहे तुला हे दृश्य सत्य वाटते पण ही अविद्या आहे. खोटे होते ते खऱ्यासारखे दिसले पण ते खरे कसे मानावे त्याचा विचार केला पाहिजे. वर पाहिले तर पालथे आकाश खाली पाण्यात पाहिले तर उताणे आकाश, मध्ये चांदण्यांचा प्रकाश! पण ते सगळे खोटे. राजाने चितारी आणले, हुबेबुब पुतळे तयार केले, पाहिल्यावर हेच खरे आहे असे वाटले पण सगळे मायीक. अशाप्रकारे दृश्यनिर्णय माहिती समर्थ रामदास स्वामी महाराज देत आहेत. अधिक माहिती पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!